नौवहन मंत्रालय
भारताच्या सागरी क्षमतांना बळकटी देण्यात ‘एससीआय’ने अग्रणी भूमिका घ्यावी - केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
Posted On:
02 OCT 2026 9:47PM by PIB Mumbai
मुंबई, 02 ऑक्टोबर 2026 — केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एससीआय)ला स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी तसेच सागरी क्षमता विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये अग्रणी भूमिका बजावण्याचे आवाहन केले. एससीआयच्या 65 वर्षांच्या कार्यकाळपूर्तीनिमित्त आज मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सर्बानंद सोनोवाल यांनी एससीआयच्या राष्ट्रसेवेतील योगदानाची साडेसहा दशके पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. भारताची ऊर्जा आणि व्यापार सुरक्षा सुनिश्चित करण्यात या कंपनीची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले. विशेषतः अलीकडील होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात उद्भवलेल्या संकटकाळात एससीआयची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. भारत सरकारच्या ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी एससीआयचे योगदान असावे, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले. वर्ष 2047 पर्यंत भारताला आघाडीचे जहाजबांधणी आणि जहाजमालकी असलेले राष्ट्र बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या केंद्रस्थानी जहाजांचा मजबूत राष्ट्रीय ताफा राहील, असे त्यांनी नमूद केले.
“एससीआय हे समुद्रातील भारताची स्वतःची ताकद उभारण्याच्या प्रयत्नांचे एक स्पष्ट उदाहरण आहे,” असे सोनोवाल यांनी सांगितले. “सागरी अमृत काळ व्हिजन 2047 अंतर्गत भारत आघाडीचे जहाजबांधणी राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, एससीआयचा ताफा, त्यातील कर्मचारी आणि भागीदारी या मोहिमेच्या केंद्रस्थानी असतील,” असे ते म्हणाले.

1961 मध्ये 19 जहाजांसह लाइनर शिपिंग कंपनी म्हणून स्थापना झालेल्या एससीआयचे आज विविध क्षेत्रांत कार्यरत सागरी उद्योग समूहात रुपांतर झाले आहे. सध्या कंपनीकडे एकूण 5.26 दशलक्ष डेडवेट टनेज (डीडब्ल्यूटी) क्षमतेची 58 जहाजे कार्यरत आहेत. कंपनीच्या सध्याच्या कामकाजात कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करणारी टँकर जहाजे, घाऊक आणि कंटेनर वाहतूक, एलपीजी आणि एलएनजी वाहक जहाजे, सागरी सेवा, प्रवासी आणि किनारी वाहतूक, प्रकल्प मालवाहतूक, जहाज व्यवस्थापन आणि जहाजबांधणीविषयक सल्ला सेवा यांचा समावेश आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आता केवळ जहाजांची मालकी असण्यावर समाधानी नाही; तर आम्ही ती जहाजे देशातच बांधण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रीय संकल्पाची साथ मिळाल्यास भारतीय उद्योग काय साध्य करू शकतो, हे एससीआयची गेल्या अनेक दशकांतील प्रगती दर्शवते. एससीआय आपल्या ताफ्याचा विस्तार करत असताना आणि भागीदारी अधिक मजबूत करत असताना, त्याचा लाभ केवळ एका कंपनीला होत नाही; तर त्यामुळे भारताच्या संपूर्ण जहाजबांधणी क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळते. तसेच ‘विकसित भारता’च्या उद्दिष्टाच्या दिशेने आपली वाटचाल मैल दर मैल पुढे सरकते,” असे सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.
_20261002215204_583a26.jpeg)
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री तसेच कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी नितेश नारायण राणे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईशी एससीआयचे दीर्घकालीन संबंध अधोरेखित केले. भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेतील व्यापार, रोजगार आणि व्यापक विकासासाठी मजबूत नौवहन परिसंस्था अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार यांनी आभासी माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रीय गरजेच्या काळात एससीआयने दुसरी संरक्षणरेषा म्हणून बजावलेल्या भूमिकेकडे त्यांनी लक्ष वेधले. नौवहन उद्योगाचे स्वरूप चक्रीय असतानाही एससीआयची आर्थिक कामगिरी मजबूत राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. एमएकेव्ही 2047 अंतर्गत एससीआयच्या ताफ्याचा विस्तार, धोरणात्मक भागीदारी आणि पर्यावरणपूरक नौवहनावर भर, यामुळे भारताची सागरी क्षमता तसेच जागतिक सागरी क्षेत्रातील उपस्थिती आणखी बळकट होईल, असे सचिवांनी सांगितले.
एससीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी. के. त्यागी यांनी आगामी वर्षांसाठी कंपनीच्या योजनांची रूपरेषा मांडली. भारताची नौवहन क्षमता आणि जहाजांची एकूण टन क्षमता वाढवण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी अधिक मोठा, आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ताफा उभारण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
सागरी क्षेत्रासाठी सरकारने विस्तारित केलेल्या धोरणात्मक आणि वित्तीय पाठबळाच्या आधारे एससीआय ताफा वाढवण्याचा कार्यक्रम राबवत आहे. इंडियन ऑइलच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत प्रस्तावित संयुक्त उपक्रम तसेच भारत कंटेनर शिपिंग लाइनच्या माध्यमातून एमएकेव्ही 2047 च्या उद्दिष्टांच्या दिशेने ताफ्याचा विस्तार जलदगतीने करण्यासाठी आवश्यक पायाभरणी केली जात आहे.
_20261002215223_ca2f73.jpeg)
एससीआय भारताची सागरी क्षमता बळकट करण्यात, देशाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यात तसेच जहाजबांधणी आणि जहाजांच्या टन क्षमतेशी संबंधित व्यापक उद्दिष्टांमध्ये योगदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने कंपनी आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे.
***
शिल्पा पोफळे/रेश्मा बेडेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318561)
अभ्यागत कक्ष : 8