अर्थ मंत्रालय
ग्रामीण तरुणांच्या परदेशातील रोजगाराला चालना देण्यासाठी, नाबार्डकडून एनएसडीसीच्या 'सोशल स्टॉक एक्सचेंज इश्यू’ मध्ये 4 कोटी रुपयांची गुंतवणूक
Posted On:
14 OCT 2026 8:00PM by PIB Mumbai
मुंबई, 14 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं (नाबार्ड) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) पहिल्या शून्य कूपन, शून्य मुद्दल (झेडसीझेडपी) इश्यूमध्ये 4 कोटी रूपयांची संपूर्ण गुंतवणूक केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सामाजिक शेअर बाजार मंचावर हा ‘इश्यू’ सादर करण्यात आला आहे. भारतात परिणामाधारित सामाजिक वित्तव्यवस्थेच्या विकासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 11.25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मध्य प्रदेशातल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या (ओबीसी) 600 ग्रामीण युवकांना शाश्वत परदेशी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
हा उपक्रम एनएसडीसीकडून मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने राबवला जात आहे. मोजमाप करता येईल, अशा सामाजिक परिणामांशी या निधीची सांगड घातली जाणार आहे. यासाठी ही अभिनव वित्तपुरवठा व्यवस्था या प्रकल्पासाठी तयार करण्यात आली आहे. या व्यवस्थेनुसार, नाबार्डने शून्य कूपन, शून्य मुद्दल निर्गमात गुंतवणूक केली आहे. ठरवून दिलेली रोजगारविषयक उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारकडून परिणामांशी निगडित 5.60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाण्याची अपेक्षा आहे. उर्वरित निधी लाभार्थ्यांच्या योगदानातून उभारण्याचा प्रस्ताव आहे.
या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण युवकांना जपान आणि जर्मनीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयुक्त अशी कौशल्ये शिकवली जाणार आहेत. लाभार्थ्यांना भाषा प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास, प्रमाणपत्र, सांस्कृतिक परिचय आणि परदेशात नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्वसमावेशक साहाय्य दिले जाईल. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता आणि परदेशात पाठवण्यासंबंधीच्या प्रक्रियेतल्या मदतीचाही समावेश असेल.
जागतिक श्रमबाजारपेठेतल्या संधींचा लाभ घेता यावा, ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
केवळ उपक्रम राबवण्याऐवजी त्यातून साध्य होणाऱ्या परिणामांवर दिलेला भर हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. हा कार्यक्रम केवळ प्रशिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पडताळणी केलेल्या परदेशातल्या रोजगार आणि शाश्वत उपजीविका वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार केला आहे. हा दृष्टीकोन पुरावा-आधारित विकास वित्तपुरवठ्यातला एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवतो, यामध्ये सामाजिक प्रभाव कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणीच्या केंद्रस्थानी असतो.
हा व्यवहार, मोजता येण्याजोग्या विकासात्मक परिणामांसाठी संसाधने एकत्रित करण्याचे व्यासपीठ म्हणून सामाजिक भांडवल बाजाराची (स्टॉक एक्सचेंज) वाढती क्षमता देखील दर्शवतो. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (सेबी) च्या नियामक चौकटीअंतर्गत स्थापन झालेली, एसएसई पारदर्शक आणि उत्तरदायी यंत्रणांद्वारे विविध संस्था, परोपकारी संस्था, प्रतिष्ठान, कॉर्पोरेट्स आणि इतर भागधारकांच्या सामाजिक उपक्रमांना वित्तपुरवठा करून त्यातील आपला सहभाग अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करते. ‘झेडसीझेडपी’ हे एक असे नाविन्यपूर्ण साधन आहे, जे अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांवर परतफेडीचे दायित्व न लादता सामाजिक प्रकल्पांना निधी पुरवते.
नाबार्डचा सहभाग हा सामाजिक भांडवल बाजार परिसंस्थेला बळकट करण्याप्रती आणि ग्रामीण विकासाची गुंतागुंतीची आव्हाने पेलण्यास सक्षम असलेल्या नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणांचा शोध घेण्याप्रती असलेली त्याची वचनबद्धता दर्शवतो.एकाच प्रकल्पाला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त, या उपक्रमामुळे परिणामांशी निगडित विकास हस्तक्षेपांची रचना,अंमलबजावणी व देखरेख करणे आणि मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रभाव पाडण्यासाठी भांडवलाचा प्रभावी वापर करणे, यांमधील अमूल्य अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.
हा प्रकल्प, विकास वित्त संस्था, सरकारी संस्था आणि अंमलबजावणी करु शकणाऱ्या विशेष भागीदारांना सुस्पष्टपणे परिभाषित आणि मोजता येण्याजोग्या परिणामांभोवती एकत्र आणणाऱ्या सहयोगी वित्तपुरवठा मॉडेलची क्षमता देखील दर्शवतो.अशा प्रारूपांमुळे उत्तरदायित्व सुधारण्यास, संसाधनांचा इष्टतम वापर करण्यास आणि वंचित समुदायांपर्यंत विकास कार्यक्रमांची व्याप्ती वाढवण्यास मदत होऊ शकते.
ग्रामीण आकांक्षांना जागतिक रोजगाराच्या संधींशी जोडून आणि भांडवलाला पडताळण्यायोग्य सामाजिक परिणामांशी जोडून, नाविन्यपूर्ण वित्तीय साधने सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण परिवर्तनासाठी कशाप्रकारे उत्तम योगदान देऊ शकतात, हे दाखवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.कार्यक्रमातून मिळणारे अनुभव आणि शिकवण, विविध विकास क्षेत्रांमध्ये सोशल स्टॉक एक्सचेंज-आधारित वित्तपुरवठा प्रारुपाचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देईल,अशी अपेक्षा नाबार्डला आहे.
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323563)
अभ्यागत कक्ष : 17