संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम  व्हीएसएम  यांनी भारतीय हवाई दलाचे  प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 31 OCT 2026 3:33PM by PIB Mumbai

 

एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम  व्हीएसएम  यांनी 31 ऑक्टोबर 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे  29 वे  हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग  पीव्हीएसएम एव्हीएसएम  यांची जागा घेतली. देशाला 42  वर्षांची उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर सिंग सेवानिवृत्त झाले आहेत.

नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे (एनडीए) माजी विद्यार्थी असलेले एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित 6 डिसेंबर 1986  रोजी भारतीय हवाई दलाच्या 'फायटर स्ट्रीम'मध्ये (लढाऊ विमान शाखा) रुजू  झाले होते.

चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत, एअर चीफ मार्शल दीक्षित यांना ऑपरेशन्स, फ्लाईट टेस्टिंग, क्षमता विकास आणि 'जॉइंट स्टाफ' नियुक्ती यांसारख्या विविध क्षेत्रांमधील  कामाचा समृद्ध अनुभव आहे. एक कुशल लढाऊ वैमानिक, पात्र फ्लाईंग इन्स्ट्रक्टर (प्रशिक्षक) आणि प्रायोगिक टेस्ट पायलट  म्हणून त्यांना विविध प्रकारच्या विमानांचे  3,300 तासांहून अधिक काळ उड्डाण करण्याचा अनुभव आहे. यामध्ये मिराज--2000, मिग विमानांचे विविध प्रकार, जॅग्वार आणि विविध वाहतूक विमानांचा समावेश आहे.

भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणातील योगदानासाठी ते सर्वत्र ओळखले जातात. जग्वार आणि मिग-27 अपग्रेड प्रकल्पांना अंतिम रूप देण्यात आणि एलसीए एमके-१ तेजसच्या प्रारंभिक कार्यान्वयन मंजुरी  व अंतिम कार्यान्वयन मंजुरी  प्रक्रिया पूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या परिचालन कमांड जबाबदाऱ्यांमध्ये मिराज-2000 स्क्वाड्रन, पश्चिम क्षेत्रातील एक फॉरवर्ड बेस सपोर्ट युनिट आणि हवाई दल तळ बिदर या भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख लढाऊ प्रशिक्षण तळ यांच्या कमांडचा समावेश आहे.

 दीक्षित यांनी  दक्षिण हवाई कमांडमध्ये हवाई संरक्षण कमांडर, दक्षिण पश्चिमी हवाई कमांडमध्ये वरिष्ठ हवाई दल  अधिकारी आणि हवाई दल उपप्रमुख म्हणून काम पाहताना  प्रमुख क्षमता विकास आणि खरेदी उपक्रमांचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी हवाई अधिकारी कमांडिंग-इन-चीफ म्हणून सेंट्रल एअर  कमांडची कमान सांभाळली आणि नंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून काम पाहिले. हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी हवाई दल उपप्रमुख म्हणून काम पाहिले होते.

एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित हे बांगलादेश येथील डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज आणि नवी दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजचे एक  पदवीधर आहेत. देशाप्रती दिलेल्या अतुलनीय सेवेच्या सन्मानार्थ त्यांना वायू सेना पदक, विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

***

माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330897) अभ्यागत कक्ष : 13