कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशेष मोहीम 6 अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती


भंगार सामानाच्या विल्हेवाटीतून 22.72 कोटी रुपयांचा महसूल जमा; साडे सहा लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील 300 ठिकाणांची स्वच्छता

Posted On: 26 OCT 2026 4:27PM by PIB Mumbai

नागपूर,  26 ऑक्टोबर 2026

कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने 22 ऑक्टोबर 2026 पर्यंतच्या अहवालानुसार, विशेष मोहीम 6 अंतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे शंभर टक्के साध्य केली आहेत. स्वच्छता, भंगार सामानाची कार्यक्षम विल्हेवाट, प्रलंबित शासकीय नोंदी आणि फायलींची संख्या कमी करणे तसेच कामाच्या ठिकाणांचे व्यवस्थापन सुधारणे या विषयी डब्ल्यूसीएलची बांधिलकी या यशातून दिसून येते.

या मोहिमेअंतर्गत डब्ल्यूसीएलने साडे सहा लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील 300 ठिकाणांची स्वच्छता केली. कंपनीने 539.65 मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट लावून त्यातून 22,71,89,950.95 रुपयांचा महसूल मिळवला. या प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, भंगाराचे पद्धतशीर व्यवस्थापन करणे आणि उपलब्ध जागेचा उत्पादक वापर करणे शक्य झाले.

प्रशासकीय कार्यक्षमता आणि अभिलेख व्यवस्थापनाच्या क्षेत्रात डब्ल्यूसीएलने 500 प्रत्यक्ष फायलींचा आढावा घेऊन त्या सर्व बंद केल्या. आढावा घेतलेल्या प्रत्यक्ष फायलींपैकी 100 टक्के फायली बंद करण्याचे उद्दिष्ट, कंपनीने साध्य केले आहे. त्याशिवाय, कंपनीने 7,500 इलेक्ट्रॉनिक फायलींचा आढावा घेतला आणि अभियानाच्या अहवालानुसार, 7,650 इलेक्ट्रॉनिक फायली बंद केल्या. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करणे, शासकीय दस्तऐवजांचे व्यवस्थापन करणे आणि अधिक कार्यक्षम तसेच जबाबदार कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणे यावर डब्ल्यूसीएलचा भर असल्याचे या प्रयत्नांतून दिसून येते.

विशेष मोहीम 6 चे उद्दिष्ट, स्वच्छतेच्या सवयी संस्थात्मक स्वरूपात रुजवणे, कालबाह्य साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट लावणे, प्रलंबित कामांचा अनुशेष कमी करणे आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे हे असून यासाठी डब्ल्यूसीएलकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. निश्चित उद्दिष्टांची पूर्तता ही मोहिमेच्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी डब्ल्यूसीएलच्या संबंधित विभागांनी आणि आस्थापनांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांचे फलित आहे.

या कामगिरीच्या माध्यमातून डब्ल्यूसीएलने स्वच्छता, सुशासन, अभिलेखांचे प्रभावी व्यवस्थापन आणि अधिक कार्यक्षम कार्यालये निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या उपक्रमांविषयीची आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

 
 

पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2328514) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English