दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय टपाल सप्ताह 2026 अंतर्गत मुंबई जीपीओ येथे 12 ऑक्टोबर 2026 रोजी टपाल तिकीट संग्रह (फिलाटेली) दिन साजरा

Posted On: 12 OCT 2026 9:38PM by PIB Mumbai

मुंबई, 12 ऑक्टोबर 2026

देशभरात 9 ते  15 ऑक्टोबर 2026 दरम्यान साजरा होत असलेल्या 'राष्ट्रीय टपाल सप्ताह 2026' चा एक भाग म्हणून, मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे 12 ऑक्टोबर 2026 रोजी टपाल तिकीट संग्रह (फिलाटेली) दिन साजरा करण्यात आला. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणे, विद्यार्थी व तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणे आणि टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास व विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

 

 

टपाल तिकिटांचा अभ्यास आणि संग्रह करण्याच्या या छंदाद्वारे  देशाचा इतिहास, संस्कृती, जैवविविधता, थोर व्यक्तिमत्त्वे आणि महत्त्वपूर्ण घटना जाणून घेण्याची एक रंजक संधी उपलब्ध करून देते. विविध प्रकारचे स्मरणोत्सव आणि विशेष टपाल तिकिटांच्या माध्यमातून, 'भारतीय टपाल विभाग ' भारताचा वारसा जतन व प्रदर्शित करत  आहे; तसेच सर्व वयोगटांतील लोकांमध्ये कुतूहल आणि शिकण्याची वृत्ती जागृत केली आहे.

या उत्सवाचा एक भाग म्हणून, मुंबई जीपीओने शालेय विद्यार्थी, टपाल विभागाचे कर्मचारी, अभ्यागत आणि टपाल तिकीट संग्रहक  यांच्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. मुंबई जीपीओमधील 'संकल्पना आधारित टपाल तिकीट प्रदर्शन' हे यातील एक मुख्य आकर्षण होते ; या प्रदर्शनात टपाल तिकिटे आणि संबंधित  साहित्याच्या माध्यमातून टपाल तिकीट संग्रहाचे महत्त्व व विविधता अधोरेखित करण्यात आली. या प्रदर्शनामुळे अभ्यागतांना टपाल तिकिटे गोळा करण्याच्या छंदाचे शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व  समजून घेण्याची संधी मिळाली.

दिवसभरातील उपक्रमांमध्ये 'माय व्हिजिट' (My Visit) या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी 'फिलाटेली ब्युरो'ला  दिलेली भेट, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धा आणि प्रख्यात  टपाल तिकीट संग्रहकांचे माहितीपूर्ण व्याख्यान यांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे सहभागींना टपाल तिकिटांच्या रंजक विश्वाची ओळख झाली आणि टपाल तिकीट संग्रहाशी संबंधित उपक्रमांमध्ये लोकांचा  सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन मिळाले.

या समारंभाचे एक विशेष आकर्षण  समर्पित निसर्गशास्त्रज्ञ  दिवाकर देविदास ठोंबरे  यांच्या सौजन्याने “भारतातील स्थलांतरित पक्षी मालिका-1” नावाच्या पिक्चर  पोस्टकार्डच्या संचाचे प्रकाशन, तसेच टपाल तिकीट संग्रह दिनानिमित्त एका विशेष  तिकिटाचे प्रकाशन होते.  हा कार्यक्रम दिवाकर देविदास ठोंबरे आणि नामवंत टपाल तिकीट संग्राहकांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थितांना संबोधित करताना, टपाल सेवा संचालक (मुख्यालय), सिमरन कौर यांनी सहभागी विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, टपाल तिकीट संग्रह हा 'छंदांचा राजा' म्हणून साजरा केला जातो, जो विद्यार्थ्यांना आणि नागरिकांमध्ये आवड निर्माण करण्यास आणि त्यांच्या ज्ञानाची क्षितिजं विस्तारण्यास प्रोत्साहित करतो. आधुनिक टपाल तिकीट संग्रहांमध्ये  विविधता आढळते, ज्यात म्युझिकल टपाल तिकिटे, सुगंधित टपाल तिकिटे  तसेच वैयक्तिक कला आवडीनुसार तयार केलेली विविध आकार, मापे आणि विविध विषयांवरील तिकिटे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला भेट देणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची अप्रतिम छायाचित्रे टिपल्याबद्दल निसर्ग अभ्यासक  दिवाकर ठोंबरे यांचे विशेष आभार मानण्यात आले. या छायाचित्रांचे संकलन करून पिक्चर पोस्टकार्ड्स तयार करण्यात आली असून, ती महाराष्ट्रभरातील टपाल तिकीट कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. ही पोस्टकार्ड्स प्रियजनांना पाठवणे ही एक संस्मरणीय आठवण ठरते आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक दृढ करते.

कौर पुढे म्हणाल्या, “हस्तलिखित पत्रे आणि कथाकथनामध्ये एक गहिरे भावनिक मूल्य असते, जे सामान्य डिजिटल संदेश (जसे की व्हॉट्सॲप टेक्स्ट) देऊ शकत नाहीत. पत्रलेखन हे एक प्रकारचे डिजिटल डिटॉक्स म्हणून काम करते, ज्यामुळे व्यक्तींना डिजिटल चौकटीपासून दूर जाऊन शिक्षक, गुरू आणि कुटुंबातील सदस्यांप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करता येते. हाताने लिहिण्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत, जसे की हाताच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि मोटर स्किल्स टिकून राहतात, संवेदी आणि मोटर स्किल्समधील समन्वय सुधारतो आणि संज्ञानात्मक वाक्यरचना व अभिव्यक्ती वाढते.”

टपाल तिकीट संग्रह  दिनाचे महत्त्व, टपाल तिकीट संग्रहाला  प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया पोस्टने हाती घेतलेले उपक्रम आणि टपाल तिकीट संग्रहाला प्रोत्साहन देण्यात व विद्यार्थी, संग्राहक आणि सामान्य जनतेशी संवाद साधण्यात मुंबई जीपीओची भूमिका अधोरेखित करण्यासाठी एक पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाने  विद्यार्थी आणि सामान्य जनतेमध्ये फिलॅटेलीला प्रोत्साहन देण्याप्रति मुंबई जीपीओच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, तसेच भारताचा नैसर्गिक वारसा जतन करण्यात आणि त्याच्या समृद्ध जैवविविधतेबद्दल जागरूकता वाढविण्यात टपाल तिकिटे आणि पोस्टकार्डची  भूमिका अधोरेखित केली.


पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे /प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2322551) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English