अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नागपूर कार्यालयाच्या वतीने दीक्षाभूमी इथे वित्तीय समावेशन संपृक्तता अभियानाचा प्रारंभ


पुनर्केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे, वित्तीय समावेशन योजनांचा लाभ मिळवून देणे आणि डिजिटल फसवणुकीबाबत जनजागृती करणे हा अभियानाचा उद्देश

Posted On: 22 OCT 2026 3:47PM by PIB Mumbai

नागपूर, 22 ऑक्‍टोबर 2026

 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नागपूर कार्यालयाच्या वतीने 21 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी इथे पुनर्केवायसी अर्थात ग्राहकांची पुनर्ओळख पडताळणी (re-KYC) आणि वित्तीय समावेशन योजनांसाठीच्या संपृक्तता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारितील वित्तीय सेवा विभाग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 21 ऑक्टोबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत हे देशव्यापी अभियान राबवले जात आहे. पुनर्केवायसी, सी-केवायसी अर्थात केंद्रीय ग्राहक ओळख पडताळणी (C-KYC - Central Know Your Customer), नामनिर्देशन  सुविधा, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणे आणि डिजिटल फसवणुकीबाबत जनजागृती वाढवून वित्तीय समावेशनाला अधिक बळकटी देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूर शाखेचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नागपूर कार्यालयातील वित्तीय समावेशन आणि विकास विभाग तसेच ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्षाच्या उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ, नागपूर जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अरुप पात्रा तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नागपूर कार्यालयाचे आणि बँक ऑफ इंडियाचे इतर अधिकारीही उपस्थित होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूरचे  प्रादेशिक संचालक सचिन शेंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. बँकिंग सेवांचा विनाअडथळा पुरवठा व्हावा तसेच बँक खात्यांचे कामकाज सुलभतेने सुरू राहावे यासाठी पुनर्केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. लाभार्थ्यांना आर्थिक संरक्षण पुरवण्यात तसेच त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यात सामाजिक सुरक्षा योजनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागपूरातले एक प्रमुख ठिकाण असलेल्या दीक्षाभूमी इथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भाविक आणि पर्यटक येत असतात. त्यामुळेच हे ठिकाण मोठ्या प्रमाणावर वित्तीय जनजागृतीचा संदेश पोहोचवण्यासाठीचे अत्यंत प्रभावी माध्यम ठरले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दालनात उभारण्यात आलेल्या स्क्रीनवर वित्तीय जनजागृती, पुनर्केवायसी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्त्व सांगणारे संदेश प्रदर्शित करण्यात आले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी सार्वजनिक ध्वनिवर्धक व्यवस्थेद्वारे दर तासाला पुनर्केवायसीबाबतचे संदेश ध्वनिफितींच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. नागरिकांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी, या कार्यक्रमादरम्यान हजारो उपस्थितांना वित्तीय जनजागृतीचे संदेश छापलेल्या वह्या, पत्रकांसोबतच पोहे तसेच अल्पोपाहाराच्या इतर खाद्य पदार्थांचे वाटपही करण्यात आले.

नागरिकांनी या अभियानाच्या कालावधीत आपल्या जवळच्या बँक शाखेला किंवा बँक मित्राला भेट देऊन आपल्या खात्याशी संलग्न अद्ययावत पत्ता आणि ओळखपत्रासह पुनर्केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326624) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English