माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'चलचित्र संग्रहण: अर्काइव्हिंग, जतन आणि पुनरुज्जीवन' या विषयावरील कार्यशाळेचे पुण्याच्या एनएफडीसी-एनएफएआयमध्ये उद्घाटन
Posted On:
05 OCT 2026 8:34PM by PIB Mumbai
पुणे, 5 ऑक्टोबर 2026
चल चित्र संग्रहण, जतन, र्कायव्हिंग, डिजिटायझेशन आणि पुनरुज्जीवन' या विषयावरील कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा आज पुण्यातील एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया येथे पार पडला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया , पुणे यांच्या सेंटर फॉर ओपन लर्निंग (CFOL) च्या माध्यमातून आणि एनएफडीसी-एनएफएआय च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही नऊ दिवसांची विशेष कार्यशाळा 5 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
चल चित्र संग्रहण आणि जतन करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया आणि पद्धती कार्यशाळेतल्या सहभागी समजावून देणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. यात चित्रपटांची ओळख आणि तपासणी, प्रतिबंधात्मक संवर्धन, चित्रपट दुरुस्ती आणि स्प्लायसिंग, स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन, डिजिटल जतन, पुनरुज्जीवन कार्यप्रवाह, कलर ग्रेडिंग, ऑडिओ पुनरुज्जीवन आणि कागद संवर्धन यांचा समावेश होतो. या कार्यक्रमामध्ये आर्काइव्हल साहित्य आणि उपकरणांचे प्रात्यक्षिक सत्र, संस्थात्मक भेटी आणि आर्काइव्हल व पुनरुज्जीवित केलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून सहभागी एफटीआयआय, एनएफडीसी-एनएफएआय, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि भारतीय रिझर्व्ह बँक आर्काइव्ह्ज यांना भेटी देतील.
उद्घाटन सोहळ्याला प्रमुख मान्यवर आणि विविध संस्थांमधील प्रमुख नेते उपस्थित होते. भारतातील दृक-श्राव्य आर्काइव्हिंगच्या अतिशय महत्त्वाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंग यांनी जतन मोहिमेसाठी अत्यावश्यक असलेले तत्त्वज्ञान उपस्थितांना सांगितले. त्यांनी तत्त्वज्ञ अल्बर्ट कामू यांच्या "जर तुम्हाला खरोखर तुमच्या भविष्याचा आदर करायचा असेल, तर तुमचे सर्वस्व तुमच्या वर्तमानाला द्या" या उक्तीचा संदर्भ देत सहभागी विद्यार्थ्यांना हातातील कामासाठी पूर्णपणे समर्पित होण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी बोलताना, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी देशाचे अफाट चित्रपट उत्पादन आणि विविधरंगी मुव्हिंग इमेजेसचा वारसा विचारात घेऊन भारताच्या आर्काइव्हल व्यवस्थेला बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. भारताला कथाकथनाची एक प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा आहे, परंतु या वारशाचे पद्धतशीर जतन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी अधिक संस्थात्मक लक्ष आणि प्रशिक्षित व्यावसायिकांच्या मोठ्या समूहाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय चित्रपटसृष्टी आणि चित्रपट जतनाच्या इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी नमूद केले की, भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात 1913 मध्ये झाली असली तरी, नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाची स्थापना 1964 मध्येच झाली, ज्यावरून देशाच्या व्यापक दृक-श्राव्य वारशासाठी अधिक भक्कम जतन यंत्रणा तयार करण्याची गरज अधोरेखित होत आहे. जतनाची व्याप्ती ही केवळ चित्रपटांपुरती मर्यादित न राहता व्यापक सांस्कृतिक संदर्भात मुव्हिंग इमेजेस आणि त्यांच्याशी संबंधित आर्काइव्हल साहित्यापर्यंत विस्तारली पाहिजे, असे ते म्हणाले.
ही कार्यशाळा चित्रपट जतन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी विकसित केलेले अनुभव आणि विशेष कौशल्ये सामायिक करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करत आहे, यावर मगदूम यांनी भर दिला. ते म्हणाले की अशा उपक्रमांमुळे भारताच्या दृक-श्राव्य वारशाचे प्रमाण आणि गुंतागुंत हाताळण्यासाठी सक्षम व्यावसायिकांची नवीन पिढी तयार करण्यात आणि चित्रपट जतनामध्ये अधिक रस निर्माण करण्यास मदत होऊ शकते.
उद्घाटन सोहळ्याला एफटीआयआयच्या सेंटर फॉर ओपन लर्निंगचे कार्यकारी प्रमुख प्रा. संदीप शहारे आणि भारतीय रिझर्व्ह बँक आर्काइव्ह्जचे मुख्य आर्काइव्हिस्ट आणि उप-सरव्यवस्थापक रविकिरण पाला यांच्यासह कार्यशाळेशी संबंधित तज्ज्ञ आणि व्यावसायिक उपस्थित होते, ज्यामध्ये सिनेओमचे राहुल पाटील, प्रसाद कॉर्पोरेशनचे सुजित सुवर्णा आणि एनएफडीसी-एनएफएआय चे प्राध्यापक व आर्काइव्हल क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश होता. या कार्यशाळेत आयेशा गीथ अब्बास, लीनाली खैरनार, भावेश सिंग, आर. मुरुगन, एस. वेंकटकृष्णन, प्रसाद कॉर्पोरेशनचे जयकुमार दाशरथन, अमित पाटील, जयकृष्ण कुनापरेड्डी, रिताजित रॉयचौधुरी, कॅमिओ मीडिया लॅबचे पुरब गुजर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या मुख्य संवर्धन अधिकारी वर्षा के. यांसारख्या तज्ज्ञांची व्याख्याने आणि प्रात्यक्षिक सत्रे आयोजित केली जातील. या कार्यक्रमात एफटीआयआय आणि एनएफएआयचे कर्मचारी मुव्हिंग इमेजेसचे जतन, मेटाडेटा, डिजिटल जतन, चित्रपट तपासणी आणि दुरुस्ती, स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन, कलर ग्रेडिंग आणि संबंधित आर्काइव्हल पद्धतींवर देखील सत्रे घेतील.
या कार्यशाळेचे संचालन एफटीआयआय मधील कोर्स डायरेक्टर आणि चित्रपट संशोधन अधिकारी अपर्णा सुब्रह्मण्यम करत आहेत. चित्रपट संवर्धनकर्त्या आणि संशोधक असलेल्या सुब्रह्मण्यम या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या 'मुव्हिंग इमेज आर्काइव्हिंग अँड प्रिझर्व्हेशन' कार्यक्रमाच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दृक-श्राव्य आणि चित्रपट आर्काइव्हिंगचा मोठा अनुभव आहे.
चित्रपट जतन, पुनरुज्जीवन, आर्काइव्हल आणि संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक व तज्ज्ञांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम आहे. ज्ञान आणि सहकार्य भागीदारांमध्ये प्रसाद कॉर्पोरेशन, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि भारतीय रिझर्व्ह बँक आर्काइव्ह्ज यांचा समावेश आहे, ज्यामुळे सहभागींना विशेष चित्रपट-जतन पद्धती तसेच दस्तऐवजीकरण आणि संस्थात्मक वारशाच्या व्यापक दृष्टिकोनाची माहिती मिळण्यास मदत होत आहे.
15 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपट आर्काइव्ह्जवरील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनावरील सत्राने या कार्यशाळेची सांगता होईल, ज्यानंतर समारोप सोहळा आणि एफटीआयआयच्या 'एट कॉलम अफेअर' या डिप्लोमा चित्रपटाच्या 4K- पुनरुज्जीवित आवृत्तीचे विशेष प्रदर्शन आयोजित केले जाईल, तसेच त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मुख्य अतिथी श्रीराम राघवन यांच्याशी संवाद साधला जाईल.

Participants, faculty and dignitaries at the opening ceremony of the “Moving Images” workshop
पीआयबी मुंबई |राधिका अघोर/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319386)
अभ्यागत कक्ष : 18