विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘सीएसआयआर-नीरी’ने साजरा केला 85वा स्थापना दिवस; चांद्रयान मोहिमा आणि भविष्यातील चांद्र संशोधनाची दिली माहिती


भारताच्या अंतराळ प्रवासाचा नव्या युगात प्रवेश - डॉ. प्रकाश चौहान

Posted On: 02 OCT 2026 7:29PM by PIB Mumbai

विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)ने 01 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर येथील नीरीच्या सभागृहात आपला 85वा स्थापना दिवस साजरा केला. भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील कामगिरी आणि पर्यावरण संशोधनातील संस्थेच्या योगदानाची माहिती देणारे विविध कार्यक्रम यावेळी आयोजन केले होते.

‘सीएसआयआर-नीरी’च्या स्थापना दिवस कार्यक्रमाला हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या अखत्यारितील राष्ट्रीय दूर संवेदन केंद्र (एनआरएससी)चे संचालक डॉ. प्रकाश चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ‘सीएसआयआर-नीरी’चे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यावेळी उपस्थित होते.

‘भारतीय चांद्र मोहिमांद्वारे पृथ्वीच्या चंद्राचा अभ्यास’ या विषयावर स्थापना दिनाचे व्याख्यान देताना डॉ. चौहान यांनी सांगितले की भारत एक प्रमुख अंतराळ राष्ट्र म्हणून उदयास आला आहे. देशाच्या सुरुवातीच्या अंतराळ कार्यक्रमापासून ते चांद्र आणि ग्रहविषयक प्रगत मोहिमांपर्यंत भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

थुंबा विषुववृत्तीय प्रक्षेपण स्थानकाची 1963 मध्ये स्थापना झाली तेव्हापासून ते स्वदेशी प्रक्षेपण वाहने, उपग्रह आणि अंतराळ पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंतच्या भारताच्या अंतराळ प्रवासाचा मागोवा घेताना त्यांनी अंतराळ क्षेत्रात सार्वजनिक आणि खासगी संस्थांसह स्टार्ट-अप्सचा वाढता सहभाग ठळकपणे सांगितला.

डॉ. चौहान यांनी चांद्रयान-1 ते चांद्रयान-3 या भारताच्या चांद्र संशोधन कार्यक्रमातील वैज्ञानिक आणि तांत्रिक कामगिरीचा आढावा घेतला. नियोजित चांद्र नमुना-वापसी मोहीम चांद्रयान-4 विषयीही त्यांनी माहिती दिली. चंद्रावरील नमुने गोळा करणे, त्यांचे जतन करणे आणि ते सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणे यामध्ये येणारी तांत्रिक आव्हाने त्यांनी उलगडून सांगितली.

त्यांनी चांद्रयान-5/लुपेक्स या नियोजित इस्रो-जॅक्सा मोहिमेचा उल्लेख केला. ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी तसेच चंद्रावरील घनरूपातून चटकन वायूरुप होणाऱ्या पदार्थांचा अभ्यास करण्यासाठी आखली आहे. यामध्ये कायमस्वरूपी सावली असलेल्या प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या पाण्याविषयक अभ्यासाचाही समावेश आहे.

चंद्राविषयीची अनेक रहस्ये अद्यापही उलगडलेली नाहीत, यावर भर देत डॉ. चौहान म्हणाले, भविष्यातील चांद्र मोहिमांमुळे चंद्राची उत्पत्ती, उत्क्रांती, पृष्ठभाग आणि साधनसंपत्ती यांविषयीचे वैज्ञानिक आकलन अधिक सखोल होईल. त्याचबरोबर अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताच्या क्षमताही बळकट होतील.

आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. एस. वेंकट मोहन यांनी ज्ञानाधिष्ठित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भारताच्या निर्मितीत सीएसआयआरच्या योगदानाविषयी सांगितले. त्यांनी पाणी, हवेची गुणवत्ता, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन आणि कर्बवायूची चक्रीय व्यवस्था यांसारख्या प्रमुख पर्यावरणीय आव्हानांवर सीएसआयआर-नीरीमध्ये सुरू असलेल्या संशोधनाची माहिती दिली. या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख वापराचाही त्यांनी उल्लेख केला. आसाममधील पूरग्रस्त भागांमधील सुमारे 110 हेक्टर जमिनीचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि प्रदूषकांवर उपाययोजनांबाबत संशोधनासाठी राबविल्या जाणाऱ्या नीरी-झारसारख्या उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी एप्रिल–सप्टेंबर 2026 या कालावधीसाठीचे सीएसआयआर-नीरी वृत्तपत्र तसेच ‘भारतात हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आणि इतर व्यवस्थांची हानी व नुकसानाच्या नोंदी करण्याबाबत मार्गदर्शक आराखडा’ या विषयावर धोरण रूपरेखा प्रकाशित करण्यात आली. तसेच 25 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि सप्टेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत निवृत्तीच्या वयाची पूर्तता करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सीएसआयआर-नीरीतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचाही सत्कार करण्यात आला.

स्थापना दिवस कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संस्थेने आपला परिसर सर्वसामान्यांसाठी खुला केला. यावेळी 20 शाळा आणि महाविद्यालयांमधील सुमारे 1,000 विद्यार्थ्यांनी संस्थेला भेट दिली. प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी सीएसआयआर-नीरीच्या संशोधन आणि विकासविषयक उपक्रमांविषयी जाणून घेतले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. शालिनी ध्यानी, वैज्ञानिक-फ यांनी केले तर; प्रकाश कुंभारे, वैज्ञानिक-फ यांनी आभार प्रदर्शन केले.

***

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318499) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English