गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनडीआरएफचे महासंचालक पीयूष आनंद यांनी सुरादेवी इथल्या एनडीआरएफ अकादमीतल्या प्रशिक्षण सुविधा आणि विकासकामांचा घेतला आढावा

Posted On: 23 OCT 2026 6:30PM by PIB Mumbai

नागपूर, 23 ऑक्‍टोबर 2026

 

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक पीयूष आनंद यांनी 23 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर जवळच्या सुरादेवी इथल्या एनडीआरएफ अकादमीच्या नवीन परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

16 फेब्रुवारी 2026 रोजी नवीन परिसरात कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यापासून अकादमीने प्रशिक्षणविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. भेटीदरम्यान महासंचालकांनी श्वान प्रशिक्षण सत्रांसह विशेष प्रशिक्षण सरावाची पाहणी केली. तसेच संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि नव्याने बसविण्यात आलेली सौरऊर्जा यंत्रणा यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही आढावा घेतला.

   

पीयूष आनंद यांनी अकादमीतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विशेष संवाद सत्र आयोजित केले. नवीन परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या समर्पित प्रयत्नांची आणि बांधिलकीची त्यांनी प्रशंसा केली. व्यावसायिकतेचे उच्च निकष कायम राखण्याचे आणि संस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कारवाईदरम्यान दाखविलेल्या असामान्य धैर्याची आणि निःस्वार्थ सेवेची दखल घेत महासंचालकांनी दोन कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल प्रतिष्ठित महासंचालक पदक आणि प्रशस्तिपत्र प्रदान केले.

या भेटीमुळे प्रशिक्षण क्षमतेचे बळकटीकरण, आपत्तींचा सामना करण्यासाठीची सज्जता वाढविणे आणि पायाभूत सुविधांचा सातत्यपूर्ण विकास, तसेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन कार्यात्मक उत्कृष्टता साध्य करणे याविषयी एनडीआरएफची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली.

   

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327626) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English