Posted On:
21 OCT 2026 9:04PM by PIB Mumbai
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या मुंबई बंदर प्राधिकरणाने मुंबई बंदरातील व्हिक्टोरिया डॉक येथे 'विकसित भारत मुंबई मरीना' अंतर्गत पूर्ण-सुविधायुक्त मरीना (नौकाविहार केंद्र) आणि एकात्मिक वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, अर्थात किनारा विकासासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून निविदा मागवल्या आहेत.
हा प्रकल्प 'डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर' (डीबीएफओटी) तत्त्वावर, 45 वर्षांच्या सवलत कालावधीसाठी राबवला जाईल. प्रकल्पाचा अंदाजे खर्च 922.67 कोटी रुपये इतका आहे. मरीनामध्ये 37.3 हेक्टर संरक्षित जल क्षेत्र असेल. पूर्ण विकास झाल्यावर येथे 604 नौका (याट्स) ठेवण्याची क्षमता असेल, पहिल्या टप्प्यात 424 बर्थ (नौका उभी करण्याची जागा) उपलब्ध असतील.
मुंबई बंदर प्राधिकरणाने सागरी कामांना सुरुवात केली असून, यामध्ये सुमारे 150 मीटर लांबीचा मार्ग असलेले पाईल्ड ब्रेकवॉटर, सहा पाइल्ड सर्व्हिस प्लॅटफॉर्म, सुमारे 424 बर्थसाठी तरंगते पोंटून आणि गँगवे आणि कॅपिटल ड्रेजिंग यांचा समावेश आहे. संपूर्ण प्रकल्प क्षेत्रासाठी पर्यावरण आणि सीआरझेड मंजुरी प्राप्त झाली आहे.
सवलतदार जमिनीवरील सुविधा विकसित करेल, पहिल्या टप्प्यानंतर बर्थिंगचा विस्तार करेल आणि मुंबई बंदर प्राधिकरणाकडे मालमत्ता हस्तांतरित करण्यापूर्वी 45 वर्षांसाठी मरीनाचे परिचालन आणि देखभाल करेल. जमिनीवरील नियोजित सुविधांमध्ये मरीना टर्मिनल इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाची सेलिंग स्कूल, यॉट क्लब, हाजी बंदर येथे यॉट दुरुस्ती केंद्र, ड्राय स्टॅक, इंधन केंद्र, पंचतारांकित हॉटेल, पर्यटन व्यवसाय केंद्र, खाद्यपदार्थ, पेय आणि किरकोळ विक्री क्षेत्रे, तसेच बोट-शो आणि कार्यक्रमांसाठीचे मैदान यांचा समावेश आहे.
निविदा प्रक्रिया ही एकाच टप्प्यातील, दोन पाकिटांची ई-निविदा आहे. या निविदेसाठी बोलीचा निकष म्हणजे मुंबई बंदर प्राधिकरणाला अदा करावयाच्या एकूण महसुलातील टक्केवारीतील हिस्सा हा आहे. महसुलाचा सर्वाधिक हिस्सा देऊ करणाऱ्या निविदाधारकाची 'पसंतीचा निविदाधारक' म्हणून निवड केली जाईल. निविदाधारक स्वतंत्र संस्था म्हणून किंवा जास्तीत जास्त चार सदस्यांच्या समूहाच्या स्वरूपात सहभागी होऊ शकतात.
निविदापूर्व शंका आणि प्रश्न सादर करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. पहिली निविदापूर्व बैठक 30 ऑक्टोबर 2026 रोजी, तर दुसरी बैठक 25 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2026 आहे. विनंती प्रस्ताव (आरएफपी), मसुदा सवलत करार आणि व्यवहार्यता अहवाल ई-निविदा पोर्टलवर उपलब्ध आहेत.
“मुंबईची ओळख समुद्राशी अतूटपणे जोडलेली आहे, असे मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू म्हणाले. ‘विकसित भारत मुंबई मरिना’ या प्रकल्पामुळे शहराच्या कार्यरत बंदराचा काही भाग नियोजनबद्ध सागरी पर्यटन, नौकानयन आणि समुद्रकिनारी सुविधांसाठी खुला होईल. त्याचवेळी बंदरातील कामकाज आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. बंदर प्राधिकरणामार्फत सागरी बांधकामांची कामे सुरू असून आवश्यक परवानग्याही मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईत नागरिकांना वापरता येईल, अशी नवीन सागरी सुविधा उभारण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्ह गुंतवणूकदारांना भागीदारीसाठी आमंत्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हा प्रकल्प मुंबई बंदर प्राधिकरणाच्या क्रूझ पर्यटन, बंदर सेवा, समुद्रकिनारा विकास आणि शहराशी संबंधित उपक्रमांसाठी बंदराशी निगडित क्षेत्रांचा योग्य वापर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या उपक्रमांमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, वॉटर टॅक्सी नेटवर्क आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या समुद्रकिनारी परिसरांचा विकास यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
मुख्य अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट भवन, तिसरा मजला, एस. व्ही. मार्ग, फोर्ट, मुंबई – 400 001.
ई-मेल : chiefengineer@mumbaiport.gov.in

***
Nilima Chitale / Rajashree Agashe / Shraddha Mukhedkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai