शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा इथे राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेद्वारे लोकशाही मूल्ये आणि संसदीय कार्यपद्धतीचे दर्शन


- लोकशाही बळकट करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची – प्रा. कुमुद शर्मा

Posted On: 25 OCT 2026 3:14PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने 18 वी गटस्तरीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2026 शनिवारी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा इथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध विभागांतील एकूण 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संसदेतील विविध भूमिका साकारत शिक्षण, आरोग्यसेवा, बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांसारख्या विषयांवर चर्चा केली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाची माहिती मिळण्यासोबतच आपले वादविवाद आणि वक्तृत्व कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.

विद्यापीठाच्या कस्तुरबा सभागृहात कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा झाली. कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या गट 6 चे समन्वयक प्रा. प्रल्हाद माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाचे संचालक प्रा. रविशंकर मोरे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. कुमुद शर्मा यांनी सांगितले की, लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून ते राष्ट्राच्या विकासाचा कणा आहेत. समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यात युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी विविध विषयांवरील विद्यार्थ्यांची स्पष्ट मते आणि तार्किक विचारसरणीचे विशेष कौतुक केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या 55 विद्यार्थ्यांपैकी 21 महिला विद्यार्थिनींच्या सहभागाचा उल्लेख करत, हे नारी शक्ती वंदन या  भावनेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रा.प्रल्हाद माने व प्रा.रविशंकर मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले व शिक्षण, आरोग्य सेवा, क्रीडा, बेरोजगारी, महागाई व शेतकरी प्रश्नांवर झालेल्या चर्चेतून त्यांच्यातील सजगता, प्रतिभा आणि वक्तृत्व कौशल्याचे दर्शन घडल्याचे व्यक्त केले. सक्तीचे मतदान प्रस्तावित करणारे विधेयकही यावेळी मांडण्यात आले आणि कामकाजादरम्यान त्यावर चर्चा करण्यात आली.

55 मिनिटांच्या या सत्रात सहभागींनी विविध विषयांवर आणि सरकारी योजनांवर चर्चा केली. कामकाजात शून्य तास, शपथविधी, शोकप्रस्ताव आणि सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा यांचा समावेश होता, ज्यामुळे संसदेच्या कामकाजाची माहिती, विद्यार्थ्यांना मिळाली. लोकसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान, लोकसभेचे महासचिव, विरोधी पक्षनेते आणि इतर मंत्री अशा भूमिका विद्यार्थ्यांनीच साकारल्या .

यावेळी सहा विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. लोकसभा अध्यक्षांची भूमिका साकरणाऱ्या दिव्या महारनवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रियांशू कुमार दुसऱ्या क्रमांकावर होते. पंतप्रधानांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जनसंवाद विभागातील शिया या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावला. अंकिता थूल, अमन मौर्य आणि मोनिका यांनी संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले. विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

युथ पार्लमेंटचे सहयोगी प्राध्यापक व समन्वयक डॉ. बालाजी चिरडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर अनुवाद अभ्यास विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. मीरा निचळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

पाहुण्यांचे शाल, सुती हार, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली आणि राष्ट्रगान आणि राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाला अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

***

राधिका अघोर/नितीन गायकवाड/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2328203) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English