Posted On:
01 NOV 2026 7:20PM by PIB Mumbai
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी), नागपूर इथे सहा वर्षांच्या खंडानंतर ‘अनुभूती 2026’ या सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ‘नवरस’ या संकल्पनेवर आधारित चार दिवसीय महोत्सवात भारतीय महसूल सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या 79 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ अधिकारी तसेच कला, चित्रपट, साहित्य, संस्कृती आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले.
अकादमीचे महासंचालक सतपाल गुलाटी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात नवरस परंपरेवर आधारित सादरीकरणे, कथक, प्रादेशिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि मंगणियार लोकसंगीताचा समावेश होता. वारली चित्रकला, डूडलिंग आणि मॉकटेल बनवण्याच्या कार्यशाळांमधून सर्जनशीलतेला वाव देण्यात आला. पश्चिम विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रादेशिक परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संगीत, नृत्य, नाट्य, प्रादेशिक खाद्यसंस्कृती आणि विविध सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून पूर्व भारताच्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करण्यात आला. रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे मंडळाचे प्रधान कार्यकारी संचालक (सुरक्षा) उपिंदर सिंग आणि नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग हे पूर्व विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विशेष मुलांचा सहभाग असलेला ‘रनवे अँड रिदम’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. एसव्हीके संस्थेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमातून सर्वसमावेशकता आणि स्व-अभिव्यक्तीचा संदेश देण्यात आला. याशिवाय, संगीत नाटक अकादमीच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत कार्यरत कथक केंद्राने नृत्यरूपा : भारतीय नृत्यांचा सुरेख संगम, हा कार्यक्रम सादर केला. यामध्ये कथकली, कथक आणि छाऊ यांसारख्या नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
तिसऱ्या दिवशी छायाचित्रण, नृत्य, चित्रपट आणि साहित्य या विषयांवरील कार्यशाळा आणि संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले. छायाचित्रकार आणि वन्यजीव कथाकथनकार वरुण ठक्कर यांनी छायाचित्रण कार्यशाळा घेतली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते विक्रांत मेस्सी यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना आपल्या कलात्मक प्रवासातील अनुभव मांडले. लेखक आणि पटकथालेखक दिव्य प्रकाश दुबे यांनी कथाकथन आणि लेखनाविषयी मार्गदर्शन केले. मल्याळम, हिंदी, रेख्ता आणि इंग्रजी भाषांतील कवितांचा समावेश असलेल्या कवी संमेलनातून साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी ‘द ग्रेट अनुभूती डिबेट’ या वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच विनोद आणि सर्जनशील सहभागाला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. व्यावसायिक कारकिर्दीबरोबरच लेखन क्षेत्रातही योगदान देणाऱ्या 3 भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांच्या पुस्तकांवर चर्चा झाली. कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार यांनी ‘कोरल्स ब्लूम अगेन’ या पर्यावरणविषयक थरारक कादंबरीविषयी विचार मांडले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी सदस्य प्रसेनजित सिंह यांनी ‘सिंटॅक्स ऑफ टॅक्स’ या पुस्तकाची माहिती दिली, तर आरोग्य विभागाच्या सहसचिव रितू शर्मा यांनी ‘शक्ती : अ स्पिरिच्युअल जर्नी थ्रू द गॉडेसेस’ या पुस्तकाविषयी चर्चा केली.
नीरज श्रीधर यांच्या संगीत कार्यक्रमाने चार दिवसीय महोत्सवाची सांगता झाली.
‘अनुभूती 2026’ महोत्सवामुळे अधिकारी प्रशिक्षणार्थींचा भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांशी परिचय होतो आणि वर्गखोली बाहेरील सर्जनशील अभिव्यक्ती अनुभवण्याची संधी मिळते. भारतीय महसूल सेवा (प्राप्तिकर) अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या सर्वांगीण विकासासाठी व्यावसायिक प्रशिक्षणासोबतच कला, साहित्य आणि सांस्कृतिक वारशाची जाण निर्माण करण्याच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या बांधिलकीचे प्रतिबिंब या महोत्सवातून उमटले.








***
राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai