Posted On:
26 OCT 2026 7:21PM by PIB Mumbai
मुंबई, 26 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या मुंबई प्रादेशिक केंद्रातर्फे (एनएडीटी-आरसी) मुंबई येथे आयकर विभागातील नवनियुक्त थेट भरती कार्यालय अधीक्षकांसाठी (ओएस) आयोजित ‘नवोदय-2026’ या 30 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला आज प्रारंभ झाला. हा कार्यक्रम मुंबई, पुणे आणि ठाणे येथील तीन मंत्रालयीन कर्मचारी प्रशिक्षण केंद्रांमध्ये (एमएसटीयू) एकाच वेळी सुरू झाला असून, त्यात 400 हून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
हा कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, कारण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) कार्यालय अधीक्षक (गट 'ब' पद) भरती नियम, 2024 अंतर्गत प्रथमच थेट भरतीद्वारे कार्यालय अधीक्षक संवर्गातील पदे भरण्यात आली आहेत. 20 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या रोजगार मेळ्यानंतर, आर्थिक वर्ष 2026-27 दरम्यान देशभरातून सुमारे 6,626 थेट भरती झालेले कार्यालय अधीक्षक विभागात रुजू झाले आहेत. एका वर्षात मंत्रालयाने संवर्गात झालेली ही अभूतपूर्व भरती आहे.
या देशव्यापी प्रशिक्षण उपक्रमात एनएडीटी-आरसी मुंबई महत्त्वाची भूमिका बजावत असून, मुंबई आणि पुणे विभागांमधील 1,438 थेट भरती झालेल्या कार्यालय अधीक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
मुंबईत येथे प्राप्तिकर विभागाचे (आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण किंमत निर्धारण), पश्चिम विभागाचे मुख्य आयुक्त मोहित जैन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे स्वागत करून कार्यक्षम, तंत्रज्ञान-आधारित आणि करदात्यांसाठी अनुकूल प्रशासन सुनिश्चित करण्यात त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. नवनियुक्तांनी कायदा, कार्यपद्धती आणि कार्यालयीन व्यवस्थापनाची सखोल समज विकसित करावी असे आवाहन जैन यांनी केले.

एनएडीटी-आरसी मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर यांनी विभागातील यशस्वी कारकिर्दीसाठी सचोटी, सहानुभूती, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सतत शिकण्याच्या महत्त्वावर भर दिला.
पुण्यात प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्त राहुल रमण यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व्यावसायिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाशी जोडून घेण्याची क्षमता आणि लोकसेवेप्रती वचनबद्धतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

ठाण्यात प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्त डॉ. सरिता मिश्रा कोल्हे यांनी ठाणे, कल्याण, पनवेल आणि पालघर येथे नियुक्त अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. मंत्रालयीन अधिकारी हे विभागाचा प्रशासकीय कणा असतात, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थींनी व्यावसायिक दृष्टिकोन, नियम आणि प्रक्रियांचे काटेकोर पालन आणि करदात्यांप्रति सहानुभूती जोपासावी असे आवाहन त्यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात 30 प्रशिक्षण दिवस आणि 180 सत्रांचा समावेश आहे. यामध्ये वर्गातील शिक्षण, आय-गॉट कर्मयोगी मॉड्यूल, वेबकास्टिंग आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हा उपक्रम, मिशन कर्मयोगी अंतर्गत विभागीय क्षमता बळकट करण्यासाठी तसेच कुशल, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्याप्रति सीबीडीटीच्या प्रशिक्षण संचालनालयाची वचनबद्धता दर्शवतो.
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai