संरक्षण मंत्रालय
महाराष्ट्र एन सी सी पथकाने अखिल भारतीय वायू सैनिक शिबीर -2026 (AIVSC-2026) मध्ये घेतला सहभाग
Posted On:
30 SEP 2026 4:56PM by PIB Mumbai
राष्ट्रीय छात्र सेनेच्या एअर विंगच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय वायू सैनिक शिबिरात17 संचालनालयांमधील कॅडेट्स कठोर प्रशिक्षण मानकांचे पालन करत आपले उड्डाण कौशल्य, शिस्त, नेतृत्त्व आणि सांघिकवृत्ती या गुणवैशिष्ट्यांचे प्रदर्शन करतात. महाराष्ट्र एअर विंगच्या तुकडीने आंतर समूह स्पर्धेच्या अंतर्गत ही अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने चालणारी निवड आणि प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर प्री-वायू सैनिक कॅम्प–1 आणि प्री-वायू सैनिक कॅम्प–2 मध्ये ही सहभाग घेतला. या एकापाठोपाठ एक झालेल्या प्रक्रियांमुळे कॅडेट्सना राष्ट्रीय स्तरावरील शिबिरात सहभागी होण्यापूर्वी विविध क्षेत्रांमधील सखोल प्रशिक्षण आणि पूर्वतयारीची संधी मिळाली.

महाराष्ट्राच्या तयारीचा मुख्य भाग म्हणजे नागपूर इथल्या भारतीय वायुसेनेच्या मुख्यालय देखभाल कमांडमधील प्रशिक्षण व्यवस्था होय. येथे अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करून प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली. सातत्यपूर्ण प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि समर्पण यांच्या माध्यमातून कॅडेट्सच्या कौशल्यांना अधिकाधिक पैलू पाडण्यासाठी PI स्टाफने सातत्याने कार्य केले. कॅम्प कमांडंट विंग कमांडर व्ही. दीपिका राव, 1 महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन संतोष बाबू आणि 3 महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रनचे विंग कमांडर अर्पण चंदा यांनी संपूर्ण तयारीदरम्यान मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन, नागपूर यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षणाच्या प्रारंभिक आणि पूर्वतयारी युनिटची भूमिका बजावत प्रशिक्षण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या युनिटने शिबिराचे आयोजन, कॅडेट्सना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या सहभागासाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि समन्वय यांमुळे महाराष्ट्राच्या पथकाच्या पद्धतशीर तयारीसाठी मोठा लाभ झाला.

मेजर जनरल विवेक त्यागी, अतिरिक्त महासंचालक, एनसीसी संचालनालय महाराष्ट्र, यांनी पथकाशी संवाद साधला. तर प्रशिक्षणावर देखरेख करण्यासाठी ब्रिगेडियर मनीष शर्मा ,उपमहासंचालक, एनसीसी संचालनालय महाराष्ट्र आणि ग्रुप कॅप्टन कुशल व्यास ,ग्रुप कमांडर, नागपूर ग्रुप यांनीही शिबिराला भेट दिली.

कॅडेट्सनी विविध क्षेत्रांमध्ये सखोल आणि कठोर प्रशिक्षण घेतले. 22 रायफलद्वारे फायरिंगचा सराव आणि स्कीट शूटिंगमुळे अचूकता आणि सहनशक्ती वाढवण्यात मदत झाली. तसेच, पॉवर्ड फ्लाइंग, ग्लायडिंग आणि सिम्युलेटर सत्रांद्वारे कॅडेट्स प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट पायलट स्पर्धे’साठी सज्ज होऊ शकले. एरोमॉडेलिंगमुळे तांत्रिक ज्ञान आणि विमानचालन तंत्रज्ञानाविषयीच्या ज्ञानात भर पडली. ड्रिल आणि तंबू उभारणीचा सराव केल्याने समन्वय आणि सुसूत्रता वाढली. तसेच, वर्गातील सत्रांच्या माध्यमातून विमानाच्या प्रणाली, विमानचालनाची तत्त्वे आणि हवाई नियम यांबाबतचे सैद्धांतिक ज्ञान अधिक दृढ करण्यात आले.
महाराष्ट्र संचालनालय हे शिस्त, लवचिकता, अचूकता, सांघिक कार्य आणि उत्कृष्टतेप्रती कटिबद्धता या राष्ट्रीय छात्र सेनेच्या अभिजात मूल्यांचे प्रतीक आहे. अखिल भारतीय वायू सैनिक कॅम्प कॅडेट्सना त्यांची तांत्रिक अचूकता, नेतृत्वगुण, सांघिक वृत्ती आणि समर्पण या गुणांना सादर करण्यासाठी एक उदयोन्मुख व्यासपीठ उपलब्ध करुन देते.
अखिल भारतीय वायू सैनिक कॅम्प 2026 ची सुरुवात 30 सप्टेंबर रोजी एअर फोर्स स्टेशन तांबरम, चेन्नई येथे होणार आहे. येत्या चौदा दिवसांमध्ये महाराष्ट्राचे पथक विविध स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये भाग घेणार आहे. हा पंधरवडा सर्व कॅडेट्सना त्यांनी घेतलेले सखोल प्रशिक्षण, त्यांची शिस्त आणि राष्ट्रीय व्यासपीठावर कामगिरी करण्याचा ध्यास या सर्वांचे प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
***
राधिका अघोर/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317271)
अभ्यागत कक्ष : 10