Posted On:
23 OCT 2026 6:13PM by PIB Mumbai
गोवा, 23 ऑक्टोबर 2026
"खेत बचाओ’’अभियानांतर्गत, गोवा येथील आयसीएआर-केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्थेने (सीसीएआरआय) 23 ऑक्टोबर रोजी दिवार गावात आणि संस्थेच्या परिसरात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये शाश्वत शेती, मृदा आरोग्य आणि रासायनिक घटकांवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात आला.
दिवार गावातील कार्यक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीची तत्त्वे आणि पद्धतींबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये जमिनीचा कस सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधने, सेंद्रिय खते, जैविक घटक आणि पर्यावरणपूरक पीक व्यवस्थापन पद्धतींचा वापर करण्यावर चर्चा करण्यात आली.
दुसरा कार्यक्रम आयसीएआर-केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित करण्यात आला होता. यात दक्षिण गोव्यातल्या बाली गावचे शेतकरी आणि गोवा विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये शेतीचा खर्च कमी करणे, मृदा आरोग्य राखणे, जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत अन्न उत्पादनाला चालना यांमध्ये नैसर्गिक- सेंद्रिय शेतीची भूमिका याविषयी सहभागींना माहिती देण्यात आली.
या सत्रांमध्ये गोव्याच्या कृषी-हवामान परिस्थितीनुसार या शेती पद्धतींचा अवलंब करण्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच पर्यावरणदृष्ट्या शाश्वत कृषी पद्धती आणि शेतीची दीर्घकालीन व्यवहार्यता यांवर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमांसाठीचे समन्वयन आयसीएआर-केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्थेतील नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ (ऍग्रोनॉमी) डॉ. परमेश व्ही आणि तांत्रिक अधिकारी शशी विश्वकर्मा यांनी केले.
_20261023181726_af1754.jpeg)

* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa