अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या महिला कर्करोग उपक्रमाच्या 24व्या वार्षिक परिषदेत, स्त्रीरोग विषयक कर्करोगांच्या उपचारांना नव्या संशोधनातून समोर येत असलेले पुराव्यांच्या भूमिकेवर चर्चा

Posted On: 10 OCT 2026 3:21PM by PIB Mumbai

 

स्त्रीरोगविषयक कर्करोगाच्या उपचारांमधील प्रगती आणि या उपचार पद्धतींचा दैनंदिन वैद्यकीय व्यवहारात अवलंब करताना येणारी आव्हाने, हा टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या महिला कर्करोग उपक्रमाच्या (WCI–TMH) 24व्या वार्षिक परिषदेचा मुख्य विषय आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या आर. डी. चोक्सी सभागृहात ही परिषद सुरू आहे. “स्त्रीरोगविषयक कर्करोग: पुरावे आणि प्रत्यक्ष कृती” या संकल्पनेवर आधारित ही परिषद 8 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झाली. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी पूर्वपरिषद कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या तर दोन दिवसीय मुख्य वैज्ञानिक परिषद आजपासून सुरू झाली.

भारतात स्त्रीरोगविषयक कर्करोग हे आरोग्य क्षेत्रातील एक मोठे आव्हान कायमच राहिले आहे. ग्लोबोकॅन 2024 च्या अंदाजानुसार, देशात 2024 मध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुख्य भागाचा कर्करोग या प्रकारांचे मिळून दीड लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या आकडेवारीवरून वेळेवर निदान, योग्य उपचार पद्धतीची निवड आणि विविध वैद्यकीय शाखांच्या समन्वयातून दिल्या जाणाऱ्या विशेष कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध करून देणे यांचे महत्त्व अधोरेखित होते.

स्त्रीरोगविषयक कर्करोग उपचार शास्त्रातील एक प्रमुख प्रगती म्हणजे - पारंपरिक अवस्था वर्गवारी (स्टेज निश्चित करणे) आणि उतकांच्या सूक्ष्म रचनेवर आधारित श्रेणीकरणाच्या कर्करोगाच्या गाठीच्या जैविक वैशिष्ट्यांचे अधिक अचूक आकलन करण्यावर दिला जाणारा भर. आनुवंशिक कर्करोगाशी संबंधित जणूकांच्या तपासणीसाठीचे पॅनेल आणि आण्विक निदान तंत्राचा वाढता वापर यामुळे कर्करोगाचा धोका निश्चित करणे, आनुवंशिक कर्करोग होण्याची संभाव्यता ओळखणे आणि उपचार पद्धती निवडणे शक्य होत आहे. अंडाशयाच्या कर्करोगातील जनुकीय चाचणी आणि गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या कर्करोगातील आण्विक वर्गीकरण यामुळे विशिष्ट उपचार पद्धतींचा लाभ होऊ शकणाऱ्या रुग्णांची ओळख पटवण्यास डॉक्टरांना मदत होत आहे.

शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, लक्ष्यावर केंद्रित अचूक रेडिओथेरपी, लक्ष्यित उपचार आणि प्रतिकारशक्ती वर आधारित उपचारपद्धती प्रगत अवस्थेतील स्त्रीरोगविषयक कर्करोग असलेल्या महिलांसाठी उपचारांचे पर्याय वाढले आहेत. अलीकडील वैद्यकीय संशोधनातून मिळालेल्या पुराव्यांनी निवडक रुग्णगटांमध्ये रुग्णांच्या जगण्याच्या दरात सुधारणा दर्शविली आहे. यात स्थानिक पातळीवर प्रगत अवस्थेतील गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि प्रगत अवस्थेती किंवा पुन्हा उद्भवलेल्या गर्भाशयाच्या अंतःस्तराचा कर्करोग असलेल्या महिलांचा समावेश आहे. ही प्रगती विशेषतः तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतील कर्करोगाच्या उपचारांसाठी महत्त्वाची आहे. अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये अनेकदा विविध उपचार पद्धतींचा एकत्रीत वापर आवश्यक असतो.

या बैठकीत भारतीय आणि निमंत्रित आंतरराष्ट्रीय कर्करोगतज्ज्ञ एकत्र आले असून, उपचारांच्या बदलत्या पद्धती, बहुविद्याशाखीय उपचार आणि वैद्यकीय निर्णयप्रक्रियेत नव्याने उपलब्ध होणाऱ्या वैज्ञानिक पुराव्यांचा वापर यांचा आढावा घेण्यात येत आहे.

या परिषदेत अंडाशयाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या अंतःस्तराचा कर्करोग यांच्या उपचारांमध्ये होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित उपचारांची निवड आणि रुग्णांच्या उपचारांचे परिणाम सुधारण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

अंडाशयाच्या कर्करोगावरील सत्रांमध्ये पीएआरपी इनहिबिटरच्या युगातील बदलत्या उपचारपद्धती, प्लॅटिनम औषधांप्रति संवेदनशीलतेविषयी बदलत्या संकल्पना, बायोमार्कर्स आणि पुन्हा उद्भवलेल्या कर्करोगाच्या बहुविद्याशाखीय व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली. यावेळी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, ब्रिटन येथील युसीएल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रा. जोनाथन लेडरमन यांनी ‘पद्मश्री डॉ. केतायुन दिनशॉ ऑरेशन’ अंतर्गत ‘पीएआरपी इनहिबिटरसोबतचा प्रवास : या प्रवासातून मिळालेले धडे या विषयावर व्याख्यान दिले.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील सत्रांमध्ये औषधोपचारांतील अलीकडील प्रगती, उपचारांमध्ये इम्युनोथेरपीची बदलती भूमिका, सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगावरील शस्त्रक्रियेच्या पद्धती, रेडिओथेरपीमधील प्रगती आणि उपचारांच्या गुणवत्तेसाठी आवश्यक मानकांचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या कर्करोगावरील कार्यक्रमात आण्विक वर्गीकरण, उपचारांच्या निर्णयांवरील त्याचे परिणाम, औषधोपचारांमधील प्रगती आणि सहायक रेडिओथेरपीची भूमिका यांचा आढावा घेण्यात आला.

या परिषदेत सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ टुलूजचे मानद ऑन्कोलॉजी प्राध्यापक आणि युरोपियन सोसायटी ऑफ गायनॅकोलॉजिकल ऑन्कोलॉजीचे माजी अध्यक्ष प्रा. डेनिस क्वेरल्यू, तसेच फ्रान्समधील पॅरिस येथील सोरबोन विद्यापीठाच्या पितिए-साल्पेत्रिएर विद्यापीठ रुग्णालयातील प्रा. सायरस चार्गारी यांचा समावेश आहे.

वैज्ञानिक कार्यक्रमात व्हल्व्हर आणि व्हल्व्होव्हजायनल कर्करोग, प्रजननक्षमता जतन करणे, उपचारांनंतरचे जीवन आणि रुग्णांनी स्वतः नोंदवलेल्या उपचारविषयक परिणामांवरही चर्चा करण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधनावरील सादरीकरणे आणि विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांच्या सहभागातून झालेल्या प्रकरणनिहाय चर्चांमध्ये भारतीय आरोग्यसेवा व्यवस्थेत वैज्ञानिक पुराव्यांचा व्यावहारिक वापर कसा करता येईल, याचा आढावा घेण्यात आला.

परिषदपूर्व वैज्ञानिक कार्यशाळा

9 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी. वाय. एल. नायर रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कॅडेव्हरिक सर्जिकल ॲनाटॉमी कार्यशाळेत श्रोणी प्रदेशातील प्रगत शस्त्रक्रियात्मक शरीररचना आणि शस्त्रक्रियेच्या तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. डेनिस क्वेरल्यू यांच्यासह तज्ज्ञांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यामध्ये श्रोणी आणि रेट्रोपेरिटोनियल भागातील लिम्फ नोड्स काढण्याची शस्त्रक्रिया, ओमेंटेक्टॉमी, पेरिटोनेक्टॉमी, डायाफ्रामवरील शस्त्रक्रिया आणि हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी (एचआयपीईसी) शी संबंधित तंत्रांचा समावेश होता. शस्त्रक्रियेतील अचूकता आणि शरीररचनेचे सखोल आकलन यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.

अत्याधुनिक रेडिओथेरपी व ब्राचीथेरपी कार्यशाळादेखील 9 ऑक्टोबर रोजी झाली. यामध्ये किरणोत्सारी उपचारांचे नियोजन व कर्करोग झालेल्या महिलेची प्रसूती याबाबतच्या समकालिन दृष्टीकोनावर भर दिला गेला. प्रो. सायरस चारगरी आणि डॉ सुप्रिया चोप्रा यांच्यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रतिमा मार्गदर्शित किरणोत्सारी उपचार, कर्करोगग्रस्त पेशींचे आरेखन, किरणोत्सारी स्रोत कर्करोगाच्या गाठीमध्ये किंवा गाठीजवळ, शरीर पोकळीत ठेवून केली जाणारी ब्राचीथेरपी, हाताने ऍप्लीकेटर बसविण्याची पद्धत आणि उपचारांना आव्हान देणाऱ्या परिस्थितीवर रुग्ण आधारित चर्चा यांचा समावेश होता.

8 व 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन दिवसांच्या कृत्रिम बुद्धीमत्ता कार्यशाळेत कर्करोगावरील उपचारांमध्ये रुग्णालयातील कामकाज व वैद्यकीय संशोधन ते माहितीचे विश्लेषण व शै७णिक कामकाजापर्यंत एआयचा वापर करण्याच्या शक्यतांबाबत विचारविनिमय केला गेला. या उपक्रमामध्ये प्रचंड मोठी भाषा प्रारुपे, एआय आधारित उपयोगिता विकास आणि रुग्णालये व क्लिनिक उभारण्यासाठी एआयचा उपयोग यावरही कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात आयआयटी मुंबईचे प्रा. शिवराम कल्याण कृष्णन यांचे ‘मज्जासंस्थेची रचना समजून घेताना’ याविषयावरील व्याख्यानही झाले.

सोसायटी ऑफ गायनॅकॉलॉजिकल इमेजिंग अँड इंटरव्हेन्शन इंडिया (एसओजीआयआयसीओएन) संस्थेच्या 4 थ्या वार्षिक परिषदेच्या आणि रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका (आरएसएनए) यांच्या सहकार्याने 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी किरणोत्सार विज्ञान परिषद आयोजित करण्यात आली होती. आरएसएनए ही सर्वात मी जागतिक रेडिओलॉजी सोसायटी असून तिच्या जागतिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांमधील कर्करोगाबाबतचे प्रशिक्षण टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने गेली तीन वर्ष दिले जात आहे.

आरएसएनए संस्थेने डॉ. प्रिया भोसले (एमडी अँडरसन, ह्यूस्टन) यांच्या भेटीसाठी सहकार्य केले. डॉ. भोसले यांचे ‘भविष्याच्या दृष्टीकोनातून स्त्रीरोगविषयक प्रतिमांकनाचे दशक आणि हस्तक्षेप’ याविषयावर बीजभाषण झाले.

या परिषदेचे उद्घाटन सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा विभागाच्या निवृत्त डेप्युटी जनरल, सर्जन व्हाइस ऍडमिरल डॉ. आरती सरीन यांच्या हस्ते झालं. डॉ. सरीन यांनी वैद्यकीय नैतिकता, संस्कृती व डॉक्टरचे आयुष्य याविषयी भाष्य केले.

टीएससीचे संचालक आणि डब्ल्यूसीआयचे अध्यक्ष डॉ. सुदीप गुप्ता, टीएमसीच्या शिक्षण विभागाचे उपसंचालक आणि रेडीओलॉजी विभागप्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी, एसओजीआयआयच्या अध्यक्ष डॉ. भावना देव, एसओजीआयआयच्या सचिव डॉ. रुपा रंगनाथन, महिला कर्करोग विभागाचे सरचिटणीस डॉ. पलक ठक्कर व डॉ. सुश्मिता रथ आणि डॉ. एम. एच. ठाकूर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या परिषदेत 280 किरणोत्सारी उपचार तज्ज्ञ सहभागी झाले होते. उकष्ट वैज्ञानिक चर्चासत्रे, बहुशाखीय परिसंवाद आणि एआयवरील चर्चा ही परिषदेची ठळक वैशिष्ट्ये होती. संवादात्मक कार्यशाळेमुळे शस्त्रक्रियात्मक व वैद्यकीय निष्पत्तीवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या शोधांचे प्रशिक्षण दिले गेले. कार्यशाळेतील शास्त्रीय चर्चांना उच्च शैक्षणिक दर्जाची परिषद म्हणून वैचारिक स्वीकृती व प्रशंसा लाभली.  

या परिषदेच्या माध्यमातून स्त्रियांमधील कर्करोगाचे पुरावा आधारित, बहुशाखीय व्यवस्थापन करण्याला बळकटी देण्याचा डब्ल्यूसीआय-टीएमएच संस्थेचा उद्देश होता. यासाठी निदानातील व उपचारांमधील प्रगतीचा भारतातील सुधारित रुग्णसेवेसाठी वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला.

डॉ. अमिता माहेश्वरी, डॉ. सुप्रिया चोप्रा, डॉ. अनबर्सन सेकर, डॉ. रोहिणी कुलकर्णी, डॉ. प्राची मित्तल, डॉ. नीलेश साबळे, डॉ. अक्षय बाहेती आणि डॉ. पलक ठक्कर यांनी ही परिषद आयोजित केली होती.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/हेमांगी कुलकर्णी/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321801) अभ्यागत कक्ष : 29
Read this releasein: English