Posted On:
30 OCT 2026 6:39PM by PIB Mumbai
मुंबई , 30 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- प्रादेशिक केंद्र, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई यांनी आज शैक्षणिक सहकार्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीला चालना देण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारावर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- प्रादेशिक केंद्र, मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक उपक्रम यांच्यातील सहकार्यासाठी एक चौकट प्रदान होणार असून यामध्ये प्राध्यापकांची देवाणघेवाण, अतिथी व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, परिषदा, संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संशोधन आणि प्रकाशने यांचा समावेश आहे.
या भागीदारीअंतर्गत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई आपले प्रशासकीय आणि कॉर्पोरेट कायद्यातील नैपुण्य, न्यायशास्त्र, दिवाळखोरी आणि नादारी, करविषयक खटले आणि उदयोन्मुख कायदेशीर प्रश्न सामायिक करेल. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- प्रादेशिक केंद्र, मुंबई प्रत्यक्ष कर, कर प्रशासन, तपासणी तंत्र, डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, हस्तांतरण मूल्य निर्धारण आणि कर करार याबद्दलचे प्रत्यक्ष व्यवहारातील ज्ञान सामायिक करेल.
या सहकार्यांतर्गत प्राप्तीकर विभागातील पात्र अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई मध्ये पी एच डी अभ्यासक्रम करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रादेशिक केंद्र, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना कर प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेण्याची आणि व्यावहारिक ज्ञान संपादन करण्याची संधी मिळेल.

या भागीदारीमुळे प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांच्या कायदेविषयक ज्ञानात आणि कौशल्यात भर पडेल असे नवनीत मनोहर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ,मुंबईचे कायद्याचे विश्लेषण, न्यायशास्त्र आणि करविषयक खटले यांच्यातील नैपुण्यामुळे अधिकाऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेणे सोपे होईल आणि करविषयक खटल्यांचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करता येईल, असे ते म्हणाले.
या सहकार्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कर प्रशासनामधील अनेक अंतर्गत बाबी लक्षात येतील असे प्राध्यापक डॉ दिलीप उईके यांनी सांगितले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- प्रादेशिक केंद्र, मुंबई यांचे व्यावहारिक कौशल्य आणि अनुभव यामुळे शैक्षणिक अध्ययन अधिक समृद्ध होण्यास मदत होईल, तसेच करप्रणालीशी संबंधित कायदेशीर आणि प्रशासकीय पैलूंची अधिक सखोल समज विकसित होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या समारंभास राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- प्रादेशिक केंद्र, मुंबईच्या वतीने संयुक्त आयकर संचालक गोविंद मोहन,उप आयकर संचालक जयंतिका सिंह, आणि आयकर अधिकारी अनुपम श्रीवास्तव, उपस्थित होते. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईच्या वतीने कुलसचिव प्रा. (डॉ.) प्रकाश एन. चौधरी, अधिष्ठाता (शैक्षणिक) तथा विधी प्राध्यापक प्रा. (डॉ.) रागिणी पी. खुबलकर आणि प्राध्यापक समन्वयक सूरज करंडे उपस्थित होते.
हा सामंजस्य करार पाच वर्षांसाठी असेल. यातून ज्ञान सामायिक करण्यासह, संशोधन आणि व्यावसायिक कौशल्य यांना प्रोत्साहन देण्याची दोन्ही संस्थांची बांधिलकी दिसून येते. या भागीदारीमुळे कायद्याचे शिक्षण आणि कर प्रशासन यांच्यातील दुवा बळकट होईल आणि प्राप्तीकर विभागासाठी कौशल्यपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज कुशल कार्यबळ निर्माण होण्यासाठी मोठे योगदान मिळेल.
पीआयबी मुंबई |आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumba