सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे 26 ऑक्टोबरपासून कसुती भरतकाम कार्यशाळेचे आयोजन


राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कारागीर उषा पवार देणार कर्नाटकच्या पारंपरिक कसुती भरतकाम कलेचे प्रशिक्षण

Posted On: 23 OCT 2026 4:28PM by PIB Mumbai

नागपूर, 23 ऑक्‍टोबर 2026

 

नागपूर इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे 26 ते 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कसुती भरतकाम कलेवरील पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत ही कार्यशाळा केंद्राच्या नागपूर येथील परिसरात होणार आहे. कर्नाटकच्या पारंपरिक भरतकाम कलेची सहभागी व्यक्तींना ओळख करून देणे आणि या वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेच्या जतनाला प्रोत्साहन देणे, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. 

या कार्यशाळेत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कारागीर उषा जे. पवार मार्गदर्शन करणार आहेत. कसुती भरतकाम कलेतील योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या क्षेत्रात त्यांना 35 वर्षांचा अनुभव असून, त्यांनी विविध नामांकित संस्थांमध्ये आयोजित कार्यशाळांमधून अनेकांना या पारंपरिक कलेचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच, त्यांनी अँकर थ्रेड्सच्या सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.

कसुती ही कर्नाटकातील अनेक शतकांची परंपरा असलेली भरतकाम कला आहे. या कलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बारीक टाके घालून सुंदर नक्षीकाम केले जाते. मंदिरांची रचना, रांगोळी आणि लोककलेतील गोष्टींवरून या नक्षी तयार केल्या जातात. या कार्यशाळेत सहभागींना गवंटी, मुरगी, नेगी आणि मेंथे या भरतकामाच्या चार पारंपरिक प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तूंवर हे भरतकाम कसे करावे, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. कर्नाटकच्या या पारंपरिक कलेची अधिकाधिक लोकांना, विशेषतः तरुण पिढीला, ओळख व्हावी आणि ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

ही कार्यशाळा दररोज दोन सत्रांमध्ये होणार असून सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत ही सत्रे पार पडतील. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर यांनी कलाप्रेमी, विद्यार्थी आणि हस्तकलेत रुची असलेल्या नागरिकांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या कार्यशाळेतून सहभागी व्यक्तींना कर्नाटकच्या पारंपरिक कसुती भरतकाम कला जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327387) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English