भूविज्ञान मंत्रालय
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय महासागरशास्त्र संस्था 12 ऑक्टोबर रोजी आयोजित करणार महासागर विज्ञानावर खुले सत्र आणि सार्वजनिक व्याख्यानाचे आयोजन
Posted On:
08 OCT 2026 5:47PM by PIB Mumbai
पणजी, 8 ऑक्टोबर 2026
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) 85 व्या स्थापना दिनानिमित्त 12 ऑक्टोबर 2026 रोजी सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, गोवा, खुले सत्र आणि सार्वजनिक व्याख्यानाचे आयोजन करणार आहे.
हे ' खुले सत्र' सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 या वेळेत सीएसआयआर –एनआयओ परिसर, दोना पावला येथे आयोजित केले जाईल. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सागरी संसाधने, समुद्रविज्ञान संशोधन आणि महासागर अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या वैज्ञानिक उपकरणांची माहिती मिळवण्याची संधी उपलब्ध होईल.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सागरी संसाधने आणि समुद्रविज्ञान उपकरणांचे प्रदर्शन भरवले जाईल. तसेच महासागर विज्ञानाशी संबंधित चित्रपट दाखवले जातील. विद्यार्थ्यांना समुद्रविज्ञान आणि संशोधनातील करिअरच्या संधींची ओळख करून देण्यासाठी “महासागरविज्ञानातील करिअर” या विषयावर एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
सीएसआयआर –एनआयओ सभागृहात दुपारी 4:00 वाजता सार्वजनिक व्याख्यान होईल. नौदल भौतिक आणि महासागरविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक डॉ. डी. शेषागिरी हे “दृष्टी आकाशाकडे , कान पाण्याकडे ” (Eyes in the Sky, Ears in the Waters) या विषयावर व्याख्यान देतील.
स्थापना दिन कार्यक्रम हा वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक विकासाला चालना देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत अशा नवोन्मेषी, स्पर्धात्मक व शाश्वत उपायांमध्ये योगदान देण्याच्या सीएसआयआर च्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.
सीएसआयआर –एनआयओ ने विद्यार्थी, संशोधक, विज्ञानप्रेमी आणि नागरिकांना या खुल्या सत्रात आणि सार्वजनिक व्याख्यान कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320881)
अभ्यागत कक्ष : 6