आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी मुंबईतील सिडको अर्बन हाट ‘आदि महोत्सव 2026’ चे उद्घाटन


आदिवासींचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक हस्तकला आणि उद्योजकतेचे दर्शन घडविणारा आठ दिवसीय राष्ट्रीय महोत्सव

Posted On: 23 OCT 2026 7:47PM by PIB Mumbai

मुंबई, 23 ऑक्‍टोबर 2026

 

भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित (TRIFED) यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सव ‘आदि महोत्सव 2026’ चे उद्घाटन आज नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सिडको अर्बन हाट येथे करण्यात आले. 23 ते 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा उद्देश आदिवासी उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, भारताचा समृद्ध आदिवासी वारसा जतन करणे आणि आदिवासी कारागीर व उत्पादकांसाठी बाजारपेठेच्या संधींचा विस्तार करणे हा आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (MSRLM) मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचे (NIFT), मुंबईचे संचालक प्रा. डॉ.अजित कुमार खरे उपस्थित होते. TRIFED च्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक/प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. तरुल डी. भावसार यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

या आठ दिवसीय प्रदर्शन व विक्री महोत्सवात देशाच्या विविध भागांतील अस्सल आदिवासी उत्पादनांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये पारंपरिक हस्तकला, हातमागावरील वस्त्रे, पारंपरिक दागिने, आदिवासी चित्रकला, बांबू व वेतापासून तयार केलेल्या वस्तू, धातुकामातून साकारलेली उत्पादने, वनाधारित उत्पादने आणि मूल्यवर्धित आदिवासी उत्पादने यांचा समावेश आहे. या महोत्सवामुळे आदिवासी कारागीर, उत्पादक गट आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयं-सहायता गटांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी, ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आणि उपजीविकेच्या संधी बळकट करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

उद्घाटन समारंभात पालघर येथील आदिवासी पथकाने सादर केलेल्या पारंपरिक तारपा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमात सांस्कृतिक रंगत आणली. या सादरीकरणातून महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि लोककलांचे दर्शन घडले.

आदि महोत्सव हा आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक विकास आणि स्वदेशी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. आदिवासी उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करून बाजारपेठेतील दुवे मजबूत करणे, शाश्वत उपजीविकेला चालना देणे आणि ‘व्होकल फॉर लोकल’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आदि महोत्सव 2026 ला भेट द्यावी, असे आवाहन TRIFED च्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवात नागरिकांना भारतातील विविध आदिवासी कला, हस्तकला आणि परंपरांचा अनुभव घेता येईल तसेच खरेदीच्या माध्यमातून आदिवासी कारागिरांना थेट पाठबळ देता येईल. दिवाळीच्या सणानिमित्त अस्सल आदिवासी उत्पादनांची भेटवस्तू म्हणून निवड करून भारतीय सांस्कृतिक वैविध्याचा सन्मान करण्याची संधीही या महोत्सवातून उपलब्ध झाली आहे.

'आदि महोत्सव 2026' हे 23 ते 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दररोज सकाळी 11:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत सिडको अर्बन हाट, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | नितीन फुल्‍लुके/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327617) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English