युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माय भारत मंचाच्या ‘विकसित भारत युवा संवाद – आपल्या  मताधिकाराविषयी जाणून घ्या ’ अभियानामध्ये 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 62 कार्यक्रमांच्या माध्यमातून 11,000 पेक्षा जास्त युवांचा सहभाग

Posted On: 31 OCT 2026 7:59PM by PIB Mumbai

‘विकसित भारत युवा संवाद – आपल्या  मताधिकाराविषयी जाणून घ्या’ या अभियानाअंतर्गत 16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित 62 कार्यक्रमांमध्ये 11,000 पेक्षा जास्त युवक/युवती सहभागी झाले होते. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाच्या अखत्यारितील मेरा युवा भारत (माय भारत) मंचाने 31.10.2026 रोजी हे अभियान आयोजित केले. या देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून 62 महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला. 26.10.2026 ते 05.11.2026  दरम्यान देशभरातील 500 विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्दीष्ट आहे.

युवा पिढीमध्ये, विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदात्यांमध्ये  निवडणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्यांनी माहिती घेऊन लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यातून त्यांना मतदानाचा हक्क, निवडणूक प्रक्रिया व नागरी जबाबदाऱ्या यांची माहिती दिली जाईल तसेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी, युवा आदर्श व इतर मान्यवरांसोबत लोकशाहीतील सहभाग व राष्ट्र उभारणी याविषयी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल.

हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू  आणि काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अशा उत्तर भारतातील व्यापक भौगोलिक प्रदेशामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश व आसाम, पूर्वेकडील बिहार, झारखंड, ओडिशा मध्य भारतातील मध्य प्रदेश, पश्चिमेकडील महाराष्ट्र व राजस्थान, दक्षिणेकडील तमिळनाडू व तेलंगण या राज्यांमध्येही  या अभियानातील कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या अभियानाच्या नुकत्याच पार पडलेल्या फेरीमध्ये 28 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 158 युवा संवाद कार्यक्रमांमध्ये सुमारे 32,000 युवक-युवती आणि 158 युवा आदर्श व्यक्तींनी सहभाग घेतला.

हे देशव्यापी अभियान 05.11.2026 पर्यंत सुरू राहणार असून यापुढील कार्यक्रम विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत.  

***

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2331034) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English , हिन्दी