संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस तरकश मॉरिशसच्या पोर्ट लुईस बंदरात दाखल

Posted On: 30 OCT 2026 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

दक्षिण हिंद महासागर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या कार्यात्मक तैनातीचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचे 'तरकश' हे जहाज 30 ऑक्टोबर 2026 रोजी मॉरिशसच्या पोर्ट लुईस बंदरात दाखल झाले. या भेटीमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील घनिष्ठ सागरी भागीदारी प्रतिबिंबित होत आहे.तसेच यामुळे व्यावसायिक संवाद, संयुक्त उपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे द्विपक्षीय नौदल सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी मिळेल.

बंदरावरील मुक्कामादरम्यान, जहाजावरील कर्मचारी मॉरिशस तटरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांबरोबर विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतील. यामध्‍ये  संयुक्त प्रशिक्षणाचाही समावेश असेल, याचा उद्देश  कार्यात्मक अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, परस्परांबरोबर काम करण्याची कार्यक्षमता वाढवणे आणि दोन्ही सागरी दलांमधील समन्वय अधिक दृढ करणे हा आहे. या भेटीमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि समुदाय-संपर्क उपक्रमांचाही समावेश असेल, यामुळे दोन्ही देशांच्या कर्मचाऱ्यांना संवादाची संधी मिळेल आणि दोन्ही बाजूंच्या लोकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होतील.

आयएनएस तर्कश 02 नोव्हेंबर 2026 रोजी मॉरिशसच्या 192 व्या अप्रवासी दिनाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होईल. 2 नोव्हेंबर 1834 रोजी पोर्ट लुईस येथील   'अप्रवासी घाट’ येथे भारतातून आलेल्या कंत्राटी कामगारांच्या पहिल्या तुकडीचे आगमन झाले होते. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस या कामगारांचा ऐतिहासिक वारसा, त्याग आणि योगदान, याचा सन्मान करतो. त्यांचे वंशज आज मॉरिशसच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग आहेत आणि त्यांनी या व्दीपराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. या दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये 'आयएनएस तरकश'चा सहभाग दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित करतो.

ही बंदर भेट म्हणजे भारत आणि मॉरिशस यांच्यातील दीर्घकालीन भागीदारीचे महत्त्वाचे प्रतीक असून, ती सामायिक ऐतिहासिक संबंध, सांस्कृतिक जवळीक आणि परस्पर विश्वास, यावर आधारित आहे. सागरी सहकार्य, प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्य, वृद्धिंगत करणारी ही भेट हिंदी महासागर क्षेत्रातील मित्र राष्ट्रांबरोबर भारतीय नौदलाचा निरंतर सहभाग अधोरेखित करते.


सुवर्णा बेडेकर /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2330693) अभ्यागत कक्ष : 10