अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीजीटीएस, मुंबई विभागीय कार्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम युवा, जबाबदार नागरिक : करविषयक साक्षरता, मानसिक आरोग्य जागरूकता आणि नशामुक्त भारत अभियान’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Posted On: 10 OCT 2026 3:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) करदाता सेवा महासंचालनालयाने (डीजीटीएस), मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (यूएम–जीआयसीईडी) यांच्या सहकार्याने आज मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरातील जीआयसीईडी येथे ‘सक्षम युवा, जबाबदार नागरिक : कर साक्षरता, मानसिक आरोग्य जागरूकता आणि नशामुक्त भारत अभियान’ या विषयावर प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा संमिश्र पद्धतीने परिसंवाद-सह-वेबिनारचे आयोजन केले. या कार्यक्रमात जबाबदार नागरिकत्त्वाच्या तीन महत्त्वपूर्ण पैलूंवर, म्हणजेच कर साक्षरता, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानावर भर देण्यात आला. तरुण नागरिकांमध्ये माहितीपूर्ण निर्णयक्षमता आणि जबाबदार वर्तनाला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. केयुरकुमार एम. नायक यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कर साक्षरता, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. पारंपरिक शैक्षणिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये माहितीपूर्ण निर्णयक्षमता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी संघटनांमधील सहकार्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

डीजीटीएस, मुंबई विभागीय कार्यालयाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी बीजभाषणात कार्यक्रमाच्या तीन प्रमुख विषयांचे, म्हणजेच कर साक्षरता, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणे हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

मानसिक स्वास्थ्य, तणाव व्यवस्थापन आणि गरज भासल्यास व्यावसायिक मदत घेण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवून निरोगी आणि अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कर साक्षरतेच्या विषयावर बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात सीमाशुल्क आणि वस्तू व सेवा कर यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट केले. यामध्ये कर अनुपालन, इनपुट टॅक्स क्रेडिट, निर्यात प्रक्रिया आणि परतावा यंत्रणा यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वेच्छेने कर अनुपालन, करदात्यांमध्ये जागरूकता आणि व्यापार सुलभतेचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठ आणि गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (युएम–जीआयसीईडी) यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण निर्णय घ्यावेत, आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात आणि अधिक निरोगी व जबाबदार समाजाच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पहिले सत्र मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि नशामुक्त भारत अभियान या विषयावर आयोजित करण्यात आले होते. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ चौला पटेल यांनी या सत्रात मार्गदर्शन केले. त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि त्याचा मादक पदार्थांच्या सेवनाशी असलेला जवळचा संबंध यावर प्रकाश टाकला. तणाव, चिंता, नैराश्य आणि भावनिक अस्वस्थता हे मादक पदार्थांच्या सेवनास कसे कारणीभूत ठरू शकतात, हे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्यासंबंधित समस्यांची लक्षणे वेळीच ओळखून योग्य वेळी समुपदेशन आणि तज्ञांची मदत मिळवणे याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांची सुरुवातीची लक्षणे, तणावाचे प्रभावी व्यवस्थापन पद्धती, आधारभूत काळजी पुरवण्यात कुटुंबांची भूमिका तसेच मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनतेभोवती असलेला कलंक कमी करण्याची गरज यावरही त्यांनी चर्चा केली. या सत्रात तरुणांसाठी मानसिक क्षमता वाढवणे, वेळीच मदत घेण्याला प्रोत्साहन देणे आणि सहकार्यपूर्ण, अंमली पदार्थमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला.

दुसरे सत्र, करविषयक साक्षरता, “सीमाशुल्क आणि जीएसटीमधील संबंध” या विषयावर आयोजित करण्यात आले होते. मुंबई येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त दीपक माता यांनी या सत्रात मार्गदर्शन केले. सीमाशुल्क प्रतिनिधी, मालवाहतूकदार आणि लॉजिस्टिक्स व्यावसायिकांसाठी, विशेषतः सीमाशुल्क प्रतिनिधी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हे दोन्ही कायदे समजून घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सीमाशुल्क प्रक्रिया आणि जीएसटी तरतुदींमधील परस्परसंबंध स्पष्ट केले. यात मालाचे मूल्यांकन आणि मंजुरी, आयातीवरील आयजीएसटीची वसुली, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि निर्यात परतावा यंत्रणा यांचा समावेश होता. जीएसटीआयएन क्रमांकामधील चुका, घोषित केलेल्या वस्तूंच्या मूल्यांतील त्रुटी तसेच शिपिंग बिले आणि जीएसटी रिटर्नमधील तफावतींमुळे करविषयक नियमांचे पालन करण्यात अडचणी येऊ शकतात आणि कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. मालाची सीमा शुल्कातून विनाअडथळा मंजुरी मिळवणे, स्वेच्छेने कर नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे आणि व्यवसाय सुलभता वाढवणे यासाठी सीमाशुल्क आणि जीएसटी क्षेत्रातील बदलांची अद्ययावत माहिती ठेवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. व्यावहारिक उदाहरणे आणि केस स्टडीजच्या माध्यमातून, त्यांनी सहभागींना करप्रणाली आणि तिच्या व्यावहारिक परिणामांविषयीची त्यांची समज अधिक दृढ करण्यासाठी प्रोत्साहित केले.

या प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने आयोजित जनसंपर्क कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि इतर हितधारकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे करप्रणाली, मानसिक आरोग्य आणि अंमली पदार्थांच्या सेवन प्रतिबंधाविषयी जागरूकता वाढली. या उपक्रमाने करदात्यांमध्ये जागरूकता, ऐच्छिक अनुपालन आणि जबाबदार नागरिकत्व यांप्रति मुंबई विभागीय घटकाच्या महासंचालनालयाच्या करदाता सेवा (डीजीटीएस, एमझेडयू) कार्यालयाची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. या प्रसंगी, मुंबई विभागीय घटकाच्या करदाता सेवा महासंचालनालयाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांच्या हस्ते “ड्यूटी इन सस्पेंशन: बॉन्डेड वेअरहाउसिंग इन इंडिया – कॉन्सेप्ट अँड प्रॅक्टिस” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या जीआयसीईडी’चे कार्यक्रम समन्वयक प्रकाश खत्री यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात सीमाशुल्काच्या अधीन असलेली बॉन्डेड वेअरहाउसिंग, एमओओडब्ल्यूआर आणि एफटीडब्ल्यूझेड्स यांबद्दल व्यावहारिक माहिती देण्यात आली आहे. 

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321800) अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein: English