Posted On:
16 OCT 2026 2:47PM by PIB Mumbai
नागपूर, 16 ऑक्टोबर 2026
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 'भारतीय मानक ब्युरो' (BIS) च्या नागपूर शाखा कार्यालयाने 14 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर येथे 'जागतिक मानक दिन 2026 साजरा केला. यावर्षीच्या 'अधिक चांगल्या जगासाठी सामायिक दृष्टीकोन' या संकल्पनेच्या धर्तीवर 'शाश्वत विकास उद्दिष्टे 7' (SDG 7) - 'परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा' या विषयावर हा कार्यक्रम केंद्रित होता.
दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा 'जागतिक मानक दिन' जगभरातील तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव करतो, ज्याद्वारे ऐच्छिक आणि सर्वसंमतीवर आधारित मानके विकसित केली जातात. ही मानके तंत्रज्ञानातील प्रगतीला चालना देतात, गुणवत्ता व सुरक्षिततेला प्रोत्साहन देतात आणि शाश्वत विकासाला आधार देतात.
कार्यक्रमाची सुरुवात बीआयएस नागपूरच्या सहसंचालक निशा कनबर्गी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर, बीआयएस नागपूरचे सहसंचालक रौनक सुखदेव यांनी 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन' (ISO), 'इंटरनॅशनल इलेक्ट्रो-टेक्निकल कमिशन' (IEC) आणि 'इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन' (ITU) यांचे संदेश वाचून दाखवले, तसेच या वर्षीच्या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले.
बीआयएस नागपूर शाखा कार्यालयाचे संचालक आणि प्रमुख डॉ. मनोज कुमार रजक यांनी या कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यांनी संशोधन आणि विकास व औद्योगिक कार्यपद्धती यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी 'मानकीकरण' किती महत्त्वपूर्ण आहे,हे अधोरेखित केले. त्यांनी गुणवत्ता पायाभूत सुविधा बळकट करण्यावर, गुणवत्तेशी संबंधित त्रुटी दूर करण्यावर आणि भारताची हवामान परिस्थिती, औद्योगिक गरजा व प्रत्यक्ष उपयोगांशी सुसंगत असे 'भारतीय मानक' विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला.

‘नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (NPTI) चे प्रधान संचालक रामचंद्र रंगनाथ उकिर्डे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी भारत आणि जागतिक स्तरावरील ऊर्जा क्षेत्राच्या सद्यस्थितीवर विचार मांडले. त्यांनी ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख आव्हाने आणि ती सोडवण्यासाठी संभाव्य उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच, नवीकरणीय ऊर्जेच्या विस्ताराला पाठबळ देण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञ, अभियंते आणि आयटी व्यावसायिकांसह कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. एनपीटीआय द्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली; ज्यामध्ये कौशल्य विकास, विशेष प्रशिक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील अभियंत्यांसाठी रोजगाराच्या संधींचा समावेश आहे.
उद्घाटन सत्रानंतर तंत्रज्ञानविषयक सत्रे झाली. यामध्ये नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी झाले होते. नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील (आयआयएम) उत्पादन व कामकाज व्यवस्थापन विभागाचे प्राध्यापक राजीव अग्रवाल यांनी शाश्वत विकासाची उद्दीष्ट साध्य करण्यामध्ये प्रकल्पाच्या परिणामकारी नियोजन व व्यवस्थापनाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. विशेषतः त्यांनी एसडीजी 7 आणि रास्त व स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन या मुद्द्यांवर भर दिला.
नागपूरच्या विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (व्हीएनआयटी) यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अभय कुमार कुथे (एचएजी) यांनी एसडीजी 7 संर्भातील उत्पादन नवोन्मेष व त्याचे सामाजिक परिणाम यावर भाष्य केले. त्यांनी पदार्थ – क्षेत्र विश्लेषण ही संकल्पना समजावून सांगितली आणि कोळसा व तेल यासारख्या पारंपरिक उर्जा स्रोतांच्या पर्यायांवर चर्चा केली. शाश्वत ऊर्जा पर्याय विकसित करण्यामधील नवोन्मेषाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
नापूरमधील सीएसआयआर – राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधेन संस्था (सीएसआयआर-नीरी) या संस्थेचे जी शास्त्रज्ञ डॉ. अमित बन्सीवाल यांनी सीसीयुएस (कार्बन कॅप्चर, उपयोग व साठवण) पर्यावरण व ऊर्जा शाश्वततेसाठी स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान मार्ग हे तंत्रज्ञानविषयक सादरीकरण केले.
कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरण संरक्षणाला मदत व दीर्घकालीन ऊर्जा शाश्वततेची प्रगती यामधील कार्बन कॅप्चर, उपयोग व साठवण तंत्रज्ञान यांची क्षमता या सादरीकरणात अधोरेखित करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमाणीकरणाला प्रोत्साहन देण्यामध्ये योगदान दिलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी बीआयएस नागपूरचे सहसंचालक तपन कुमार हलदर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर, वक्ते, सहभागी आणि आयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले.
या कार्यक्रमात शाश्वत विकासाच्या वाटचालीमधे प्रमाणीकरण, तंत्रज्ञानातील संशोधन आणि उद्योग, शैक्षणिक संस्था व संशोधन संस्थांमधील सहकार्य यांचे महत्त्व विषद करण्यात आले. रास्त, विश्वासार्ह व स्वच्छ ऊर्जेसाठी सहाय्यक म्हणून तसेच सर्वांसाठी शाश्वत भविष्याचे स्वप्न साकार करण्यामध्ये प्रमाणीकरणाची भूमिकादेखील अधोरेखित करण्यात आली.
बीआयएस नागपूर कार्यालयाचे प्रमुख व संचालक डॉ. मनोज कुमार रजक यांचे मार्गदर्शन आणि बीआयएस नागपूरमधील कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग व समन्वय याद्वारे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
* * *
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/सुषमा काणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai