Posted On:
28 OCT 2026 8:59PM by PIB Mumbai
नागपूर, 28 ऑक्टोबर 2026
एम्स म्हणजेच, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरच्या औषधशास्त्र विभागाने, असोसिएशन ऑफ फिजिशीयन्स ऑफ इंडियाच्या, विदर्भ शाखेच्या सहकार्याने, आज संक्रमण 2026 : संसर्गजन्य आजारावरील निरंतर वैद्यकीय शिक्षण, हा एकदिवसीय जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन, एम्सचे कार्यकारी संचालक, मुख्य मार्गदर्शक आणि सीईओ, डॉ. प्रशांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्राणिजन्य संसर्गांवरील वैद्यकीय दृष्टिकोन, या विषयावर मार्गदर्शक व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी या संसर्गांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व, लवकर निदान आणि सज्जता यांवर भर दिला.

या जनजागृतीपर कार्यक्रमात संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनातील महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. डॉ. मिलिंद भुशुंडी यांनी एचआयव्हीच्या प्राथमिक उपचारपद्धती आणि त्यात अलीकडे झालेली प्रगती याविषयी माहिती दिली, तर डॉ. भरत राठोड यांनी एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठीच्या संसर्गपूर्व प्रतिबंधक उपचारपद्धती आणि संसर्गोत्तर प्रतिबंधक उपचारपद्धती यांविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. अश्विनी तायडे यांनी म्युकरमायकोसिससह आक्रमक बुरशीजन्य संसर्गांवर व्याख्यान दिले. डॉ. नीता गाडे यांनी संसर्गजन्य रोगांचे निदान करण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारांबाबत निर्णय घेण्यास मार्गदर्शन करण्यात, सूक्ष्मजीवशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
तसेच, डॉ. सुनीता कुंभलकर, डॉ. राजश्री खोत आणि डॉ. अमोल दुबे, यांनीही एम्स नागपूर इथल्या आपल्या अनुभवांविषयी माहिती दिली. तसेच, त्यांनी, अत्यंत रोचक मात्र आव्हानात्मक अशा संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांविषयी सांगितले, यात, काही अपवादात्मक किंवा दुर्मिळ संसर्गाचे रुग्णही होते.

या कार्यक्रमात, विविध आजारांच्या केसेसचे सादरीकरण, पोस्टरवर चर्चासत्र आणि पदव्युत्तर वैद्यकीय प्रश्नमंजुषा,अशा उपक्रमांचाही समावेश होता. त्यातून वैद्यकीय ज्ञानाची देवघेव आणि पुराव्यांवर आधारित वैद्यकीय शिक्षण यांचा समावेश होता. विदर्भातील 9 वैद्यकीय महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता, यात, चंद्रपूरच्या सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयाने, प्रथम, तर एम्स नागपूरने द्वितीय क्रमांक पटकावला.
या निरंतर वैद्यकीय शिक्षण (CME) कार्यक्रमाचे आयोजन एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जोशी आणि अधिष्ठाता डॉ. रसिका गडकरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. डॉ. सुनीता कुंभलकर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची, तर डॉ. राजश्री खोत यांनी सह-अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एपीआय म्हणजेच असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया च्या विदर्भ शाखेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाखेच्या अध्यक्षा डॉ. तनुजा मनोहर उपस्थित होत्या. एम्स नागपूरच्या सामान्य वैद्यकशास्त्र विभागातील प्राध्यापकांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. पदव्युत्तर वैद्यकशास्त्र प्रश्नमंजूषेची रचना आणि स्वरूप निश्चित करण्यात डॉ. ईशान वर्मा, डॉ. ओंकार अवधिया आणि डॉ. अमृता बागुल यांनी महत्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रकाश खेतान यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतर्फे निरीक्षक म्हणून काम पाहिले.

डॉ. प्रीतम साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानतांना संक्रमण 2026 हा उपक्रम यशस्वी करण्यात योगदान देणारे सर्व मान्यवर, वैद्यकीय शाखेचे सदस्य, आयोजक आणि सहभागी अशा सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संक्रमण 2026 मुळे, वैद्यकशास्त्रातील ज्ञानाचे आदानप्रदान करणे, क्लिनिकल शिक्षण, आणि व्यावसायिक सहकार्य अशा सगळ्यासाठी एक महत्वाचा मंच मिळाला असून, वैद्यकीय अध्ययनात उत्कृष्ट कामगिरी करण्याविषयीची तसेच, संसर्गजन्य आजारांच्या प्रसाराविषयी जनजागृती करत, त्याला आळा घालण्याविषयीची एम्स नागपूरची कटिबद्धता यातून व्यक्त होते.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai