भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटीएम पुणेतर्फे "एपीएआरसी अर्ली करिअर वर्कशॉप" आणि ईएसटीआयसी परिषदेचा पूर्वारंभ कार्यक्रम संपन्न

Posted On: 11 OCT 2026 5:58PM by PIB Mumbai

 

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) पुण्यातील मेघदूत हॉल येथे आज "द ईसीआर नेक्सस: आवाज, साधने आणि विज्ञान यांना समाजाशी जोडणे" या शीर्षकाखाली अर्ली करिअर रिसर्चर (ईसीआर) कार्यशाळेचे आयोजन केले. हा कार्यक्रम ईस्टिक (ईएसटीआयसी) अर्थात उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या परिषदेच्या पूर्वारंभाचा कार्यक्रम म्हणूनही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. टी. श्रीनिवास कुमार यांनी या कार्यक्रमात प्रमुख भाषण केले. त्यांनी परिषदेची प्रमुख संकल्पना आणि धोरणात्मक उद्दिष्टे स्पष्ट केली. कुमार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात भारताच्या भविष्यकालीन विकासाला चालना देण्यासाठी तसेच संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्याकरिता विज्ञान, तंत्रज्ञान आणि धोरण यांचा समन्वय महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले.

महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रगती साधण्यासाठी आणि संशोधक, धोरणकर्ते तसेच उद्योगपती यांच्यासाठी सहयोगी व्यासपीठ निर्माण करण्याप्रति मंत्रालयाची निरंतर वचनबद्धता कुमार यांच्या भाषणातून अधोरेखित झाली. कुमार यांनी ईस्टिक’च्या (ESTIC) प्राथमिक उद्दिष्टांवर प्रकाश टाकत, सर्व संबंधितांनी शाश्वत राष्ट्रीय प्रगतीसाठी उदयोन्मुख तांत्रिक प्रगतीचा लाभ घेण्यासाठी कृती करावी असे आवाहन केले. या पूर्वारंभ कार्यक्रमाने परिषदेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून मुख्य परिषदेत परिवर्तनकारी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • उद्घाटन समारंभ: आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र ए. राव यांचे प्रमुख स्वागतपर भाषण झाले. वैज्ञानिक आयोजन समितीच्या (एसओसी) प्रतिनिधींनीही स्वागतपर मनोगत व्यक्त केले. यामध्ये जर्मनीतील ज्युलीच येथील एपीएआरसी कार्यालयाच्या संचालक डॉ. इनेस ट्रिट्शर, बीजिंग येथील त्सिंघुआ विद्यापीठाचे डॉ. जोनाथन एस. राईट आणि स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील जागतिक हवामान संशोधन कार्यक्रम (डब्ल्यूसीआरपी), जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) डॉ. हिंदुमती पलानीसामी यांचा समावेश होता. आयआयटीएम’च्या सीसीसीआर’च्या प्रकल्प संचालक आणि वैज्ञानिक आयोजन समितीच्या सदस्य डॉ. सुवर्णा फडणवीस यांनी आभार प्रदर्शन केले. सत्र संयोजिका डॉ. अदिती मोदी यांनी ईसीआर कार्यशाळेची सविस्तर माहिती दिली.
  • बीजभाषण आणि तज्ञांची चर्चासत्रे : मेरीलँड विद्यापीठाच्या डॉ. मारिया मोलिना यांनी भूविज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या विषयावर प्रमुख सादरीकरण केले. एका संवादात्मक पॅनेल चर्चेत शैक्षणिक क्षेत्रातील आणि त्याबाहेरील करिअरच्या वाटचालींचा शोध घेण्यात आला. यामध्ये एनव्हिडिया, जागतिक हवामान संशोधन कार्यक्रम, (डब्ल्यूसीआरपी/ डब्ल्यूएमओ), लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी, टोकियो विद्यापीठ आणि जम्मू केंद्रीय विद्यापीठ यांसारख्या संस्थांमधील जागतिक तज्ञ सहभागी झाले होते.
  • तांत्रिक सत्रे आणि प्रशिक्षण: उपस्थितांनी मुख्य संकल्पनात्मक प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रत्यक्ष विचारमंथन सत्रांमध्ये, नेचर पोर्टफोलिओ आणि स्प्रिंगर नेचरच्या प्रतिनिधींसोबतच्या "संपादकांना भेटा" या परस्परसंवादी भागात, आणि डॉ. बिर्गिट हॅसलर यांनी समन्वित केलेल्या पृथ्वी प्रणाली मॉडेल मूल्यमापन साधनांवरील सर्वसमावेशक तांत्रिक मार्गदर्शनात भाग घेतला.
  • जागतिक सहभाग: यंग अर्थ सिस्टम सायंटिस्ट्स समुदायाने नवोदित संशोधकांसाठी आंतरराष्ट्रीय संपर्क जाळे निर्माण करण्याच्या संधींवर सादरीकरण केले. या कार्यशाळेचा उद्देश वातावरणीय आणि पृथ्वी विज्ञान संशोधकांच्या पुढील पिढीत सहकार्य, कौशल्य विकास आणि आंतर-शाखीय संवादाला चालना देणे हा होता.

एस्टिक बद्दल

इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी, अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (एस्टिक) हे भारताचे मुख्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंशोधन व्यासपीठ आहे. हे सरकारी मंत्रालये, धोरणकर्ते, आघाडीचे शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्रातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोदित उद्योगांना (स्टार्टअप्स) एकत्र आणून विविध क्षेत्रांमधील सहकार्याला चालना देते. तसेच अत्याधुनिक संशोधन प्रदर्शित करते आणि राष्ट्रीय आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे भारताला विकसित भारत 2047 च्या ध्येयाकडे नेण्यास गती मिळते.

एस्टिक 2026 हे "सर्जनशील मने, विज्ञानाला गती, तंत्रज्ञानाचे सक्षमीकरण" या संकल्पनेने प्रेरित आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, हा उपक्रम वैज्ञानिक विचारवंतांना एकत्र आणतो, तरुण नवसंशोधकांना प्रेरित करतो आणि वैज्ञानिक उत्कृष्टता तसेच तांत्रिक प्रगतीच्या दिशेने भारताचा प्रवास मजबूत करतो. संस्था आणि क्षेत्रांमधील पारंपारिक भिंती दूर करण्यासाठी आयोजित या बहु-दिवसीय महापरिषदेमध्ये तांत्रिक स्वावलंबन आणि शाश्वत राष्ट्रीय प्रगतीकडे भारताच्या दृष्टिकोनाला गती देण्यावर केंद्रित उच्च-स्तरीय मुख्य भाषणे, संकल्पनात्मक तांत्रिक सत्रे आणि प्रदर्शनांचा समावेश आहे.

एपीएआरसी अर्ली करिअर रिसर्चर (ईसीआर) कार्यशाळा 2026 विषयी

एपीएआरसीच्या (वातावरणीय प्रक्रिया आणि हवामानातील त्यांची भूमिका) सर्वसाधारण सभा 2026 च्या पार्श्वभूमीवर, 'द ईसीआर नेक्सस- कनेक्टिंग व्हॉईसेस, टूल्स अँड सायन्स टू सोसायटी' या शीर्षकाअंतर्गत, एपीएआरसी अर्ली करिअर रिसर्चर (ईसीआर) कार्यशाळा 2026 चे आयोजन 11 ऑक्टोबर 2026 रोजी आयआयटीएम पुणे येथे करण्यात आले होते. ही कार्यशाळा विशेषतः विद्यार्थी आणि कारकीर्दीच्या प्रारंभिक टप्प्यावर असलेल्या संशोधकांसाठी, कारकीर्द विकास, उदयोन्मुख वैज्ञानिक साधने, संशोधनातील आव्हाने, वैज्ञानिक संवाद आणि आंतरराष्ट्रीय वातावरण तसेच हवामान संशोधन समुदायात सहभागी होण्याच्या संधींवर चर्चेसाठीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत जवळपास 120 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभागींनी उपस्थिती लावली, त्यामध्ये करिअरच्या प्रारंभिक टप्प्यावरील संशोधक, वरिष्ठ शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, संपादक तसेच विविध वैज्ञानिक आणि संस्थात्मक पार्श्वभूमीचे व्यावसायिक एकत्र आले होते.

या कार्यक्रमाची रचना, संशोधकांना कारकीर्दीच्या प्रारंभिक टप्प्यावर भेडसावणाऱ्या शास्त्रीय आणि व्यावसायिक अशा दोन्ही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. कारकीर्दीच्या मार्गांवरील एका पॅनेल चर्चेत शैक्षणिक क्षेत्रातील आणि त्याबाहेरील संधीचा आढावा घेण्यात आला, तर निधीचे बदलते वातावरण, गतीशीलता, संशोधन पायाभूत सुविधा आणि संगणकीय स्रोतांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय संधी आणि वैज्ञानिक नेतृत्वाचे मार्ग आदी मुद्यांवर चर्चा करण्यासही वाव देण्यात आला.

कारकीर्दीच्या प्रारंभिक टप्प्यावरील संशोधक आणि प्रस्थापित शास्त्रज्ञ यांच्यात मोकळा संवाद घडवून आणणे, तसेच या ईसीआरना त्यांच्या समवयस्कांशी अनुभवाचे आदान प्रदान करण्याची संधी देणे असाही या कार्यशाळेचा उद्देश होता. गट चर्चा आणि विचार मंथन सत्रांमधून वैज्ञानिक कारकीर्दीतील बदलत्या स्वरूपाविषयी विविध दृष्टीकोन मांडले गेले, त्यामध्ये निधी आणि गतीशीलता, डेटा व संगणकीय पायाभूत सुविधांची असमान उपलब्धता, एआय/एमएल, नेतृत्त्वाच्या संधी तसेच समाज आणि धोरणे यांच्याशी वैज्ञानिक संशोधनाचा अधिक प्रभावीपणे मेळ घालण्याची गरज यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला पृथ्वी विज्ञान मंत्रालय, डब्ल्यूसीआरपी, डब्ल्यूएमओ, एपीएआरसी, फोर्शेन्ग्झेंट्रम युलिच,जर्मनी), आयएएमएएस, आयसीएमए, नासा आणि आणि खाजगी भागीदारांचे प्रायोजकत्व लाभले.

***

शैलेश पाटील/माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322042) अभ्यागत कक्ष : 10