Posted On:
05 OCT 2026 7:57PM by PIB Mumbai
नागपूर, 5 ऑक्टोबर 2026
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत नागपूर इथल्या 'साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर' (एस सी झेड सी सी) च्या आवारात, 11 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 6:30 वाजता 'ब्रम्हनाद' या लोकप्रिय अशा सकाळच्या शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन केले जाणार आहे. प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका विदुषी नंदिनी नरेंद्र बेडेकर यांचे यात विशेष सादरीकरण होणार आहे. नागपूरमधील संगीतप्रेमींच्या आग्रहास्तव या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा आयोजन करण्यात आले आहे.

विदुषी नंदिनी नरेंद्र बेडेकर या प्रख्यात गायिका आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत. आपल्या गुरूंकडे त्यांनी जवळपास 35 वर्षे प्रशिक्षण घेतले असून, त्यादरम्यान जयपूर-अत्रौली घराण्याची संगीत परंपरा तसेच गुरू-शिष्य परंपरेची मूल्ये त्यांनी आत्मसात केली आहेत. भारत आणि परदेशातील अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी सादरीकरण केले असून शिष्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही त्या देत आहेत.
'ब्रम्हनाद' या उपक्रमाचा उद्देश संगीतप्रेमींना पहाटेच्या शांत वातावरणात शास्त्रीय संगीताचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे तसेच याचे आयोजन दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एस सी झेड सी सी च्या आवारात केले जाणार आहे.
संगीतप्रेमी, विद्यार्थी आणि रसिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या पहाटेच्या सादरीकरणाचा आनंद घेण्याचे आवाहन एस सी झेड सी सी, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी केले आहे.
पीआयबी मुंबई |राधिका अघोर/संदेश नाईक/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai