अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'करदाते सेवा महासंचालनालयाच्या (DGTS) मुंबई विभागातर्फे गोवा विद्यापीठात वस्तु सेवा कर (GST) आणि आर्थिक एकात्मता या विषयावर जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 30 SEP 2026 5:03PM by PIB Mumbai

 

मुंबई/पणजी, सप्टेंबर 30, 2026

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत असलेल्या ‘केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (CBIC), ‘करदाता सेवा महासंचालनालयाने (डीजीटीएस) गोवा विद्यापीठाच्या सहयोगाने पणजीतील  गोवा विद्यापीठाच्या ‘गोवा बिझनेस स्कूल’ मध्ये आज "भारतातील वस्तू सेवा कर (जीएसटी) : कर सुधारणा ते आर्थिक एकात्मता" या विषयावर एका जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम 'मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी' (MPSLGPP) आणि 'गोवा बिझनेस स्कूल'  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.  वस्तू आणि सेवा कर, कर सुधारणा आणि आर्थिक समावेशनात त्यांची भूमिका, यांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या औचित्याने  प्राध्यापक, कर प्रशासन अधिकारी, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज  एकत्र आले.

गोव्यातील 'गोवा बिझनेस स्कूल'च्या अधिष्ठाता आणि  वरिष्ठ प्राध्यापिका पूर्वा हेगडे देसाई यांच्या स्वागतपर भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. डीजीटीएस (DGTS), मुंबई विभागीय शाखेचे  प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी बीजभाषण केले. त्यांनी जीएसटीची मूलभूत संरचना स्पष्ट केली आणि अनुपालन प्रक्रिया सुलभ करणे, व्यापारातील अडथळे कमी करणे, वस्तू व सेवांची ने-आण सुलभ करणे तसेच कर प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे या उद्देशाने केलेल्या सुधारणांवर प्रकाश टाकला.

गोव्यातील चार्टर्ड अकाउंटंट, सीए श्रीधर ऊर्फ यतीश जी. पै वेर्णेकर यांनी तांत्रिक सत्र सादर केले. जीएसटी  अनुपालन, वैधानिक हिशेब पुस्तके, इलेक्ट्रॉनिक अनुपालन आणि डिजिटल अहवाल यांबाबत  त्यांनी व्यावहारिक माहिती आणि मार्गदर्शन केले.

या संवाद सत्रात, M.Com, LL.M. आणि MBA (Financial Services) या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी आणि  प्राध्यापकांनी  सत्रात उत्साहाने सहभाग घेतला. DGTSच्या मुंबई विभागीय शाखेचे सह-संचालक डॉ. केदार चंद्रकांत यांनी मांडलेल्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

यापूर्वी, 29 सप्टेंबर 2026 रोजी, DGTSच्या मुंबई विभागीय शाखेने (MZU)  CGST गोवा आयुक्तालय आणि BITS पिलानी (के. के. बिर्ला गोवा कॅम्पस) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जीएसटी प्रणालीत येणारे नवीन बदल आणि कल, डिजिटल कर प्रशासन, माहिती किंवा डेटावर  आधारित करदात्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि नियमांचे पालन करण्याची प्रणाली या विषयांवर माहिती देण्यात आली.

या उपक्रमांच्या माध्यमातून, DGTSच्या मुंबई विभागीय शाखेने (MZU)  एप्रिल 2026 पासून 54  जनसंपर्क उपक्रम आयोजित केले आहेत किंवा त्यात सहभाग घेतला आहे. यामध्ये 32  चर्चासत्रे / वेबिनार / मिश्र स्वरूपाचे कार्यक्रम  आणि 22 संवाद सत्रांचा समावेश आहे. करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, स्वेच्छेने नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे आणि संबंधित घटकांचा सहभाग वाढवणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

***

राधिका अघोर/सविता म्हसकर/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2317228) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English