Posted On:
14 OCT 2026 3:25PM by PIB Mumbai
पुणे, 14 ऑक्टोबर 2026
पत्र सूचना कार्यालय(पीआयबी), मुंबई आणि केंद्रीय संचार ब्यूरो(सीबीसी), महाराष्ट्र यांनी युनिसेफच्या सहकार्याने, 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी पुण्यातल्या सीबीसी प्रादेशिक कार्यालयात, किशोरवयीन आरोग्य आणि हवामान बदल यांबाबत दोन दिवसीय क्षमता-बांधणी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातील एकूण 45 अधिकाऱ्यांनी भाग घेतला.
सरकारी योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याची सुनिश्चिती करण्यासाठी क्षेत्र अधिकाऱ्यांची संवाद कौशल्ये अधिक सक्षम करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. किशोरवयीन आरोग्य आणि हवामान बदल यांसारख्या विषयांवर महत्त्वाचे संदेश सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे, जागरूकता आणि लोकांचा सहभाग वाढवणे यासाठी स्टोरीटेलिंग व संवादाच्या इतर प्रभावी पद्धतींचा वापर करण्यावर यात भर देण्यात आला.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम क्षेत्र) स्मिता वत्स शर्मा यांनी उदघाटनपर भाषण केले. संवाद ही दोन्ही बाजूंकडून होणारी प्रक्रिया आहे, यावर त्यांनी भर दिला आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत विश्वसनीय व अधिकृत माहिती पोहोचवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. क्षमता बांधणीमुळे क्षेत्र अधिकाऱ्यांना विचारांचे आदानप्रदान करणे, सर्वोत्तम कार्यपद्धतींची माहिती सामायिक करणे आणि जनसंपर्क व पोहोच अधिक उत्तमप्रकारे साधणे शक्य होते, यावर त्यांनी भर दिला.

पीआयबी-सीबीसी महाराष्ट्र आणि गुजरातचे अतिरिक्त महासंचालक सिद्धार्थ बोडके यांनी या कार्यशाळेची पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यांनी उपस्थितांना, तज्ज्ञांकडून आणि एकमेकांकडून जाणून घेण्यासाठी, तसेच आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्ये आपापल्या क्षेत्र कार्यालयांद्वारे राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी युनिसेफ मुंबईच्या संज्ञापन तज्ज्ञ स्वाती मोहपात्रा यांनी ‘इंट्रोडक्शन टू आऊटरिच कम्युनिकेशन’ हे सत्र घेतले. प्रत्येकाला गोष्ट सांगता येते यावर त्यांनी भर दिला आणि वेगवेगळ्या श्रोत्यांनुरूप कथा सांगण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या सत्रात संवाद साधने, सोशल मीडिया आणि यशस्वी संपर्क पद्धती यांचा समावेश होता.

अधिकाऱ्यांनी आपापल्या राज्यात हाती घेतलेल्या पुढाकारांविषयी माहिती दिली. यामध्ये वार्तालाप आणि इंटरपर्सनल कम्युनिकेशन कॅम्पेन्स(आयसीओपी) यांचा समावेश होता. त्यांनी सरकारी योजनांच्या प्रसाराबाबतचे त्यांचे अलीकडील अनुभव सांगितले. या सत्राचे संचालन सीबीसी पुणेच्या उपसंचालक सुप्रिया घायतडक आणि पीआयबी मुंबईच्या उपसंचालक निकिता जोशी यांनी केले.
डॉ. रवींद्र चौधरी, सहायक संचालक, आरोग्य सेवा यांनी किशोरवयीन आरोग्य, मानसिक आरोग्य, असंसर्गजन्य रोग आणि यासंदर्भातील शासकीय उपाययोजनांवर चर्चा केली. यामध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, नशामुक्त भारत अभियान, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, टेली-मानस, आयुष्मान भारत शालेय आरोग्य व कल्याण कार्यक्रम आणि पोषण अभियान यांसारख्या प्रमुख उपक्रमांचा समावेश होता.
युनिसेफ महाराष्ट्राचे आरोग्यतज्ज्ञ डॉ. मंगेश गधारी यांनी जनजागृती, वेळेवर हस्तक्षेप आणि प्रभावी संवाद यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्य व कल्याणाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम क्षेत्र) स्मिता वत्स शर्मा आणि पीआयबी-सीबीसी महाराष्ट्र आणि गुजरातचे अतिरिक्त महासंचालक सिद्धार्थ बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखड्यावर चर्चा झाल्यानंतर कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
दुसऱ्या दिवशी, नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिलचे पर्यावरण आरोग्य विशेषज्ञ डॉ. संदीप ठाकर यांनी हवामानाशी संबंधित आरोग्य धोके, तीव्र उष्णता, वायू प्रदूषण, पूर्वसूचना प्रणाली आणि प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा केली. पुणे येथील 'प्रयास'च्या डॉ. रितू परचुरे यांनी समुदाय स्तरावर हवामान आव्हानांमुळे आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी सांगितले. विशेषतः बाहेर उन्हातान्हात काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. युनिसेफ महाराष्ट्रचे WASH, CCES आणि DRR अधिकारी आनंद घोडके यांनी मुलांवर परिणाम करणारे हवामानाचे धोके, बाल-केंद्रित संवाद, मिशन लाइफ आणि जल जीवन अभियान, यांविषयी चर्चा केली.

गट-उपक्रमांदरम्यान, सहभागींनी घोषणा, नाटिका आणि अभिनव संवाद पद्धतींद्वारे जनजागृती पद्धती विकसित केल्या. या चर्चांमध्ये दुष्काळ, भूजल पातळीतील घट, वाढते तापमान, मानसिक आरोग्य, नैराश्य, स्क्रीनचा अतिवापर, सोशल मीडियाचे व्यसन आणि पालक आणि मुले यांच्यातील संबंध यांसारख्या विषयांचा समावेश होता.

यावेळी उपस्थितांनी पीआयबीच्या 'वार्तलाप', सीबीसीच्या 'आयसीओपी' आणि इतर आऊटरिच कार्यक्रमांमध्ये या संकल्पना कशा समाविष्ट करता येतील, तसेच स्थानिक पातळीवर सार्वजनिक संवाद अधिक प्रभावी व उत्तम कसा करता येईल, यांविषयीचे मार्ग शोधले आणि कार्यशाळेचा समारोप झाला.
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/सोनाली काकडे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai