अणुऊर्जा विभाग
व्हिएतनाममधील हनोई येथे आयोजित 19 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताची चार सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई
Posted On:
05 OCT 2026 6:05PM by PIB Mumbai
मुंबई, 5 ऑक्टोबर 2026
व्हिएतनाममधील हनोई येथे 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित केलेल्या 19 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IOAA) 2026 मध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केली असून अनेक पदकांची कमाई केली आहे.
ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या पाचही भारतीय विद्यार्थ्यांनी पदके जिंकली, त्यांपैकी चौघांनी सुवर्ण आणि एकाने रौप्य पदक पटकावले आहे. भारतीय पदक विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत:
प्रांजल दीक्षित , हैद्राबाद तेलंगणा -सुवर्ण
सुमंत गुप्ता, दिल्ली - सुवर्ण
अक्षत श्रीवास्तव, गुरुग्राम, हरियाणा - सुवर्ण
अर्णव सेहरावत, फरिदाबाद, हरियाणा - सुवर्ण
हर्षिल अमितकुमार पटेल, वडोदरा, गुजरात – रौप्य
पदक तालिकेत, प्रत्येकी पाच सुवर्णपदके जिंकणाऱ्या इराण आणि दक्षिण कोरियाच्या नंतर, भारत व्हिएतनामसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर राहिला. या ऑलिम्पियाडमध्ये एकूण 51 सुवर्ण, 48 रौप्य आणि 60 कांस्यपदके प्रदान करण्यात आली.
भारतीय संघासोबत प्रा. भासवती मुखर्जी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई आणि प्रा. संवेद कोळेकर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू हे दोन मार्गदर्शक होते.
या ऑलिम्पियाडमध्ये 64 देशांतील 307 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ज्यामुळे सहभागी देश आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात हे आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑलिम्पियाडमध्ये ठरले.
1999 मध्ये खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने सहभाग घेण्यास सुरूवात केल्यापासून, 49 टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके, 35 टक्के विद्यार्थ्यांनी रौप्यपदके आणि 13 टक्के विद्यार्थ्यांनी कांस्यपदके जिंकली आहेत. गेल्या पाच वर्षांत, सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी एकतर सुवर्ण (64 टक्के) किंवा रौप्य (36 टक्के) पदके जिंकली आहेत.
या ऑलिम्पियाडच्या समारोपाने, या वर्षातील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि खगोलशास्त्र या विषयांमधील सर्व वरिष्ठ-स्तरीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा पूर्ण झाल्या आहेत. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताचा सहभाग सुरू झाल्यापासून, यावर्षी प्रथमच प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याने सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकले आहे. वरिष्ठ-स्तरीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये एकूण 16 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके आणि आठ विद्यार्थ्यांनी रौप्य पदके जिंकली आहेत.
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत तीन घटक असतात — सिद्धांत , ज्याचे गुणांमध्ये 50 टक्के योगदान असते; निरीक्षण, ज्याचे 25 टक्के योगदान असते; आणि डेटा विश्लेषण, ज्याचे 25 टक्के योगदान असते. याव्यतिरिक्त, विविध राष्ट्रांच्या संघांचा समावेश असलेली एक सांघिक स्पर्धा देखील घेण्यात येते.
भारतीय विद्यार्थी आणि मार्गदर्शकांसोबत एक अनौपचारिक संवाद मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE), TIFR, व्ही. एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – 400088 येथे आयोजित करण्यात आला आहे.
पीआयबी मुंबई |निलिमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319299)
अभ्यागत कक्ष : 23