गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त नवी दिल्ली येथे रन फॉर युनिटी अर्थात एकतेसाठी धाव या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवून केला शुभारंभ

Posted On: 31 OCT 2026 2:09PM by PIB Mumbai

 

सरदार वल्लभभाई पटेल यांची 151 वी जयंती, अर्थात राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आज नवी दिल्ली येथे आयोजित रन फॉर युनिटी उपक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना एकता शपथही दिली. या कार्यक्रमाला दिल्लीचे नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RED1.jpeg

या प्रसंगी बोलताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून आपण सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करत आहोत. आज सरदार साहेबांची 151 वी जयंती आहे. ते एक असे महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी केवळ भारताचा इतिहासच बदलला नाही, तर भारताचा भूगोलही घडवला. अनेक संस्थाने आणि राजेशाही प्रदेशांना एकत्र करण्याचे कठीण कार्य पूर्ण करून सरदार साहेबांनी, आज आपण पाहतो तो अखंड भारताचा नकाशा तयार केला. त्यांनी सांगितले की सरदार साहेबांनी भारताच्या भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक एकात्मतेसाठी यशस्वी प्रयत्न केले आणि देशाला एका सूत्रामध्ये बांधून एकसंध राष्ट्र म्हणून उभे केले.

RED2.jpeg

अमित शहा म्हणाले की आपल्या देशातील भाषिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक विविधता हा आपला दुबळेपणा नसून आपली ताकद आहे. हाच सरदार पटेल यांचा संदेश होता आणि याच मार्गावर आपल्याला पुढे जायचे आहे. आपली भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता हीच आपली शक्ती आहे. संवाद, विश्वास आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून आपण गेल्या 80 वर्षांत एक सामायिक राष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे. आपल्या भाषा, पेहराव, सांस्कृतिक श्रद्धा आणि धर्म भिन्न असले, तरी आपला देश सदैव एकवटलेला राहिला आहे.

RED2.jpeg

अमित शहा पुढे म्हणाले की सरदार साहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक वर्षे योग्य तो मान मिळाला नाही. विरोधकांनी नेहमीच सरदार साहेबांच्या स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश लपवता येत नाही, त्याचप्रमाणे त्यांचा वारसाही लपवून ठेवता आला नाही. त्यांनी सांगितले की जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी या भव्य स्मारकाची निर्मिती केली आणि याद्वारे सरदार साहेबांच्या महान व्यक्तिमत्त्वाचे दर्शन संपूर्ण देशाला घडवून दिले. शहा म्हणाले की आज त्याच ठिकाणाहून पंतप्रधान मोदी देशभरातील पोलीस दलांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारतील, ज्याद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाईल.

RED3.jpeg

***

माधुरी पांगे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330877) अभ्यागत कक्ष : 6