Posted On:
31 OCT 2026 2:37PM by PIB Mumbai
परराष्ट्र मंत्रालयांतर्गत कार्यरत क्षेत्रीय पारपत्र कार्यालय, पुणे यांच्या वतीने दक्षता जनजागृती अभियान 2026 अंतर्गत राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून सार्वजनिक सेवांमध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता, नैतिक मूल्ये व उत्तरदायित्व यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
क्षेत्रीय पारपत्र कार्यालय, पुणे हे आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना पारपत्र व संबंधित सेवा पुरविण्याचे कार्य करते. सार्वजनिक सेवांमध्ये सचोटी जपणे, भ्रष्टाचाराला प्रतिबंध करणे तसेच, सरकारी संस्थांवरील नागरिकांचा विश्वास दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.


या वॉकथॉनमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), पोलीस विभाग, डाक विभाग, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे महानगरपालिका, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांसह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सहभागातून पारदर्शक, प्रामाणिक आणि जबाबदार प्रशासन निर्माण करण्यासाठी विविध संस्थांची सामूहिक बांधिलकी व्यक्त झाली.
“समृद्धीसाठी सचोटी” (Probity for Prosperity) या संकल्पनेनुसार सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिक आचरण यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, जबाबदार कार्यपद्धती आणि सरकारी यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, पुणे, डॉ. विनोद गायकवाड यांनी सार्वजनिक सेवा पुरविताना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांना निष्पक्ष, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी दक्षता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्व सहभागींच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या वॉकथॉनच्या माध्यमातून क्षेत्रीय पारपत्र कार्यालय, पुणे आणि सहभागी संस्थांनी प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये, राष्ट्रीय एकता व सार्वजनिक सेवांमधील उत्तरदायित्व यांप्रती आपली सामूहिक बांधिलकी व्यक्त केली.
***
शिल्पा पोफळे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai