नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा येथील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर यात्री सेवा अभियानाचा समारोप


प्रवाशांच्या सोयीसुविधा, सुलभता आणि विमानतळावरील सुविधा अधिक सक्षम करण्यावर 25 दिवसांच्या या अभियानात भर

Posted On: 10 OCT 2026 11:28AM by PIB Mumbai

 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 17 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आलेल्या 25 दिवसीय यात्री सेवा अभियानाची आज सांगता झाली. प्रवाशांच्या सोयीसुविधा, सुलभता आणि सेवा दर्जा सुधारण्यावर या अभियानात भर देण्यात आला.

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, त्यांना तत्परतेने आणि सौजन्याने सेवा मिळावी, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत विमानतळावरील अधिकाऱ्यांनी प्रमुख सुविधांची पाहणी केली. विमानतळाची स्वच्छता, प्रवाशांसाठी आसनव्यवस्था, वाहनतळाचे व्यवस्थापन, दिशादर्शक फलक, सामान हाताळणी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि मदत कक्षातील सेवा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक आरामदायी व त्रासमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या, अशी माहिती विमानतळाचे संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाश दीप यांनी दिली.

या अभियानांतर्गत विमानतळावरील सुरक्षा तपासणीनंतरच्या प्रतीक्षा क्षेत्रात प्रवाशांसाठी गायन, चित्रकला आणि कपकेक सजावट यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. प्रवाशांचे पारंपरिक टिळा लावून स्वागत करण्यात आले. त्यांना भेटवस्तू आणि बियांच्या पेनचे वाटपही करण्यात आले. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने पारंपरिक गोमंतकीय नृत्यांचे सादरीकरण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे या अभियानाला स्थानिक संस्कृतीची जोड मिळाली.

दिव्यांग व्यक्ती, हालचालींमध्ये अडचण असलेले प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, कुटुंबे आणि प्रथमच विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच, प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांची ये-जा अधिक सुरळीत करण्यासाठी डिजी यात्रा, स्वतःहून सामान जमा करण्याची सुविधा आणि कॉमन यूज सेल्फ सर्व्हिस किऑस्क या डिजिटल सुविधांचाही आढावा घेण्यात आला.

या अभियानांतर्गत गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच, विमानतळावरील वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्याची व्यवस्था आणि पर्यावरणपूरक विमानतळ कार्यपद्धती यांचाही अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

अभियानाच्या समारोपाच्या दिवशी विमानतळाचे संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाश दीप यांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांसह संपूर्ण टर्मिनलची पाहणी केली. या वेळी करण्यात आलेल्या सुधारणांचा आढावा घेण्यात आला आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची तपासणी करण्यात आली.

अभियान संपल्यानंतरही प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि विनाअडथळा प्रवासाचा अनुभव देण्यासह दर्जेदार सेवा देण्याची आपली बांधिलकी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुन्हा अधोरेखित केली.

***

शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2321838) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English