वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक व्यापाराच्या संधी खुल्या करण्यासाठी मुक्त व्यापार कराराचा लाभ घेण्यासंदर्भात गोवा येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 21 OCT 2026 7:23PM by PIB Mumbai

गोवा सरकारच्या उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने (डीआयटीसी), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि अतिरिक्त डीजीएफटी कार्यालय, मुंबई यांच्या सहयोगाने टर्मिनल बँक्वेट्स, कॅक्युलो एन्क्लेव्ह, सेंट इनेझ, पणजी येथे, 'गोवा ते जग – जागतिक व्यापाराच्या संधी' या संकल्पनेवर आधारित, 'मुक्त व्यापार कराराचा (एफटीए) लाभ' या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम व्हायब्रंट गोवा फाउंडेशनने डीआयटीसीच्या सहकार्याने आयोजित केला होता. या कार्यशाळेत सरकारी अधिकारी, निर्यात-प्रोत्साहन संस्था, उद्योग प्रतिनिधी, उत्पादक, निर्यातदार आणि इतर संबंधित घटक एकत्र आले. या कार्यशाळेने भारताच्या मुक्त व्यापार करारांच्या वाढत्या नेटवर्कच्या माध्यमातून गोव्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेण्याची संधी दिली.

उद्घाटन सत्राला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोवा सरकारचे उद्योग सचिव संतोष सुखदेवे (भाप्रसे) यांनी स्वागतपर भाषण केले. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अमिताभ कुमार यांनी एफटीएचा लाभ, प्राधान्य बाजार उपलब्धता, मूळ नियम, मानके आणि बाजार-प्रवेश तरतुदी या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

गोव्यातील व्यवसायांना भारताच्या मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून खुल्या होणार्‍या संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला सहाय्य करणे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार करण्याची क्षमता असलेली क्षेत्र आणि उत्पादने ओळखण्यासाठी गोव्यातील व्यवसायांना सक्षम बनवण्यावर या कार्यशाळेत लक्ष केंद्रित करण्यात आले. डॉ. प्रवीण कुमार, संयुक्त डीजीएफटी यांनी, गोव्यातील सध्याच्या आणि भविष्यातील निर्यात-क्षमता असलेल्या क्षेत्रांची आणि उत्पादनांची माहिती दिली, तर दुसऱ्या सत्रात मुक्त व्यापार करारांची संकल्पना स्पष्ट करण्यात आली, यात अशा करारांमागची तर्कसंगत भूमिका, तसेच व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी शोधण्याचा दृष्टीकोन, या बाबींचा समावेश होता.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे मुंबई येथील अतिरिक्त महासंचालक आर. के. मिश्रा यांनी निर्यात प्रोत्साहन अभियान (ईपीएम) आणि निर्यात केंद्र म्हणून जिल्हे (डीईएच) या उपक्रमांमधील समन्वय आणि परस्परपूरकतेवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात डीजीएफटी मुख्यालयातर्फे ‘ट्रेड ई-कनेक्ट’ या सुविधेचे ऑनलाइन प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

गोव्यातील स्थानिक निर्यातदारांनी या चर्चेला उद्योगक्षेत्राचा व्यावहारिक दृष्टिकोन जोडत त्यांच्या निर्यात प्रवासातील अनुभव कथन केले. केंद्र आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या मदतीमुळे तसेच विविध उपाययोजनांमुळे गोव्यातून यशस्वीपणे निर्यात करणे कसे शक्य झाले, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यांच्या अनुभव कथनामुळे सहभागी उद्योगांना परदेशी बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्याबाबत आणि उपलब्ध संस्थात्मक सहाय्याचा लाभ घेण्याबाबत प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहिती मिळाली.

या कार्यशाळेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे - चार क्षेत्रनिहाय सत्रांचे एकाच वेळी आयोजन. यामध्ये अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती आणि रसायने, सागरी आणि अन्न उत्पादने तसेच सेवा या क्षेत्रांचा समावेश होता. या सत्रांमुळे उद्योगक्षेत्रातील सहभागी आणि गोवा चेंबर्स, ईईपीसी इंडिया यांच्यासह संबंधित संस्थांना विशिष्ट विषयांवर तपशीलवार चर्चा करता आली आणि परस्परसंवाद साधता आला.

या क्षेत्रनिहाय चर्चांमधून समोर आलेल्या निष्कर्षांचे नंतर सादरीकरण करण्यात आले, तसेच सर्वसमावेशक राज्य कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने त्यावर विचारविनिमय करण्यात आला. जिल्हा स्तरावर अधिक दृढ सहभाग निश्चित करण्यासाठी तसेच जिल्हानिहाय कृती आराखडे विकसित करण्यासाठी पुढील बैठका निश्चित करण्यावरही या कार्यक्रमात भर देण्यात आला. त्यामुळे या उपक्रमाला राज्यस्तरीय कार्यशाळेच्या पलीकडे नेत प्रभावी अंमलबजावणीच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला.

सरकार, निर्यात प्रोत्साहन संस्था आणि गोव्यातील व्यापारी समुदाय यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा एक महत्त्वाचे पाऊल ठरली. भारताच्या मुक्त व्यापार करारांद्वारे जागतिक बाजारपेठांमध्ये निर्माण होणाऱ्या नव्या संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अधिकाधिक उत्पादक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच निर्यातदारांना सक्षम करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

***

Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326327) अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein: English