आयुष मंत्रालय
बापू भवन येथे महात्मा गांधी जयंती साजरी; गांधीजींच्या तत्त्वांचे पालन करण्याचा करण्यात आला संकल्प
Posted On:
03 OCT 2026 12:38PM by PIB Mumbai
पुणे, 2 ऑक्टोबर, 2026
2 ऑक्टोबर 2026 रोजी पुण्यातील ताडीवाला रोडवरील ‘राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था’ अर्थात 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी' मधील् 'बापू भवन' येथे महात्मा गांधी जयंती अत्यंत उत्साहात आणि आदरभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी आणि नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात गांधीवादी अभ्यास विभागाच्या समन्वयक डॉ. नैना आठल्ये यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी मान्यवर आणि उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींचे जीवन, त्यांचे विचार आणि समकालीन समाजात महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व यांवर प्रकाश टाकला.
संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आंतरवासिता विद्यार्थी (इंटर्न्स), विद्यार्थी आणि माननीय पाहुण्यांनी गांधीजींची सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा आणि मानवसेवा या तत्वांबद्दलचे आपले विचार मांडले.
सर्व सहभागींनी महात्मा गांधींचे आदर्श अंगिकारण्याच्या आणि त्यांची शिकवण दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. गांधीजींची मूल्ये समाजाला सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वच्छता आणि निःस्वार्थ सेवेचा मार्ग अवलंबण्यासाठी आजही प्रेरित करत आहेत यावर वक्त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी, संस्थेच्या नैसर्गिक आहार केंद्रात सर्व सहभागींना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमात सर्व उपस्थितांचा उत्साही सहभाग दिसून आला.

***
शिल्पा पोफळे/सविता म्हसकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318609)
अभ्यागत कक्ष : 24