अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहा वर्षांच्या खंडानंतर नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत अनुभूती 2026 चे पुन्हा एकदा आयोजन


नवरस या संकल्पनेवर आधारित चार दिवसीय सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सवातून देशाच्या विविधतेचा उत्सव

Posted On: 29 OCT 2026 7:44PM by PIB Mumbai

नागपूर, 29 ऑक्‍टोबर 2026

 

नागपूर मधील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (NADT - National Academy of Direct Taxes) 28 ऑक्टोबर रोजी अनुभूती 2026 या सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सवाचा शुभारंभ झाला. तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरस ही या चार दिवसीय महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवात विविध कलाकारांचे सादरीकरण, सर्जनशील कार्यशाळा आणि प्रादेशिक परंपरांच्या माध्यमातून देशाच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा केला जात आहे.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी नवरसावर आधारित चित्तवेधक सादरीकरणांसह कथ्थक नृत्याचे कार्यक्रमही झाले.

यावेळी वारली चित्रकला, डूडलिंग आणि मॉकटेल बनवण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामुळे अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांना आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली.

भारतीय महसूल सेवा (प्राप्तीकर) अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या 79 व्या तुकडीने पश्चिम भारताचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या सादरीकरणातून पश्चिम भारतातील विविध परंपरांचे दर्शन घडले. या कार्यक्रमात उपस्थितांना प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही घेता आला.

पहिल्या दिवसाची सांगता भार हरपून टाकणाऱ्या मंगणियार लोकसंगीताच्या कार्यक्रमाने झाली. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

कलात्मक अभिव्यक्ती, प्रादेशिक परंपरा आणि सांस्कृतिक विविधतेचा मिलाफ घडवून आणणाऱ्या या चार दिवसीय सोहळ्याचा पहिल्या दिवस अतिशय उत्साहात पार पडला.

   

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330218) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English