संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वदेशी बनावटीची पाणबुडी-विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका ‘मंगरोळ’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

Posted On: 09 OCT 2026 7:13PM by PIB Mumbai

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल), कोची यांनी बांधलेली तिसरी अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी), अर्थात पाणबुडी-विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका ‘मंगरोळ’, 12 ऑक्टोबर 2026 रोजी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाला नौदल आणि संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण मंत्रालय आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, नौदलाचे माजी अधिकारी तसेच स्वदेशी शस्त्रे आणि सेन्सर्स उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील 'मंगरोळ' या किनारपट्टीवरील शहराच्या आणि प्रमुख मासेमारी बंदराच्या नावावरून नामकरण करण्यात आलेली ही नौका, 'आयएनएस मंगरोळ' (एम85) या पूर्वीच्या 'माइनस्वीपर', अर्थात सुरुंग शोधक आणि विनाशक युद्ध नौकेचा वारसा पुढे नेईल. ही युद्धनौका 7 एप्रिल 2004 पर्यंत भारतीय नौदलाच्या सेवेत होती. नवीन जहाजाचे नामकरण, भारतीय नौदलाच्या माजी युद्धनौकांचा वारसा जतन करण्याच्या परंपरेला अनुसरून आहे.

80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करून उभारण्यात आलेली 'मंगरोळ' ही नौका, युद्धनौकांचे डिझाइन आणि बांधणी तसेच प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्सच्या एकत्रीकरणातील भारताच्या वाढत्या क्षमतेचे दर्शक आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत सीएसएलने बांधलेले हे जहाज, संरक्षण क्षेत्रातील जहाजबांधणीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

किनारपट्टी आणि उथळ पाण्यातील पाण्याखालील धोके शोधण्यासाठी आणि त्यांचा प्रतिरोध करण्यासाठी डिझाइन केलेले, मंगरोळ हे जहाज अभय हल-माउंटेड सोनार, लाइटवेट टॉर्पेडो, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर आणि मारीच ॲडव्हान्स्ड टॉर्पेडो डेकॉय सिस्टीम यासारखी आधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज आहे. वॉटरजेट प्रोपल्शन प्रणाली असलेल्या तीन डिझेल इंजिनांवर चालणारे हे जहाज उथळ पाण्यातील ऑपरेशन्ससाठी उच्च गतिशीलता प्रदान करते. पाण्याखाली पाळत ठेवणे, कमी तीव्रतेची सागरी कारवाई आणि सुरुंग युद्धाशी संबंधित मोहिमांसाठी देखील ते सक्षम आहे.

 

विशेषत: किनारपट्टीच्या भागात, जिथे मोठ्या युद्धनौकांना हालचाल करतांना मर्यादांचा सामना करावा लागतो, अशा ठिकाणी ‘मंगरोळ’ युद्धनौका भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता मजबूत करेल. पाणबुडीपासून असलेल्या धोक्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी हे जहाज सागरी गस्ती विमाने, हेलिकॉप्टर आणि इतर युद्धनौकांच्या बरोबरीने काम करू शकते. भारतीय नौदलात या नौकेच्या समावेशामुळे बंदरे, गोदी आणि किनारपट्टीकडे येणाऱ्या मार्गांचे रक्षण करण्याबरोबरच मोठ्या ताफ्याचा समावेश असलेल्या मोहिमांना बळ देण्याची नौदलाची क्षमता वाढेल.

सागरी सुरक्षेच्या बदलत्या परिस्थितीत पाण्याखालील धोके वाढत असताना, 'मंगरोळ'चे कार्यान्वित होणे हा भारतीय नौदलाच्या, विशेषतः किनारपट्टीच्या भागात पाणबुडी-विरोधी युद्धक्षमता बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा आहे. या जहाजाचा समावेश भारताची स्वदेशी जहाजबांधणीमधील वाढती क्षमता दर्शवत असून, नौदलाची कार्यान्वयीन सज्जता आणि 'आत्मनिर्भर भारता’प्रति वचनबद्धता अधिक दृढ करतो.

***

Neha Kulkarni / Radhika Aghor / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321608) अभ्यागत कक्ष : 8