माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने केवळ आशयाचा ग्राहक बनून राहून नये, तर त्यापलिकडे जात आशय निर्मिती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून ओळख निर्माण केली पाहीजे : फिक्की फ्रेम (FICCI FRAMES) 2026 मध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आवाहन


अस्सलता, मानवी सर्जनशीलता आणि भारतीय कथाच आशय क्षेत्राच्या भवितव्याला आकार देतील : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

Posted On: 29 SEP 2026 5:50PM by PIB Mumbai

मुंबई, 29 सप्‍टेंबर 2026

 

माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्राशी संबंधित फिक्की फ्रेम्स  या वार्षिक जागतिक परिषदेचे 26 वे पर्व आज मुंबईत पार पडले. फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने या परिषदेचे आयोजन केेले होते. या परिषदेच्या निमीत्ताने देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य आणि वाढता जागतिक प्रभाव या विषयावर चर्चा करण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे, सर्जनशील कलाकार आणि नवोन्मेषक एकत्र आले होते.

केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी फिक्की फ्रेम्स 2026 च्या 26 व्या पर्वाला संबोधित केले. भारताचे माध्यम युग : अमर्याद आशयाच्या युगात मूल्यनिर्मिती (India’s Media Moment: Creating Value in an Age of Infinite Content) ही यंदाच्या परिषदेची संकल्पना,  आजच्या काळाला समर्पक आणि तितकीच गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आजचा काळ हा अमर्याद आशयाचा काळ आहे, आशयाची कमतरता हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान  नाही, तर अस्सलता आणि मानवी बंध ही आपल्यासमोरची मोठी आव्हाने आहेत असे ते म्हणाले.  विश्वास ही अमूल्य गोष्ट असून हाच विश्वास टिकवण्यासाठी आपण प्राधान्याने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

अस्सलता, मानवी सर्जनशीलता आणि भारतीय कथा आशय क्षेत्राच्या भवितव्याला आकार देतील असे ते म्हणाले. देशाची सर्जनशील परिसंस्था महानगरांच्या पलीकडे नेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. छोटी शहरे आणि गावांमधील कथात्मक आशयामुळे या उद्योग क्षेत्रात समृद्धता येईल, आणि त्यासोबतच पर्यटनाच्या नवीन संधी निर्माण होतील असे ते म्हणाले. डिजिटल व्यासपीठांच्या व्यापक उपलब्धतेमुळे आज प्रत्येक व्यक्ती आशय निर्माता अर्थात कंटेंट क्रिएटर बनू शकते. यासोबतच अशा नव्याने उदयाला येत असलेल्या आशय परिसंस्थेमुळे संधी आणि जबाबदारी दोन्हीही वाढले असल्याचे ते म्हणाले.

देशात आशयासोबतच संदर्भ, समृद्ध विविधता आणि कथात्मक मांडणीची मोठी परंपरा आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारत हे जगातील सर्जनशीलतेचे सर्वात मोठे केंद्र आहे. देशाची संस्कृती, अर्थव्यवस्था, रोजगार, जागतिक स्थान आणि पर्यटनाला एकत्रितपणे पुढची दिशा देण्याचा हाच काळ आहे, हेच आपले सर्जनशील भांडवल आहे असे ते म्हणाले.

यावेळी शेखावत यांनी तीन प्रमुख बदलांची गरज असल्याचे मतही व्यक्त केले. याअंतर्गत देशाने केवळ आशयाचा ग्राहक बनून राहून नये, तर त्यापलिकडे जात आशय निर्मिती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे असे ते म्हणाले. यासोबतच प्रेक्षकसंख्येच्या आकाराच्या पलीकडे जात आपण मूळ भारतीय बौद्धिक मालमत्ता उभारली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पडद्यावर दिसणारा भारत आणि प्रत्यक्ष भारताचा प्रवास करताना येणाऱ्या अनुभवाचा आपण मिलाफ साधला पाहिजे अशी तिसरी सूचनाही त्यांनी केली. अशा  कथांमधून  पर्यटनाला प्रेरणा मिळेल आणि पर्यटनातून स्थानिक पातळीवर समृद्धी येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नवीन तंत्रज्ञान आणि नव्या संधींबद्दल शेखावत म्हणाले की सर्जनशील अर्थव्यवस्थेअंतर्गत ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC), एक्सटेंडेड रिॲलिटी (XR), गेमिंग, व्हर्च्युअल प्रोडक्शन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता  यांसारख्या विविध उप-क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण करता येतील. या क्षेत्रातले तंत्रज्ञान ही कथात्मक मांडणीची नवीन भाषा म्हणून उदयाला येऊ लागले आहे असे ते म्हणाले.

फिक्की फ्रेम्स येथे उपस्थितांना संबोधित करताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्याचे महत्व अधोरेखित केले. “उद्योग क्षेत्राने केवळ व्ह्यूज’ला महत्व न देता, मूल्यनिर्मितीकडे वाटचाल केली पाहिजे,” असे ते म्हणाले. शाश्वत विकासासाठी बौद्धिक संपदा, निर्माते, कौशल्य आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीमध्ये गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्रभात यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह्स (WAVES) परिसंस्थे अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकला. या उपक्रमांमध्ये एव्हीजीसी क्षेत्राला अधिक चालना देणे, विशेष कौशल्ये आणि संधी मजबूत करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) ची स्थापना तसेच सर्जनशील क्षेत्राला बाजारपेठा आणि संधींशी जोडणारे वेव्ह्स बाजार  हे वर्षभर सुरू असलेले व्यासपीठ यांचा समावेश आहे.

प्रख्यात अभिनेते आणि फिक्की फ्रेम्सचे सदिच्छादूत आयुष्मान खुराना म्हणाले, “एखादी कथा भारतातील एका छोट्या शहरात सुरू होऊन जगभरात कुठेही पोहोचू शकते. एक निर्माता फोनच्या साहाय्याने लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हीच आपल्यासमोर असलेली संधी आहे. आपल्याकडे पूर्वीपेक्षा अधिक कथा, अधिक आवाज आणि तो जगापर्यंत पोहोचवण्याचे अधिक मार्ग आहेत. ही भारताच्या सर्जनशील कल्पनाशक्तीला आणखी मोठ्या जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे.”

फिक्कीचे अध्यक्ष आणि आर पी जी समूहाचे उपाध्यक्ष अनंत गोयंका म्हणाले की भारताने आपल्या व्यापक लोकसंख्येचे आणि विविधतेचे  रूपांतर शाश्वत मूल्यांमध्ये केले पाहिजे आणि आपल्या कथाविश्वाला नेहमी भारतीयत्वाचा स्पर्श राहील याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही भारतीय कथाकारांना जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास, भांडवल आणि तंत्रज्ञान प्रदान करायला हवे मात्र  त्याचवेळी त्यांच्या कलाकृतीला असलेली भारतीयत्वाची किनार कायम राहील याकडे आमचा कटाक्ष असेल.

या कार्यक्रमादरम्यान भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला आकार देण्यात दिलेल्या योगदानाची आणि नेतृत्वाची दखल घेत  फिक्कीचे माजी अध्यक्ष आणि जिओ स्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर यांना केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते फिक्की फ्रेम्स जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माध्यम क्षेत्र हे नेहमीच समाजाचा मूलभूत आधारस्तंभ म्हणून कायम आहे. हा एक असा पाया आहे ज्यावर समाजाची कल्पनाशक्ती, समाजाचे भविष्याबाबतचे चित्र आणि व्यक्तीच्या उत्तम आयुष्य, उत्तम जग आणि उत्तम राष्ट्राबाबतच्या महत्त्वाकांक्षा  उभ्या असतात, असे मनोगत उदय शंकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.  

जसजसे उत्पन्नाचे आणि मूल्याचे नवीन स्त्रोत  निर्माण होत आहेत, तसतसे या उद्योगाला प्रगती आणि नाविन्यपूर्ण संशोधनासाठी योग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे असे फिक्की मीडिया आणि एंटरटेनमेंट समितीचे अध्यक्ष आणि जिओस्टारचे मनोरंजन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन वाझ यांनी स्पष्ट केले. हे क्षेत्र विकासाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत असताना अनुकूल नियामक वातावरण, स्वनियंत्रण आणि उद्योगांचा भक्कम पाया आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.

फिक्की फ्रेम्सची 26वी आवृत्ती  माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध घटकांना एकाच मंचावर घेऊन आली. या परिषदेत उदयोन्मुख तंत्रज्ञान, बदलत जाणारे कंटेट मॉडेल्स, बौद्धिक संपदा, सर्जनशील प्रतिभा, जागतिक संधी आणि भारताच्या  सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316652) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English