पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात 29 व्या एनर्जी टेक्नॉलॉजी मीटचे (ईटीएम) उद्घाटन, नवोन्मेष आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षा प्राधान्यक्रमांवर भर


गोव्यातील ईटीएम 2026 मध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाला पुढे नेण्यासाठी आणि भारताच्या ऊर्जा परिसंस्थेला मजबूत करण्यासाठी आले उद्योग प्रमुख एकत्र

Posted On: 27 OCT 2026 9:17PM by PIB Mumbai

पणजी, 27 ऑक्टोबर 2026

भारताचे ऊर्जा भविष्य घडवणाऱ्या नवोन्मेषाचा शोध घेण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग प्रमुख, संशोधक आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या 29 व्या एनर्जी टेक्नॉलॉजी मीटचा आज गोव्यातील ओएनजीसी ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते झाले.

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजी  द्वारे आयोजित आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड  द्वारे सह-आयोजित, या तीन दिवसीय संमेलनाची "ऊर्जा नवोन्मेषाला गती देणे: संशोधनापासून व्यावसायिकीकरणापर्यंत" ही संकल्पना आहे. संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीतील सहकार्य मजबूत करणे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा विकास व व्यावसायिक स्वीकार गतिमान करणे हा या मंचाचा उद्देश आहे.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून,  हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार पलकी शर्मा उपाध्याय यांच्यासोबत अनौपचारिक चर्चेत  सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ऊर्जा सुरक्षा, परवडणारी ऊर्जा, ऊर्जा संक्रमण  आणि एलपीजी  पुरवठ्याचे विविधीकरण यासह भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख प्राधान्यक्रमांवर चर्चा केली.

मंत्र्यांनी प्रदर्शनातील स्टॉल्सना देखील भेट दिली, जिथे तंत्रज्ञान प्रदाते, प्रक्रिया परवानाधारक , अभियांत्रिकी कंपन्या आणि ऊर्जा कंपन्यांनी डाउनस्ट्रीम हायड्रोकार्बन क्षेत्रासाठी उत्पादने, तंत्रज्ञान आणि उपायांचे प्रदर्शन केले. प्रदर्शनाने भागधारकांना ज्ञान देवाणघेवाण करण्याची, तांत्रिक प्रगतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आणि उद्योगातील उदयोन्मुख आव्हानांवर उपाय शोधण्याची संधी उपलब्ध करून दिली.

पहिल्या दिवसाच्या चर्चेत भारताच्या ऊर्जा मिश्रणाचे विविधीकरण करणे आणि अंतर्गत ऊर्जा उत्पादनाला बळकट करणे या उद्देशाने हाती घेतलेल्या प्रमुख सरकारी उपक्रमांवरही भर देण्यात आला. कॉम्प्रेस्ड बायो-गॅस उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी आणि चक्राकार  जैव-अर्थव्यवस्थेच्या  वाढीस पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय चक्राकार  जैव-ऊर्जा योजना असणाऱ्या गोबरधन योजनेसाठी आर्थिक वर्ष 2026-27 ते आर्थिक वर्ष 2035-36 करिता 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रयत्नांना पूरक म्हणून, समुद्रातील खोल आणि अति-खोल पाण्यातील भागात तेल व वायूचा शोध वेगाने घेण्यासाठी, अंतर्गत संसाधन विकास बळकट करण्यासाठी आणि भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेत योगदान देण्यासाठी राष्ट्रीय ऑफशोअर शोध योजना असणाऱ्या 'समुद्र मंथन' योजनेसाठी आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत 84,084 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

ग्राहककेंद्री पुरवठा लवचिकता मजबूत करणे, इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि ग्राहकांसाठी परवडणारी किंमत टिकवून ठेवणे या संदर्भात एलपीजी  विविधीकरण हे देखील प्रमुख लक्ष केंद्रित क्षेत्रांपैकी एक ठरले. चर्चेदरम्यान, देशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा स्रोतांचे विविधीकरण करण्यावर आणि अधिक लवचिक ऊर्जा परिसंस्था विकसित करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला. मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधून भारताच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य केले, ज्यामध्ये इंधनाची उपलब्धता, ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण करण्यासाठीचे उपक्रम यांचा समावेश होता. 

हा मेळावा 29 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून त्यात तांत्रिक सादरीकरणे, पॅनेल चर्चा, पोस्टर सत्रे आणि प्रदर्शनाचा समावेश आहे. हरित हायड्रोजन, शाश्वत विमान इंधन, कार्बन कॅप्चर, क्रूड-टू-केमिकल्स, जैवइंधन आणि वायू-आधारित ऊर्जा या प्रमुख क्षेत्रांवर यामध्ये भर दिला जात आहे. हा उपक्रम तांत्रिक प्रगतीचे व्यावसायिकदृष्ट्या व्यावहारिक उपायांमध्ये रूपांतर करण्याच्या संधी शोधण्यासाठी आणि संशोधन व उद्योगविषयक दृष्टिकोन सामायिक करण्यासाठी भारतातील व परदेशातील तज्ज्ञांना एकत्र आणतो.

MC² इग्नाइटने ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेष अधोरेखित केला, तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयासोबतच्या  एका सत्रात भारतातील स्टार्ट-अप परिसंस्थेच्या निर्मितीचा शोध घेण्यात आला. या कार्यक्रमात स्टार्ट-अप पुरस्कार आणि रिफायनरी परफॉर्मन्स अँड इनोव्हेशन पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले, ज्याद्वारे संपूर्ण ऊर्जा उद्योगातील तांत्रिक प्रगती आणि नवोन्मेषाचा गौरव करण्यात आला. 29 वी आवृत्ती नवीकरणीय ऊर्जा, मोबिलिटी, तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल्स, संशोधन आणि विकास संस्था, सल्लागार संस्था, प्रक्रिया परवानाधारक, उत्प्रेरक उत्पादक (आणि अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम  कंपन्यांमधील क्षेत्रतज्ज्ञ आणि प्रतिनिधींना एकत्र आणते. या संमेलनात फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री  द्वारे आयोजित आर अँड डी  कॉन्क्लेव्हचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये नेट झिरो  रिफायनरीज, ऊर्जा कार्यक्षमता, हरित हायड्रोजन, बायोमास व्हॅलोरायझेशन, पाणी व्यवस्थापन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जात आहे, तसेच भारतातील ऊर्जा क्षेत्रातील नवोन्मेषाला गती देण्यासाठी सहकार्याला प्रोत्साहन दिले जात आहे.

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2329226) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English