Posted On:
28 SEP 2026 7:55PM by PIB Mumbai
मुंबई, 28 सप्टेंबर 2026
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसआय), मुंबई पश्चिम विभाग मुंबईतल्या शाळांमध्ये ‘नो युअर फुड लेबल’ म्हणजेच तुमच्या अन्नाचे लेबल जाणून घ्या हा जनजागृती उपक्रम सुरू करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुड-लेबल साक्षरतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना माहितीपूर्ण अन्न निवडीसाठी सक्षम करणे हा आहे.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना पाकीटबंद अन्नपदार्थांच्या लेबलवर दिलेल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल जागरूक करेल. लेबलवर अन्न घटक, पोषणाबाबत माहिती, ऍलर्जीकारक पदार्थ, दिनांक, एफएसएसएआय परवान्याचा तपशील, अन्न पसंतीची चिन्हे आणि इतर अनिवार्य घोषणांची माहिती दिलेली असते. वयोगटानुसार योग्य आणि संवादात्मक शिक्षण उपक्रमांद्वारे, विद्यार्थ्यांना अन्न निवडीपूर्वी फुड-लेबल वाचण्याची, समजून घेण्याची आणि त्याचे मूल्यांकन करण्याची सवय लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

मुंबईत याचा प्रारंभ हा या उपक्रमाचा पहिला टप्पा असेल. अन्नपदार्थांच्या लेबलविषयी साक्षर असलेल्या युवा ग्राहकांचे व्यापक जाळे तयार करण्याच्या उद्देशाने, हा कार्यक्रम त्यानंतर पश्चिम विभागाच्या अखत्यारीतील इतर भागांतील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तारित केला जाईल.
मुलांमध्ये पौष्टिकतेबद्दल जागरूकता आणि साक्षरता यावर वाढत असलेल्या महत्त्वामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पॅकेजच्या पुढील भागावरील लेबलिंगसंदर्भातील आपल्या अलीकडील कार्यवाहीमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही तरुण पिढीमध्ये पौष्टिकतेविषयी साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
मुलांना त्यांच्या कुटुंबात आणि समाजात महत्त्वाचे प्रभावक म्हणून निश्चित करुन हा उपक्रम विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण अन्न निवडीचा संदेश शाळांमधून त्यांच्या घरांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्यास सक्षम करून एक गुणक परिणाम साधण्याचा प्रयत्न करतो.
‘नो युअर फूड लेबल’ या उपक्रमाद्वारे, एफएसएसआय पश्चिम विभागाचा उद्देश पुढील पिढीला पाकीटबंद अन्नपदार्थांच्या लेबल्सबद्दल व्यावहारिक ज्ञानाने सुसज्ज करणे आणि सुरक्षित, आरोग्यदायी व माहितीपूर्ण अन्न निवडीच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा आहे.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai