Posted On:
28 OCT 2026 8:33PM by PIB Mumbai
नागपूर, 28 ऑक्टोबर 2026
नागपूरमधील काटोल रोडवरील शिवाजी स्टेडियमवर आज झालेल्या पॉवरग्रिड आंतर-विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात 'पश्चिम विभाग-I ने कॉर्पोरेट सेंटर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेत पॉवरग्रिडच्या विविध विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला.
तत्पूर्वी, पहिल्या उपांत्य सामन्यात पश्चिम विभाग-I ने दक्षिण विभाग -I चा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात कॉर्पोरेट सेंटरने उत्तर पश्चिम विभागावर मात करून विजय मिळवला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात दक्षिण विभाग-I ने उत्तर पश्चिम विभागाचा पराभव करून स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.
पश्चिम विभाग-I चा शिव याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, तर संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीसाठी कॉर्पोरेट सेंटरच्या प्रवीण कुमारला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. दक्षिण विभाग -I च्या चुक्का लवन कुमारला 'बेस्ट डिफेंडर', उत्तर दक्षिण विभागाच्या राजपाल दाराला 'बेस्ट अटॅकर' (स्मॅशर) आणि पश्चिम विभाग-I च्या मयुरेश कोलेकरला 'बेस्ट सेटर' पुरस्काराने गौरवण्यात आले.

विजेतेपद पटकावणाऱ्या 'पश्चिम विभाग -I संघात अंशुल, आशिष, मयुरेश, कुलदीप, युपेश, मनोज, शिव आणि भूपेंद्र यांचा समावेश होता. या सर्वांनी आपल्या सांघिक कामगिरीने आणि दृढनिश्चयाने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
पश्चिम विभाग -I चे कार्यकारी संचालक अशोक कुमार बेहरा यांच्या हस्ते विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (एएम) रजनीश तिवारी आणि मुख्य महाव्यवस्थापक (एचव्हीडीसी टीएलसी) विनोद कुमार उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व सहभागी संघांचे अभिनंदन केले आणि खेळाडूंच्या खिलाडूवृत्ती, शिस्त, समर्पण व सांघिक भावनेचे कौतुक केले.
या स्पर्धेने 'पॉवरग्रिड'च्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना एकमेकांमधील मैत्री अधिक दृढ करण्याची, शारीरिक तंदुरुस्ती जोपासण्याची, तसेच निरोगी स्पर्धा आणि परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. बक्षीस वितरण समारंभाने या स्पर्धेची सांगता झाली. शेवटी, सर्व सहभागी खेळाडू, अधिकारी आणि आयोजकांचे आभार मानण्यात आले.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai