Posted On:
23 OCT 2026 8:19PM by PIB Mumbai
गोवा, 23 ऑक्टोबर 2026
गोवा राज्यस्तरीय बँकर्स समितीने 23 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यातील सत्तारी तालुक्यातील होंडा ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक समावेशन शिबिराचे आयोजन केले. आर्थिक समावेशनाशी संबंधित योजना आणि बँकिंग सेवांचा लाभ नागरिकांना घेता यावा, हा या शिबिराचा उद्देश होता.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. त्यांनी ग्रामस्थांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या आर्थिक समावेशनाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेण्याची सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच बँक खात्यांमधील ग्राहक ओळख पडताळणीची प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच पुनर्पडताळणीसाठीही सुविधा देण्यात आली.
या प्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक अनुप चंद्रन, भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक आणि गोवा राज्यस्तरीय बँकर्स समितीचे संयोजक कार्लोस रॉड्रिग्ज, तसेच भारतीय रिझर्व्ह बँक आणि विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने 21 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत सुरू केलेल्या देशव्यापी विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. विमा आणि पेन्शन योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे, किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे आणि बँक खात्यांमधील ग्राहक ओळख पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. पात्र नागरिकांना या सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
गोवा राज्यस्तरीय बँकर्स समितीची संयोजक बँक, म्हणून भारतीय स्टेट बँक या मोहिमेवर देखरेख ठेवत आहे. यासाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांच्या अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांशी समन्वय साधण्यात येत आहे.



* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai