शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा संगमचा सातवा टप्पा गोवा-मिझोराम या राज्यातील सांस्कृतिक संबंध करणार अधिक दृढ


मिझोरामहून 57 प्रतिनिधी गोव्याला भेट देणार तर गोव्याचे 55 सदस्यीय पथक आठवडाभराच्या दौऱ्यासाठी मिझोरामला रवाना

Posted On: 10 OCT 2026 5:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत युवा संगमच्या सातव्या टप्प्याचा भाग म्हणून गोवा आणि मिझोराम या राज्यांची जोडी तयार करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांतील युवकांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण, परस्पर सामंजस्य आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) या कार्यक्रमाचे समन्वयन करत आहे.

मिझोराममधील 57 सदस्यांचा गट 10 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एका आठवडाभराच्या कार्यक्रमासाठी गोव्याला भेट देणार आहे. या शिष्टमंडळात मिझोराम केंद्रीय विद्यापीठाचे पाच प्राध्यापक, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) दोन प्रतिनिधी- लेफ्टनंट कमांडर अखिल शर्मा आणि नरेश च. ग्रोव्हर तसेच राज्यातील पदवीपूर्व विद्यार्थी यांचा समावेश आहे.

गोव्यातील एनआयटी परिसरातील वास्तव्यादरम्यान, हे शिष्टमंडळ महत्त्वाच्या वारसा स्थळांना भेट देईल, गोव्याच्या खाद्यसंस्कृती आणि परंपरांचा अनुभव घेईल, तसेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) प्रतिनिधींशी संवाद साधेल. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांना गोव्याच्या राज्यपालांना भेटण्याची संधीही मिळेल.

दरम्यान, गोव्यातील 55 प्रतिनिधींचा गट, एनआयटीतील पाच कर्मचाऱ्यांसह 10 ऑक्टोबर रोजी एका आठवडाभराच्या दौऱ्यासाठी मिझोरामला रवाना होत आहे. या परस्पर भेटीमुळे दोन्ही राज्यांतील सहभागींना एकमेकांचा सांस्कृतिक वारसा, परंपरा, जीवनशैली आणि विकासात्मक उपक्रमांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.

हा कार्यक्रम - प्रोद्योगिकी (तंत्रज्ञान), परंपरा, प्रगती, पर्यटन आणि परस्पर संपर्क या पाच प्रमुख संकल्पनांवर आधारित आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांना भेटी, स्थानिक समुदायांशी संवाद आणि अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून हा उपक्रम तरुणांमध्ये सामंजस्य वाढवणे आणि दीर्घकालिक संबंध निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

युवा संगमच्या 7व्या टप्प्याचा उद्देश सहभागींना गोवा आणि मिझोरामच्या विशिष्ट सांस्कृतिक ओळखींचा प्रत्यक्ष अनुभव देणे, तसेच त्यांना परस्परांच्या चालीरीती, परंपरा आणि अनुभव सामायिक करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. हा उपक्रम 'विविधतेत एकता' ही भावना दृढ करण्याचा आणि 'विकसित भारत' अंतर्गत एकसंध, सर्वसमावेशक आणि प्रगतीशील भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचा प्रयत्न आहे.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321803) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English