Posted On:
28 OCT 2026 7:17PM by PIB Mumbai
गोवा, 28 ऑक्टोबर 2026
टपाल विभागाच्या गोवा विभागामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (आयपीपीबी) सहकार्याने 1 नोव्हेंबर 2026 पासून संपूर्ण गोव्यात ‘जीवन प्रमाण’ सेवेद्वारे हयातीचा डिजिटल दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ केंद्र सरकार, गोवा राज्य सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निवृत्तीवेतनधारकांना घेता येईल. त्यांना दरवर्षी सादर करावा लागणारा हयातीचा दाखला टपाल कार्यालयात जाऊन किंवा घरबसल्या सादर करता येणार आहे.
देशव्यापी ‘डिजिटल हयात दाखला 5.0’ मोहिमेअंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. दुर्गम भागांत राहणाऱ्या तसेच प्रवास करून टपाल कार्यालयात जाणे शक्य नसलेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी टपाल कर्मचारी आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आधार-आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे बोटांचे ठसे किंवा चेहऱ्याच्या प्रमाणीकरणाचा वापर करून डिजिटल हयातीचा दाखला तयार केला जातो. प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर हा दाखला डिजिटल स्वरूपात तयार होतो आणि त्याबाबतची पुष्टी करणारा एसएमएस निवृत्तीवेतनधारकाला पाठवला जातो. त्यानंतर हा दाखला संबंधित निवृत्तीवेतन वितरित करणाऱ्या प्राधिकरणाकडे उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ होते.
केवळ 70 रुपयांत घरपोच सेवा
घरपोच डिजिटल हयातीचा दाखला तयार करून देण्यासाठी प्रत्येक यशस्वीरीत्या तयार झालेल्या दाखल्यामागे जीएसटीसह केवळ 70 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय घरपोच सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना वार्षिक हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँक किंवा कोषागार कार्यालयात जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
ही सुविधा कशी मिळवावी?
- गोव्यातील निवृत्तीवेतनधारक खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून हयातीचा डिजिटल दाखला सादर करण्यासाठी विनंती नोंदवू शकतात.
- पोस्ट इन्फो ॲप: पोस्ट इन्फोच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे सेवेसाठी विनंती नोंदवावी.
- फोनद्वारे नोंदणी: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेशी (IPPB) खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
- उत्तर गोवा : 9218302131
- दक्षिण गोवा :9218302130
- जवळचे टपाल कार्यालय: हयातीचा डिजिटल दाखला सादर करण्यासाठी मदत मिळविण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयाला भेट द्यावी किंवा तेथे संपर्क साधावा.
सेवेसाठी विनंती नोंदवताना निवृत्तीवेतनधारकांनी आपला आधार क्रमांक, आधारशी संलग्न नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, निवृत्तीवेतन प्रदान आदेश (PPO) क्रमांक किंवा निवृत्तीवेतन ओळख क्रमांक तसेच बँक खात्याचा तपशील तयार ठेवावा.
या उपक्रमाच्या माध्यमातून टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा (IPPB) गोव्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी वार्षिक हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि सोयीस्कर करण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तसेच बँका किंवा सरकारी कार्यालयांपर्यंत जाण्यास अडचणी येणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.

* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa