दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुंबई एलएसएकडून जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम आयोजित करून हिंदी पंधरवड्याचा समारोप
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा श्रमदानात सहभाग; स्वच्छता कामगारांना सुरक्षा आणि उपयुक्तता संच देऊन करण्यात आले सन्मानित
Posted On:
01 OCT 2026 4:32PM by PIB Mumbai
मुंबई, 1 ऑक्टोबर 2026
दूरसंचार विभागाच्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राकडून आज जुहू चौपाटीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त दूरसंचार महासंचालक मोहम्मद जफर इक्बाल यांनी केले. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि मुंबई परवाना सेवा क्षेत्राच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी, अतिरिक्त महासंचालक मोहम्मद जफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयापासून जुहू चौपाटीपर्यंत एक फेरी काढण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी राजभाषा म्हणून हिंदीचा वापर वाढवण्यावर भर दिला आणि प्रत्येकाने स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे असे आवाहन केले. अधिकाऱ्यांनी फलक आणि भित्तिपत्रके हातात घेऊन सामान्य जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला. जुहू चौपाटीवर पोहोचल्यानंतर, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानात भाग घेतला, चौपाटीवर पडलेला कचरा साफ केला आणि स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. या प्रसंगी, अतिरिक्त महासंचालक मोहम्मद जफर इक्बाल यांनी स्वच्छता कामगारांच्या बहुमोल योगदानाची दखल घेत त्यांना सुरक्षा आणि उपयुक्तता संचांचे वाटप केले.

स्वच्छता मोहिमेसोबतच, मुंबई परवाना सेवा क्षेत्राकडून 15 सप्टेंबर 2026 ते 1 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हिंदी पंधरवड्याचे आयोजनही करण्यात आले होते. या पंधरवड्यादरम्यान हिंदी निबंध लेखन, वादविवाद, टिपण आणि मसुदा लेखन यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. हिंदी पंधरवड्याच्या समारोपाच्या दिवशी इक्बाल यांनी यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले.

* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2317661)
अभ्यागत कक्ष : 9