गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी खारघर येथे सीआयएसएफतर्फे 10 किलोमीटर सायक्लोथॉनचे आयोजन

Posted On: 24 OCT 2026 12:16PM by PIB Mumbai

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षा गटातर्फे आज सकाळी सुमारे 6 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील खारघर येथे 10 किलोमीटर सायक्लोथॉन घेण्यात आली. शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे, सीआयएसएफबाबत जनजागृती करणे, तसेच पर्यावरण संवर्धन, शाश्वत वाहतूक आणि सायकल चालवण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या दलाच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचा हा उपक्रम एक भाग आहे.

नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या सेंट्रल पार्कमध्ये मुंबई विमानतळाचे उपमहानिरीक्षक आणि मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी दीपकअग्रवाल यांनी  झेंडा दाखवून सायक्लोथॉनला सुरुवात केली. या सायक्लोथॉनमध्ये संरक्षिका सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित पथकातील सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शारीरिक तंदुरुस्ती राखणे, पर्यावरणाबाबत जनजागृती करणे आणि स्थानिक समुदायाशी संपर्क अधिक दृढ करणे याबाबत सीआयएसएफ कर्मचाऱ्यांची कटिबद्धता या उपक्रमातून दिसून आली.

सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीची संस्कृती रुजवणे, हा या सायक्लोथॉनचा उद्देश होता. तसेच, विमानतळे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि देशाची सेवा करण्यामध्ये सीआयएसएफ बजावत असलेली भूमिका अधोरेखित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार सवयी अंगीकारण्याचे आणि अधिक स्वच्छ व हरित पर्यावरणासाठी योगदान देण्याचे महत्त्वही या उपक्रमातून पटवून देण्यात आले.

सीआयएसएफचे दक्षिण विभागाचे विशेष महासंचालक आयपीएस पद्माकर एस. रणपिसे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच, सर्व सहभागींच्या उत्साहाचे आणि सक्रिय सहभागाचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनाच्या कामात समर्पित भावनेने प्रयत्न केल्याबद्दल उपमहानिरीक्षक तथा मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी दीपक अग्रवाल यांनी आयोजकांचे कौतुक केले.

सायक्लोथॉन सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अग्रवाल यांनी नवी मुंबई पोलीस, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि इतर संबंधित यंत्रणांचे आभार मानले.

शारीरिक तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन, सांघिक कार्य आणि समाजातील सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित करत या सायक्लोथॉनची सांगता झाली. या उपक्रमातून सीआयएसएफची कार्यनिष्ठा आणि कटिबद्धता दिसून आली.

***

आशिष सांगळे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2327950) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English