इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
Posted On:
23 OCT 2026 7:31PM by PIB Mumbai
गोवा, 23 ऑक्टोबर 2026
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डिजिटल इंडिया महामंडळाच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने गोवा एआय टेक कॉन्क्लेव्ह 2026 म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान परिषद 2026 मध्ये सहभाग घेतला. 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी पणजी इथल्या आयनॉक्समध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेची संकल्पना ‘लोक, पृथ्वी आणि प्रगती यांच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ अशी होती.
परिषदेच्या उद्घाटन सत्रातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे भाषिणीच्या कोकणी लार्ज लँग्वेज मॉडेलचे अनावरण. यावेळी भाषिणीच्या पथकाने या उपक्रमाचे सादरीकरणही केले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालींना मजकूर आणि भाषणाच्या माध्यमातून कोकणी भाषा समजून घेता यावी आणि ती निर्माण करता यावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. गोव्याच्या भाषिक अस्मितेशी जोडलेल्या भाषा तंत्रज्ञानाचा भक्कम पाया उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.

गोव्याच्या भाषिक सामर्थ्याचा आणि कोकणी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आधार या उपक्रमाला आहे. प्रभावी भाषा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भाषेतील शब्दसंपदा, अभिव्यक्ती, बोलण्याच्या पद्धती आणि सांस्कृतिक संदर्भ यांचे प्रतिबिंब उमटवणारी उच्च दर्जाची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. कोकणी भाषेसाठी देवनागरी ही अधिकृत लिपी असण्याबरोबरच रोमन आणि कन्नड या लिप्यांचाही वापर होतो. त्यामुळे कोकणी भाषेची समृद्ध विविधता प्रतिबिंबित करणारी भाषिक साधनसामग्री विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
उद्घाटन सत्रात भाषिणीने कोकणी लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करण्यासाठी अवलंबलेल्या दृष्टिकोनाचे सादरीकरण केले. यामध्ये उच्च दर्जाची भाषिक माहिती, मजकूरनिर्मिती आणि मानवी पडताळणी यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. ‘भाषा दान’ आणि प्रस्तावित ‘डेटा दान’ प्रायोगिक उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था, भाषातज्ज्ञ आणि कोकणी भाषिक समुदाय यांना एकत्र आणता येईल. त्यामुळे भाषिक साधनसामग्रीचा विस्तार होऊन कोकणी भाषेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा पाया अधिक मजबूत होईल, असे या सादरीकरणात नमूद करण्यात आले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संदर्भात भाषिणी आणि ‘भाषा दान’ उपक्रमाविषयी विचार मांडले. गोवा सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरेतील ज्ञान आणि गोव्याचा सांस्कृतिक वारसा यांचे संशोधन, दस्तऐवजीकरण आणि जतन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मोठी क्षमता असल्याचे अधोरेखित केले.
भारतीय ज्ञानप्रणाली आणि वारसा बुद्धिमत्ता यांसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाचाही त्यांनी उल्लेख केला. इतिहास, हस्तलिखिते, भाषा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचे जतन करण्यासाठी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे, ही या केंद्राची संकल्पना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर, मानवी देखरेख आणि सरकार, उद्योगक्षेत्र तसेच शैक्षणिक क्षेत्र यांच्यातले सहकार्य यांच्याही महत्त्वावर त्यांनी भर दिला.
गोव्यात प्रस्तावित असलेल्या डेटा दान या प्रायोगिक उपक्रमाचा उद्देश महाविद्यालये, भाषातज्ज्ञ, विविध संस्था आणि कोकणी भाषिक समुदायांना एकत्र आणणे हा आहे. राज्यातील भाषिक सामर्थ्याचा उपयोग करून अधिकाधिक मजकूर तयार करणे, त्याचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करणे आणि त्याची पडताळणी करणे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात डेटाला तेलाइतकेच महत्व असल्याचे भाषिणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे.

उद्घाटन सत्रादरम्यान भाषिणीच्या भाषा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि इतर मान्यवरांच्या भाषणांचे तत्काळ भाषांतर आणि लिप्यंतरण करणे शक्य झाले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोकणी भाषेतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून कोकणी भाषेत भाषांतर करून, विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमधील संवाद सुलभ करता येतो, हे या प्रात्यक्षिकातून दिसून आले.
भाषिणीच्या प्रदर्शन कक्षात आलेल्या नागरिकांना भाषा तंत्रज्ञानावर आधारित विविध सुविधा आणि त्यांचे उपयोग यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचे इंग्रजीत स्वागत करण्यात आले. भाषिणीच्या आवाजातून थेट भाषांतर करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने या स्वागताचे तत्काळ कोकणी भाषेत भाषांतर करण्यात आले. हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी भाषिणीच्या मोबाईल ॲपची आणि भाषा तंत्रज्ञानाच्या इतर उपयोगांचीही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. विविध भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी आणि भारतीय भाषांमधून डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता कशी उपयुक्त ठरू शकते, हे या प्रात्यक्षिकांमधून दाखवण्यात आले.
भाषा दान उपक्रमासोबतच ग्रंथिकाच्या माध्यमातून कोकणी भाषेतील पुस्तके, हस्तलिखिते आणि साहित्यकृती डिजिटल स्वरूपात जतन करता येणार आहेत. तसेच, लोककथा, स्थानिक इतिहास, ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी आणि त्यांच्या जीवनातील अनुभवही जतन करता येणार आहेत. या उपक्रमांमुळे कोकणी भाषा आणि तिचा सांस्कृतिक वारसा यांची डिजिटल स्वरूपातील माहिती संकलित होईल. ही माहिती पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध तंत्रज्ञानाच्या विकासासाठीही उपयुक्त ठरेल.
गोव्यात झालेल्या गोवा एआय टेक कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये भाषिणीच्या सहभागातून भाषा तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले. विविध भाषांमध्ये संवाद साधणे, डिजिटल सेवांचा लाभ घेणे सुलभ करणे आणि भारतीय भाषांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा विकास अधिक बळकट करणे, यामध्ये भाषा तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचे या सहभागातून दिसून आले.
डिजिटल इंडिया भाषिणी विभागाविषयी
डिजिटल इंडिया भाषिणी विभाग हा भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचा भाग आहे. भारतीय भाषांमध्ये डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे आणि या सेवा सर्वसामान्यांना सहज वापरता याव्यात, यासाठी हा विभाग काम करतो. भाषिणी या व्यासपीठावर विविध भाषांमधील माहिती, कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रारूपे, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस आणि विविध ॲप्स एकत्र आणण्यात आले आहेत. यामुळे भारतीय भाषांमध्ये डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे सोपे होते. भाषिणीच्या माध्यमातून 800 हून अधिक सरकारी संकेतस्थळांवर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या व्यासपीठावर आतापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने माहितीवर प्रक्रिया करण्याच्या एकूण 9 अब्जांहून अधिक नोंदी झाल्या आहेत. दररोज अशा 2 कोटी 40 लाखांहून अधिक प्रक्रिया केल्या जातात. भाषिणीच्या माध्यमातून मजकुरासाठी 36 भारतीय भाषा, आवाजासाठी 23 भारतीय भाषा आणि 35 परदेशी भाषांमध्ये काम करता येते.
* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/निखिलेश चित्रे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai