अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

करदाता सेवा संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयातर्फे कर साक्षरता, मानसिक आरोग्य जागरूकता आणि ‘नशामुक्त अभियान’ या विषयांवर जनजागृती कार्यक्रम

Posted On: 14 OCT 2026 8:03PM by PIB Mumbai

 मुंबई, 14 ऑक्टोबर 2026

भारत सरकारच्या अर्थ  मंत्रालयाच्या अखत्यारीतील महसूल विभागांतर्गत असणाऱ्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या, करदाता सेवा संचालनालयाचे (डीजीटीएस) मुंबई क्षेत्रीय कार्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या 'गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट' च्या सहयोगाने, मुंबई विद्यापीठात, 10 ऑक्टोबर 2026 रोजी  "सक्षम युवा, जबाबदार नागरिक: कर साक्षरता, मानसिक आरोग्य जागरूकता आणि नशामुक्त भारत अभियान" या विषयावर संमिश्र स्वरूपात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तरुण नागरिकांमध्ये कर अनुपालन, मानसिक आरोग्य आणि अंमली पदार्थांच्या सेवनाला  प्रतिबंध याबद्दल जागरूकता वाढवणे तसेच पूर्ण  माहिती घेवून  निर्णय घेणे आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्व या बाबी अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश  होता.

मुंबई विद्यापीठाच्या 'गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट'चे संचालक डॉ. केयूरकुमार एम. नायक यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले; तसेच विद्यार्थ्यांमध्ये कर-साक्षरता, मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संस्था आणि  सरकारी संस्था यांच्यातील सहयोगाच्या भूमिकेवर त्यांनी विशेष भर दिला.

‘डीजीटीएस’ च्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी आपल्या बीजभाषणात  जबाबदार नागरिकत्व घडवण्यात कर-साक्षरता, मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता आणि 'नशा मुक्त भारत अभियान' यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. मानसिक आरोग्य,  तणाव व्यवस्थापन आणि गरज भासल्यास तज्ञांची मदत घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. तसेच, अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आणि अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्यात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या 'नशा मुक्त भारत अभियान' या उपक्रमाची भूमिकाही अधोरेखित केली.

कर साक्षरतेच्या मुद्द्यावर बोलताना कुमार यांनी सीमाशुल्क आणि वस्तु आणि सेवा कर यांच्यातील परस्परसंबंध विषद केले. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापार, कर अनुपालन, इनपुट टॅक्स क्रेडिट, निर्यात प्रक्रिया आणि परतावा मिळण्याबाबतची यंत्रणा या संदर्भातील बाबी विशेषत्वाने सांगितल्या. करदात्यांमध्ये जागरूकता, कर नियमांचे स्वेच्छेने पालन आणि व्यापार सुलभता यांच्या महत्त्वावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. तसेच, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठ आणि UM-GICED यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना सुजाण निर्णय घेण्यास तसेच अधिक निकोप आणि  जबाबदार समाजाच्या निर्मितीत योगदान देण्यास प्रोत्साहित केले.

पहिले सत्र, मानसिक आरोग्य जागरूकता आणि नशामुक्त भारत अभियान या विषयावर, मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ चौला पटेल यांनी घेतले. त्यांनी मानसिक स्वास्थ्य आणि अमली पदार्थांचे सेवन यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकला तसेच ताण, चिंता, नैराश्य व भावनिक त्रास हे अमली पदार्थांच्या सेवनास कसे कारणीभूत ठरू शकतात हे स्पष्ट केले. त्यांनी मानसिक  आजार लवकर ओळखणे , वेळेवर समुपदेशन आणि कुशल मदतीच्या महत्त्वावर भर दिला. या सत्रात मानसिक आरोग्याच्या समस्यांची सुरुवातीची लक्षणे, तणाव व्यवस्थापन धोरणे, आधार देण्यामध्ये कुटुंबांची भूमिका आणि मानसिक आरोग्य व व्यसनाधीनतेभोवती असलेला कलंक कमी करण्याची गरज यावरही चर्चा झाली. त्यांनी सहभागींना वेळेवर मदत घेण्यास आणि तरुणांसाठी एक आधार देणारे, अमली पदार्थमुक्त वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहित केले.

दुसरे सत्र, सीमाशुल्क आणि जीएसटीमधील संबंध या विषयावर, मुंबई येथील सीजीएसटीच्या सीसी कार्यालयाचे उपायुक्त दीपक माता यांनी घेतले. त्यांनी सीमाशुल्क मध्यस्थ, मालवाहतूकदार आणि लॉजिस्टिक्स व्यावसायिक, विशेषतः सीमाशुल्क दलाल परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी सीमाशुल्क आणि जीएसटीच्या तरतुदींचे महत्त्व स्पष्ट केले. या सत्रात सीमाशुल्क प्रक्रिया, आयातीवरील एकात्मिक जीएसटी , इनपुट टॅक्स क्रेडिट आणि निर्यात परतावा यंत्रणा या विषयांवर चर्चा झाली.

माता यांनी जीएसटीआयएन  मधील चुका, घोषित मूल्ये आणि शिपिंग बिले व जीएसटी परताव्यातील तफावतींमुळे कर अनुपालनावर कसा परिणाम होऊ शकतो आणि परताव्यास कसा विलंब होऊ शकतो, यावरही प्रकाश टाकला. व्यावहारिक उदाहरणे आणि केस स्टडीजच्या माध्यमातून, त्यांनी मालवाहतूक सुलभ करण्यासाठी, ऐच्छिक अनुपालनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी सीमाशुल्क आणि जीएसटीच्या तरतुदींबाबत अद्ययावत राहण्याच्या महत्त्वावर भर दिला.

या संमिश्र  कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि इतर संबंधितांनी सहभाग घेतला , ज्यामुळे कर आकारणी, मानसिक आरोग्य आणि मादक पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध याविषयी ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

याप्रसंगी, डीजीटीएस, मुंबई विभागीय युनिटचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी, मुंबई विद्यापीठाच्या जीआयसीईडी कार्यक्रमाचे समन्वयक प्रकाश खत्री यांनी लिहिलेल्या ड्यूटी इन सस्पेंशन: बॉन्डेड वेअरहाउसिंग इन इंडिया – कॉन्सेप्ट अँड प्रॅक्टिस या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक कस्टम्स बॉन्डेड वेअरहाउसिंगविषयी व्यावहारिक माहिती देते, ज्यामध्ये मॅन्युफॅक्चर अँड अदर ऑपरेशन्स इन वेअरहाउस रेग्युलेशन्स आणि फ्री ट्रेड वेअरहाउसिंग झोन्स यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासह, डीजीटीएस, मुंबई विभागीय युनिटने एप्रिल 2026 पासून आजपर्यंत एकूण 61 आउटरीच कार्यक्रमांचे आयोजन केले आहे किंवा त्यात सहभाग घेतला आहे, ज्यामध्ये 34 सेमिनार, वेबिनार आणि हायब्रीड इव्हेंट्स आणि 27 संवादी सत्रांचा समावेश आहे. या उपक्रमांचा उद्देश कर कायदे आणि कार्यपद्धतींबद्दल जागरूकता वाढवणे, ऐच्छिक अनुपालनास प्रोत्साहन देणे आणि करदात्यांचा सहभाग मजबूत करणे हा आहे.


पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/सविता म्हसकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2323571) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English