अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीआयसीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत जीएसटी सुधारणा आणि व्यवसाय सुलभतेबाबत व्यापारी संवाद बैठक

Posted On: 23 OCT 2026 2:53PM by PIB Mumbai

मुंबई, 23 ऑक्‍टोबर 2026

 

8 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या 57व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) देशव्यापी संवाद उपक्रमांतर्गत आज मुंबई येथे केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई विभागाच्या वतीने व्यापार व करदात्यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्रातील करदाते, विविध व्यापारी संघटना आणि वाणिज्य मंडळांचे सुमारे 150 प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीचे अध्यक्षस्थान सीबीआयसी चे अध्यक्ष विवेक चतुर्वेदी यांनी भूषविले. यावेळी सीबीआयसी (जीएसटी)चे सदस्य संजय मंगल, सीजीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त प्राची सरूप आणि महाराष्ट्र राज्य जीएसटी कर आयुक्त आशीष शर्मा उपस्थित होते. केंद्र व राज्य जीएसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रमुख व्यापारी संघटना आणि उद्योग संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

बैठकीत 57व्या जीएसटी परिषदेच्या अलीकडील शिफारशी आणि जीएसटी व्यवस्थेतील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जीएसटी नोंदणी प्रक्रियेचे सुलभीकरण, अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय प्रणाली-आधारित पद्धतीने परताव्यांची जलद प्रक्रिया, विवरणपत्रे भरण्याची प्रक्रिया सुलभ करणे, खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, आंतरराज्यीय मालवाहतुकीशी संबंधित प्रक्रियांचे सुलभीकरण तसेच लहान विक्रेते आणि निर्यातदारांसाठी अनुपालन सुलभ करणे या बाबींचा समावेश होता. करदात्यांवरील अनावश्यक दबाव कमी करणे आणि करदाते व सरकार यांच्यात भागीदारीची भावना वृद्धिंगत करणे या उद्देशाने अटक करण्याच्या अधिकारांमध्ये प्रस्तावित बदल तसेच अभियोजनासाठीची मर्यादा वाढविण्यासारख्या उपायांवरही प्रकाश टाकण्यात आला.

बैठकीला संबोधित करताना सीबीआयसी चे अध्यक्ष विवेक चतुर्वेदी यांनी नव्या पिढीतील प्रक्रियात्मक सुधारणांमागील “आधी विश्वास, नंतर पडताळणी” (Trust First, Verify Later) या मूलभूत तत्त्वावर भर दिला. करदात्यांचा अनुभव अधिक चांगला करणे, अनुपालन प्रक्रियेतील अडथळे दूर करणे आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देणे याबाबत जीएसटी परिषदेच्या वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला.

सीबीआयसी (जीएसटी)चे सदस्य संजय मंगल यांनी अनुपालन अधिक सुलभ करण्यासाठी मंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेतलेले निर्णय टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येतील आणि त्यासंदर्भातील आवश्यक परिपत्रके व अधिसूचना योग्यवेळी जारी करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य जीएसटी कर आयुक्त आशीष शर्मा यांनीही करदात्यांशी संवाद साधला आणि करदाते व कर विभाग यांच्यात विश्वास निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला. प्रत्यक्ष तपासणीदरम्यान होणारा अनावश्यक हस्तक्षेप कमी करण्यासाठी तसेच विश्वासाधारित कर प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी जीएसटीशी संबंधित विविध विषयांवर आपले प्रश्न मांडले आणि सूचना सादर केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली तसेच प्राप्त सूचनांची योग्य तपासणी व विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या बैठकीत स्वैच्छिक अनुपालन आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासह उत्तरदायी, पारदर्शक आणि करदात्यांसाठी सुलभ कर प्रशासन सुनिश्चित करण्याप्रती जीएसटी प्रशासनाची सामूहिक वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली.

 

* * *

पीआयबी मुंबई | नितीन फुल्‍लुके/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327329) अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein: English