Posted On:
27 OCT 2026 8:38PM by PIB Mumbai
पणजी, 27 ऑक्टोबर 2026
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारताच्या स्वदेशी संरक्षण जहाजबांधणी प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जीएसएल द्वारे भारतीय नौदलासाठी बांधण्यात आलेल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल व्हेसल पुढच्या पिढीची समुद्रातील गस्ती नौका - आयएनएस सृष्टी (यार्ड 1283) चे जलावतरण करण्यात आले. हे पाऊल प्रगत आणि स्वदेशी बनावटीच्या नौदल प्लॅटफॉर्मद्वारे देशाची सागरी क्षमता बळकट करण्याच्या जीएसएलच्या निरंतर योगदानावर प्रकाश टाकते.
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड, वाडेम, गोवा येथे आयोजित एका समारंभात संदीप सहाय यांच्या हस्ते या जहाजाचे जलावतरण करण्यात आले. संरक्षण वित्त सचिव विश्वजित सहाय हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी जीएसएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांच्यासह भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यार्ड 1283 चे जलावतरण हे या जहाजाच्या भारतीय नौदलातील कार्यान्वित होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑफशोअर गस्ती नौका सागरी देखरेख, सागरी मालमत्तेचे संरक्षण आणि भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे जहाज भारतीय नौदल आणि भारतातील देशांतर्गत जहाजबांधणी उद्योग यांच्यातील निरंतर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करते.
संरक्षण वित्त सचिव विश्वजित सहाय यांनी मछलीपट्टणम येथे प्रस्तावित असलेल्या जहाजबांधणी प्रकल्पाबद्दल गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, स्वदेशी जहाजबांधणीसाठी दीर्घकालीन वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी उत्पादकता वाढवणे, किफायतपणा राखणे आणि वेळेवर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जीएसलची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील विकासासाठी त्यांनी डिजिटल नियोजन, प्रमाणित डिझाइन्स आणि करारांची कार्यक्षम अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
उपस्थितांना संबोधित करताना, जीएसएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी दर्जेदार नौदल प्लॅटफॉर्म पुरवण्याच्या आणि भारतीय नौदलाच्या कार्यात्मक गरजांना पाठिंबा देण्याच्या शिपयार्डच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, प्रत्येक टप्पा देशाच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेमध्ये जीएसएल ची भूमिका अधिक बळकट करतो आणि संरक्षण उत्पादनात स्वावलंबन साधण्याच्या राष्ट्रीय ध्येयाला पुढे नेतो.
या जहाजाचे जलावतरण हे जीएसएलची उत्पादन क्षमता वाढवण्यावर, प्रकल्प अंमलबजावणीच्या कार्यक्षम पद्धतींचा अवलंब करण्यावर आणि कडक तांत्रिक व गुणवत्ता मानके पूर्ण करणारी जटिल जहाजे तयार करण्यावर दिला जात असलेला भर दर्शवते. हे शिपयार्ड भारताच्या सागरी सुरक्षा दलांसाठी विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्मची रचना, बांधकाम आणि पुरवठा करण्यातील आपल्या नैपुण्याला सातत्याने विकसित करत आहे.
एनजीओपीव्ही कार्यक्रम, स्वदेशी जहाजबांधणी क्षमता बळकट करून आणि भारतीय उद्योगांसाठी संधी निर्माण करून, भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या ध्येयाशी सुसंगत आहे. भारतीय नौदल आणि त्यांच्या औद्योगिक भागीदारांशी घनिष्ठ समन्वय साधून, जीएसएल देशांतर्गत भक्कम संरक्षण औद्योगिक पाया उभारण्यात आणि प्रगत सागरी प्लॅटफॉर्मच्या विकासामध्ये योगदान देत आहे.
एनजीओपीव्ही यार्ड 1283 च्या लाँचिंगद्वारे, गोवा शिपयार्ड लिमिटेड राष्ट्रनिर्मिती, तांत्रिक प्रगती आणि सागरी क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करते. हा टप्पा भारताच्या संरक्षण सज्जतेमध्ये एक धोरणात्मक भागीदार म्हणून जीएसए'ची निरंतर भूमिका आणि भारताच्या स्वावलंबी सागरी शक्ती बनण्याच्या प्रवासातील त्याचे योगदान दर्शवतो.


_20261027194033_88b9c6.jpeg)
_20261027194045_9a99f7.jpeg)
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai